कोल्हापूर; दिलीप भिसे : राजकीय आश्रय, काळ्या धंद्यांतील अमाप मिळकत अन् वर्चस्ववादाचा संघर्ष यातून कुख्यात आर. सी. गँग आणि भास्कर टोळीतील सूडचक्र पुन्हा धगधगू लागले आहे. प्रतिस्पर्धी टोळ्यांवरील हल्ले आणि थरारक पाठलाग यामुळे जवाहरनगर पुन्हा अशांत बनण्याचा धोका आहे. गुंडांच्या दहशतीमुळे कोल्हापूर शहरात पुन्हा टोळीयुद्धाची शक्यता आहे.
जवाहरनगर, नेहरूनगर, सुभाषनगरसह परिसर गोरगरीब, श्रमजीवी आणि कष्टकर्यांचा परिसर म्हणून ओळखला जातो. सर्व जातीधर्मांचे लोक येथे गुण्यागोविंदाने राहतात; मात्र राजकीय आश्रय आणि काळ्या धंद्यांतील वर्चस्वातून परिसरात गुन्हेगारी टोळ्यांचा उदय झाला. वर्चस्ववादातून हाणामार्या सुरू झाल्या. खुनी हल्ल्यांचे सत्र वाढू लागले. हातात नंग्या तलवारी घेऊन दहशत माजवली जाऊ लागली. गुंडगिरीतील वर्चस्ववादातून भरचौकात मुडदेही पडले. बघता-बघता परिसरात गुन्हेगारीचे साम—ाज्य वाढीला लागले आणि शांत असणारा जवाहरनगर परिसर धगधगू लागला.
पाठोपाठ दोघांची हत्या
गुंड राहुल चव्हाण याचा दि. 14 मार्च 2007 रोजी खून झाला. त्यानंतर पाठीराख्यांनी 'आरसी' गँगची स्थापना केली. सूडचक्रातून प्रतिस्पर्धी टोळीचा म्होरक्या अनिल भास्कर (डॉन) याची सात महिन्यांनी दि. 7 ऑक्टोबर 2007 रोजी लक्ष्मीपुरीत पाठलाग करून त्याची हत्या झाली. आरसी गँगने हत्या घडविल्याचा आरोप होता.
रक्तरंजित संघर्ष
दोन्हीही टोळ्यांत कुरघोड्या सुरू आहेत. खुन्नस, किरकोळ वादातूनही नंग्या तलवारीचे प्रदर्शन घडविले जाते. मारामारीच्या घटना तर येथे पाचवीला पुजल्या आहेत. वाढदिवसाचे केक तलवारीने कापण्याची फॅशन झाली आहे. केवळ दहशत माजविणे हा त्यामागचा उद्देश असतो.(पूर्वार्ध)
भास्करवर जीवघेणा हल्ला करणार्या आर.सी. गँगमधील गुन्हेगारांविरुद्ध गंभीर गुन्ह्यांचे रेकॉर्ड आहे. रवी शिंदे, प्रदीप कदम, सागर जाधव, प्रकाश कांबळेसह 9 जणांविरुद्ध 'मोका' अंतर्गत कारवाईचा प्रस्ताव दाखल करण्यात येत आहे.
– दत्तात्रय नाळे, पोलिस निरीक्षक, जुना राजवाडा पोलिस ठाणे