कोल्हापूर महापालिका : नवे सरकार नवी समीकरणे!

कोल्हापूर महापालिका : नवे सरकार नवी समीकरणे!

कोल्हापूर, सतीश सरीकर : महाराष्ट्राच्या राजकारणात रोज नवनवीन घटना घडत आहेत. त्याचे पडसाद कोल्हापुरातही उमटत आहेत. आता एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री झाल्याने महापालिका निवडणुकीची राजकीय समीकरणे बदलणार आहेत. सध्या तरी काँग्रेस-राष्ट्रवादीविरुद्ध भाजप-ताराराणी आघाडी यांच्यातच काटाजोड लढती होण्याची शक्यता आहे. सध्याच्या राजकीय घडामोडींतून शिवसेना कशी बाहेर पडते? यावर त्यांचे महापालिका लढतीतील स्थान ठरणार आहे. 

काँग्रेसचे नेते व माजी पालकमंत्री सतेज पाटील, राष्ट्रवादीचे नेते व माजी ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी स्वबळावर निवडणूक लढविणार असल्याचे जाहीर केले होते. एकहाती सत्तेसाठी दोन्ही पक्षांचा प्रयत्न आहे. परंतु, राजकीय समीकरणे बदलली आहेत. राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार कोसळले आहे. शिवसेनेतून फुटून स्वतंत्र गट तयार केलेले एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले आहेत. भाजपने त्यांना पाठिंबा दिला आहे. सद्यस्थितीत काँग्रेस, राष्ट्रवादी व शिवसेना हे महाविकास आघाडीतील घटकपक्ष स्थानिक स्वराज्य संस्थांत एकत्रित लढणे अशक्य आहे.

महापालिकेवर 2010 पासून काँग्रेस-राष्ट्रवादीची सत्ता आहे. स्वतंत्रपणे लढून नंतर दोन्ही पक्ष एकत्रित येऊन सत्ता स्थापन केली होती. 2015 च्या निवडणुकीत काँग्रेस व राष्ट्रवादीने मैत्रीपूर्ण लढती लढल्या होत्या. 81 नगरसेवकांच्या सभागृहात काँग्रेस 30 जागांसह सर्वात मोठा पक्ष बनला. बहुमताचा आकडा न गाठल्याने 14 जागांवर विजय मिळविलेल्या राष्ट्रवादीबरोबर आघाडी केली. ताराराणी आघाडीने 19 जागा, तर भाजपने 14 जागा मिळविल्या होत्या.

शिवसेनेचे अवघे 4 नगरसेवक निवडून आले होते. भाजप-ताराराणी आघाडीने शिवसेनेला हाताशी धरून सत्तापालट करू नये, यासाठी काँग्रेस-राष्ट्रवादीनेच शिवसेनेला सत्तेत सहभागी करून घेतले होते. राज्यात पहिल्यांदा कोल्हापुरात काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना यांची महाविकास आघाडी अस्तित्वात आली होती.

आता राज्यात पुन्हा भाजपची सत्ता आली आहे. त्यामुळे आता तरी भाजप महापालिकेची सत्ता काबीज करणार काय? असा प्रश्‍न आहे. भाजपची धुरा खा. धनंजय महाडिक यांच्यावर असेल. दुसरीकडे, कोल्हापूर शहर विधानसभा मतदारसंघ अस्तित्वात आल्यापासून त्यावर शिवसेनेचे वर्चस्व राहिले आहे. 1990 पासूनच्या सात निवडणुकांत पाचवेळा शिवसेनेने भगवा फडकावला आहे. परंतु, विधानसभा निवडणुकांत शिवसेनेला भरघोस मते देणारे मतदार महापालिका निवडणुकांत मात्र सेनेकडे पाठ फिरवितात, हे वास्तव आहे. त्यामुळेच शिवसेनेचे हाताच्या बोटावर मोजण्याइतपतच नगरसेवक निवडून येतात.

माजी आमदार राजेश क्षीरसागर, शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पवार व विजय देवणे यांची आता कुठे एकत्र येण्याची प्रक्रिया सुरू होती, तोपर्यंत शिवसेनेत उभी फूट पडली आहे. भविष्यात शिवसेना एकत्र राहणार की सध्याचीच स्थिती राहणार, यावर शिवसेनेचे महापालिकेतील अस्तित्व अवलंबून असेल.

2015-2020 चे बलाबल

काँग्रेस 30
राष्ट्रवादी 14
भाजप 14
ताराराणी आघाडी 19
शिवसेना 04

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news