कोल्हापूर : बास्केट ब्रीजचे भूमिपूजन गडकरी यांच्या हस्ते शनिवारी

कोल्हापूर : बास्केट ब्रीजचे भूमिपूजन गडकरी यांच्या हस्ते शनिवारी

कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : पुणे-बंगळूर महामार्गावरून कोल्हापुरात प्रवेश करण्यासाठी बास्केट ब्रीज उभारण्यात येणार आहेत. त्याचे भूमिपूजन केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते शनिवार, दि. 28 रोजी होणार आहे. ही माहिती खासदार धनंजय महाडिक यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत दिली. कोल्हापूर-मुंबई मार्गावर 26 मार्चपासून नियमित विमानसेवा सुरू होणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

खा. महाडिक म्हणाले, पुणे-बंगळूर महामार्गावरून कोल्हापुरात प्रवेश करताना वाहतुकीची कोंडी होते. महापुरात ही कनेक्टिव्हिटीही तुटते. या सर्व पार्श्वभूमीवर कोल्हापुरात प्रवेश करण्यासाठी बास्केट ब्रीज उभारण्याचा निर्णय घेतला. पुणे-बंगळूर महामार्गावर सांगली फाटा ते शिरोली टोल नाका असा हा पूल असेल. या पुलाला कायमस्वरूपी विद्युत रोषणाई केली जाणार आहे. यामुळे हा बास्केट ब्रीज पर्यटकांसह कोल्हापूरच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरणार आहे. शनिवारी (दि. 28) सायंकाळी पाच वाजता नितीन गडकरी यांच्या हस्ते सांगली फाटा येथे या पुलाचे भूमिपूजन होणार आहे. दोन वर्षांत त्याचे काम पूर्ण होईल, असेही त्यांनी सांगितले.

कोल्हापूर-मुंबई मार्गावर 26 मार्चपासून इंडिगो कंपनीची दररोज विमानसेवा सुरू होत असल्याचे सांगत खा. महाडिक म्हणाले, सकाळी साडेदहा वाजता विमानाचे कोल्हापुरातून मुंबईसाठी टेकऑफ होईल. मुंबईहून दुपारी चार वाजता कोल्हापूरसाठी टेकऑफ होईल. मात्र, हे विमान मुंबईहून रात्री सात वाजता कोल्हापूरसाठी टेकऑफ व्हावे याकरिता प्रयत्न सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले. या विमानसेवेमुळे कोल्हापुरातून मुंबईसाठी दोन विमानसेवा उपलब्ध होणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news