कोल्हापूर : श्री अंबाबाईचा नवरात्रौत्सव यंदा निर्बंधमुक्‍त

कोल्हापूर : श्री अंबाबाईचा नवरात्रौत्सव यंदा निर्बंधमुक्‍त
Published on
Updated on

कोल्हापूर ; पुढारी वृत्तसेवा : करवीर निवासिनी श्री अंबाबाईचा नवरात्रौत्सव यावर्षी निर्बंधमुक्‍त असाच साजरा होणार आहे. गेल्या वर्षी कोरोनामुळे दर्शनासाठी ई-पास बंधनकारक करण्यात आला होता. यावर्षी असे कोणत्याही प्रकारचे पास नसतील. मुक्‍तपणे श्री अंबाबाईचे दर्शन घेता येईल, असे जिल्हाधिकारी तथा पश्‍चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीचे प्रभारी अध्यक्ष राहुल रेखावार यांनी गुरुवारी सांगितले.

कोरोनामुळे सलग दोन वर्षे नवरात्रौत्सव विविध मर्यादा घालून साजरा करण्यात आला. यावर्षी तशी कोणतीच परिस्थिती राहणार नाही. अंबाबाईचा नवरात्रौत्सव हा पूर्वीप्रमाणेच साजरा करण्यात येणार असून त्याची तयारी सुरू झाल्याचे जिल्हाधिकारी रेखावार यांनी सांगितले. गतवर्षी शिवाजी चौकातून दर्शन रांग होती. दर्शनासाठी ई-पास बंधनकारक होता. मात्र, यावर्षी असा कोणताही दर्शन पास राहणार नाही. मंदिराबाहेर असलेल्या दर्शन रांगेतून भाविकांना थेट प्रवेश दिला जाणार आहे.

रोटरी क्लबच्या वतीने पार्किंगमध्ये तात्पुरत्या स्वच्छतागृहाऐवजी कायमस्वरूपी उभारणी सुरू आहे. त्याच्या नियमित स्वच्छतेसाठी स्वतंत्र कामगार नेमण्यात येणार आहेत. नवरात्रौत्सवात मंदिर परिसरातील हॉटेल, लॉजिंग यांची स्वच्छतागृहे भाविकांसाठी नि:शुल्क उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला जाईल. परिसरात सर्वत्र याबाबतचे फलक लावण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले. देवस्थान समितीच्या वतीने उभारण्यात येणार्‍या भक्‍त निवास आणि पार्किंग इमारतीचे काम संथ गतीने सुरू आहे. त्यालाही गती देऊ, असेही रेखावार यांनी सांगितले.

पर्यटनस्थळ विकासासाठी निधीचा लवकरच प्रस्ताव

जिल्ह्यातील पर्यटनस्थळ विकासासाठी निश्‍चित केलेल्या ठिकाणांचे आराखडे तयार केले जात आहेत. पहिल्या टप्प्यात त्यातील सात आराखडे पुढील आठवड्यात बैठकीत अंतिम केले जातील. त्यानंतर या ठिकाणांनुसार निधी मागणीचा प्रस्ताव राज्य व केंद्र शासनाला सादर केला जाणार आहे. केंद्र शासनाच्या प्रसाद योजनेतूनही विविध निधी मागणी केली जाणार असल्याचेही रेखावार यांनी सांगितले.

टेंबलाई मंदिर परिसराचा आराखडा तयार

टेंबलाई मंदिर परिसराचा आराखडा तयार करण्यात आला आहे. मंदिर आणि नैसर्गिक टेकडी याचा विचार करून हा आराखडा केला आहे. त्यानुसार हा परिसर विकसित केला जाणार आहे. यामध्ये व्यापारी, जत्रेदरम्यान होणारी गर्दी याचाही विचार करण्यात आला असून लवकरच हे काम सुरू होईल, असेही रेखावार यांनी सांगितले.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news