कोल्हापूर; सतीश सरीकर : महापालिकेच्या निवडणुकीसाठी ( कोल्हापूर महापालिका निवडणूक ) शहरातील लोकसंख्येनुसार आरक्षण निश्चित करण्यात आले आहे. अनुसूचित जाती प्रवर्गासाठी (एससी) 12 जागा असतील. महापालिकेच्या इतिहासात पहिल्यांदाच निवडणुकीसाठी अनुसूचित जमातीसाठी (एसटी) आरक्षण मिळणार आहे. या प्रवर्गासाठी एक जागा निर्माण झाली आहे.
त्यांची एकूण लोकसंख्येच्या 0.5 टक्क्यावर लोकसंख्या झाली असल्याने एसटी प्रवर्गासाठी आरक्षण मिळाले आहे. सर्वसाधारण प्रवर्गासाठी (खुला) 79 जागा असणार आहेत. लवकरच हा अहवाल राज्य निवडणूक आयोगाला पाठविण्यात येणार आहे. आयोगाच्या सूचनेनुसार या महिन्यातच आरक्षण सोडत निघण्याची शक्यता आहे. ( कोल्हापूर महापालिका निवडणूक )
राज्य शासनाच्या आदेशानुसार महापालिकेची निवडणूक ( कोल्हापूर महापालिका निवडणूक ) त्रिसदस्य प्रभाग रचना पद्धतीनुसार होत आहे. परिणामी, 31 प्रभाग होणार आहेत. यात शहरातून 92 नगरसेवक निवडून द्यावे लागणार आहेत. प्रत्येकी 3 नगरसेवकांचे 30 प्रभाग व 2 नगरसेवकांचा एक प्रभाग असेल. प्रत्येक प्रभागात अ, ब, क या क्रमाने अंतर्गत रचना असेल. त्यानुसार आरक्षण सोडत काढण्यात येणार आहे. पहिलीच निवडणूक आहे, असे गृहीत धरून प्रभाग रचना व आरक्षण निश्चित करावे, असे आयोगाने स्पष्ट आदेश दिले आहेत. त्यानुसार महापालिका प्रशासनाने शहरातील लोकसंख्येनुसार आरक्षण काढले आहे. पूर्वी 81 प्रभाग असल्याने एसटी प्रवर्गासाठी आरक्षण मिळत नव्हते. परंतु, आता महापालिकेत प्रभाग संख्या वाढल्याने एसटी प्रवर्गासाठी जागा निर्माण झाली आहे.
त्रिसदस्य प्रभाग रचनेनुसार महापालिका निवडणूक पहिल्यांदाच होत आहे. त्यामुळे अनुसूचित जाती प्रवर्गासाठीचे आरक्षण लोकसंख्येनुसार काढावे, अशा सूचना राज्य निवडणूक आयोगाने केल्या आहेत. शहरातील सर्व प्रभागांची लोकसंख्या काढून त्यातील सर्वाधिक अनुसूचित जातीची लोकसंख्या असलेले सर्वाधिक बारा प्रभाग बाजूला काढण्यात येतील. ते प्रभाग लोकसंख्येच्या गुणानुक्रमे आरक्षित केले जाणार आहेत. एकूण 31 प्रभागांतील बारा जागा अनुसूचित जातीसाठी आरक्षित असतील. त्यातील सहा प्रभाग महिलांसाठी राखीव असतील. याच पद्धतीने शहरात एसटी प्रवर्गाची सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या प्रभागातील जागा एसटीसाठी राखीव असणार आहे.
मतदारांशी संपर्क साधण्यासाठी धडपड
दरम्यान, राज्य निवडणूक आयोगाला प्रारूप प्रभाग रचना सादर होणार असल्याने इच्छुक तयारीला लागले आहेत. कोणत्या प्रभागातून निवडणूक लढवायची हे नंतर पाहू… असे म्हणून मतदारांच्या संपर्कात राहण्यासाठी धडपडत आहेत. पूर्वी एक प्रभाग असल्याने दोन-चार गल्ल्या, तालीम संस्थांना हाताशी धरल्यावर सहज निवडून येण्याची हमी होती. पाच-सहा हजार मतदारांत एकगठ्ठा हजार-दीड हजार मतदार असलेला उमेदवार विजयाचा गुलाल उधळत होता. परंतु, आता तीन नगरसेवकांचा एक प्रभाग असणार आहे. सुमारे 17 ते 18 हजार मतदारांपर्यंत उमेदवारांना पोहोचावे लागणार आहे. त्यामुळे इच्छुक उमेदवारांची चांगलीच कसरत होत आहे.
महापालिकेतील एकूण 92 जागांपैकी महिलांसाठी 50 टक्के जागा आरक्षित राहतील. सर्वसाधारण प्रवर्गासाठी एकूण 79 जागा असून, त्यापैकी 40 जागांवर महिलांचे आरक्षण असेल. अनुसूचित जातीच्या 12 पैकी 6 जागा महिलांसाठी राखीव राहतील. अनुसूचित जमातीसाठी 1 जागा असल्याने या जागेवर महिला-पुरुष दोघेही निवडणूक लढवू शकतील.
या महिन्यातच आरक्षण सोडत शक्य
31 प्रभागांतील 12 जागा अनुसूचित जातीसाठी
इच्छुक उमेदवारांची चांगलीच कसरत
महिलांसाठी 50 टक्के जागा आरक्षित