कोल्हापूर : निकाल राज्यसभेचा… चर्चा लोकसभेची

कोल्हापूर : निकाल राज्यसभेचा… चर्चा लोकसभेची

कोल्हापूर ; चंद्रशेखर माताडे : लोकसभा निवडणुकीसाठी अद्याप दोन वर्षांचा कालावधी असला, तरी इच्छुकांची चर्चा आतापासूनच सुरू झाली आहे. धनंजय महाडिक हे भाजपचे उमेदवार राज्यसभेवर निवडून आल्याने या चर्चेला वेग आला आहे.

2014 च्या निवडणुकीत संजय मंडलिक यांना पराभूत करून धनंजय महाडिक हे राष्ट्रवादीच्या तिकिटावर कोल्हापूर मतदारसंघातून लोकसभेत पोहोचले. पुढे त्यांचा राष्ट्रवादीचेच मंत्री हसन मुश्रीफ यांच्याशी संघर्ष झाला. सतेज पाटील आणि धनंजय महाडिक यांच्यातील राजकीय वैरही टोकाला गेले होते. 2014 च्या लोकसभा निवडणुकीत मदत करूनही सहा महिन्यांनी झालेल्या विधानसभा निवडणुकीत अमल महाडिक हे भाजपच्या तिकिटावर उभारले व त्यांनी पाटील यांना पराभूत केले. त्यामुळे हा संघर्ष अधिकच धारदार बनला.

'आमचं ठरलंय'

2019 च्या निवडणुकीत राष्ट्रवादीने अपेक्षेप्रमाणे धनंजय महाडिक यांना उमदेवारी दिली. मात्र, पराभवाचा वचपा काढण्यासाठी सतेज पाटील यांनी 'आमचं ठरलंय'चा नारा दिला व तो राज्यात चर्चेचा विषय ठरला. या निवडणुकीत शिवसेनेने संजय मंडलिक यांना उमेदवारी दिली होती. काँग्रेस आणि राष्ट्रवादीतील ताकद त्यांच्या मागे उभी ठाकली आणि धनंजय महाडिक यांचा तब्बल 2 लाख 70 हजार मतांनी पराभव झाला. संजय मंडलिक यांनी पराभवाचा वचपा काढला तरी सतेज पाटील हेच या विजयाचे मानकरी ठरले.

मंडलिकांविरोधात कोण? याची आतापासूनच चर्चा

आता दोन वर्षांनी लोकसभा निवडणूक होऊ घातली आहे. पूर्वाश्रमीचे राष्ट्रवादीचे धनंजय महाडिक आता भाजपचे राज्यसभेचे खासदार आहेत. त्यामुळे महाविकास आघाडीचे उमेदवार संजय मंडलिक यांच्याविरुद्ध कोण लढणार? या चर्चेला ऊत आला आहे.

महाविकास आघाडीच्या विरोधात भाजपकडून कोण लढणार, की भाजप कुणाला आपला पुरस्कृत करणार? याचीही चर्चा आहे; पण ज्याप्रकारे भाजपचा आपल्या चिन्हावरच लढले पाहिजे, असा आग्रह असतो, त्याअर्थी भाजपच्या चिन्हावरच उमेदवार लढणार, हे स्पष्ट आहे.

चंद्रकांत पाटील हे भाजपचे प्रदेशाध्यक्ष आहेत. ते कोल्हापूरचे असल्यामुळे त्यांच्या नावाची चर्चा सुरू झाली आहे. त्याचबरोबर भाजपचे जिल्हाध्यक्ष समरजितसिंह घाटगे यांचे नाव चर्चेत आले आहे. चंद्रकांत पाटील यांच्यासमोर विधानसभा आणि लोकसभा, असे दोन पर्याय आहेत. सध्या ते पुण्यातील कोथरूडमधून विधानसभेवर निवडून गेले आहेत. ते राज्यसभेत जाणार, अशीही चर्चा होती; पण महाडिक यांच्या राज्यसभा प्रवेशाने या चर्चेला पूर्णविराम मिळाला आहे. तर समरजितसिंह घाटगे हे कागलमधून विधानसभेसाठी इच्छुक आहेत. त्यांना लोकसभेला स्वारस्य नाही.

संभाजीराजे 'स्वराज्य'कडून लढणार?

संभाजीराजे यांच्याही नावाची चर्चा असली, तरी त्यांनी स्वतःची 'स्वराज्य' ही संघटना स्थापन केली आहे. भविष्यात या संघटनेच्या माध्यमातून निवडणुका लढविण्याचा मनोदय त्यांनी यापूर्वीच जाहीर केला आहे. त्यामुळे या संघटनेमार्फत ते लोकसभेच्या आखाड्यात उतरले, तर भाजप त्यांना पाठिंबा देणार का? हा प्रश्न आहे. त्याचबरोबर संभाजीराजे हे संघटनावाढीसाठी राज्यभर फिरणार की, निवडणुकीच्या आखाड्यात उतरणार, हे त्यांनी अद्याप स्पष्ट केलेले नाही.

माने यांच्याविरोधात आवाडे की शेट्टी

हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सर्वेसर्वा राजू शेट्टी यांना हादरा देऊन निवडून आलेल्या धैर्यशील माने यांच्याविरोधात कोण, याचीही चर्चा सुरू झाली आहे. ताराराणी पक्ष स्थापन करून भाजपला पाठिंबा देणारे प्रकाश आवाडे किंवा राहुल आवाडे लोकसभेसाठी भाजपचे उमेदवार होऊ शकतात. धैर्यशील माने यांच्याविरोधात तरुण उमेदवार म्हणून राहुल आवाडे यांचा विचार होऊ शकतो, अशीही चर्चा आहे.

त्याचबरोबर राजू शेट्टी यांचाही पूर्वीचा मतदारसंघ असल्याने त्यांचेही नाव चर्चेत असणार, हे उघड आहे. शेट्टी नेमके लढणार कोणाकडून, याची चर्चा आहे. त्यांच्या 2014 च्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचार सभेला नरेंद्र मोदी आले होते. त्यानंतर त्यांनी भाजपशी फारकत घेतली. 2019 च्या निवडणुकीत त्यांना काँग्रेस, राष्ट्रवादी आघाडीने पाठिंबा दिला. मात्र, ते शिवसेनेचे धैर्यशील माने यांच्याकडून पराभूत झाले.

त्यानंतर महाविकास आघाडीकडून त्यांच्या नावाची शिफारस राज्यपाल कोट्यातून विधान परिषदेसाठी करण्यात आली. मात्र, त्या यादीला राज्यपालांनी मान्यता दिली नाही. महाविकास आघाडीशीही त्यांचे बिनसल्यावर त्यांनी राज्यपालांची भेट घेऊन आपले नाव यादीतून वगळा, अशी विनंती केली. भावी काळात राजू शेट्टी हे महाडिक-आवाडे-कोरे गटाशी जुळवून घेतील, अशी चर्चा आहे. तसे झाले तर तेच उमेदवार असू शकतील.

महाडिक-कोरे-आवाडे-शेट्टी एकत्र?

धनंजय महाडिक यांच्या विजयाने जिल्ह्यातील भाजपच्या आघाडीला बळ आले आहे. भाजपला पाठिंबा दिलेले विनय कोरे, प्रकाश आवाडे हे आता धनंजय महाडिक यांच्यासमवेत एकत्र येतील. राजू शेट्टी यांनी भाजपबरोबरच महाविकास आघाडीच्या विरोधातही भूमिका जाहीर केली आहे. सध्या ते या दोन्ही बाजूंकडून समान अंतरावर असले, तरी भावी काळात त्यांना काही निर्णय घ्यावा लागला; तर ते काय करणार? याबरोबरच ते भाजपशी जुळवून घेतील, अशीही चर्चा आहे. मात्र, लोकसभेसाठी आवाडे घराण्यातील व्यक्ती इच्छुक असेल; तर शेट्टी यांना पहिल्यांदा जिल्ह्यातील आघाडीअंतर्गत सामन्याला तोंड द्यावे लागणार आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news