कोल्हापूर : दीपावली सणाचा आज मुख्य दिवस

कोल्हापूर : दीपावली सणाचा आज मुख्य दिवस
Published on
Updated on

कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : 'ईडा-पीडा टळू दे, बळीचे राज्य येऊ दे' अशा शुभेच्छा घेऊन येणारा सण म्हणजे दीपावली. बळीराजाच्या भारतीय कृषी संस्कृतीचा आविष्कार म्हणजे दीपोत्सव. शुक्रवारी वसुबारसने या दीपोत्सवाची सुरुवात झाली. शनिवार व रविवारी सर्वत्र धनत्रयोदशीही उत्साहात साजरी करण्यात आली. प्रकाशपर्वाचा जल्लोषी प्रारंभ दोन दिवसांपूर्वीच झाला असला तरी दिवाळीचा मुख्य दिवस सोमवारी साजरा होत आहे. यामुळे या दिवशी नरकचतुर्दशीला मंगलस्नान आणि सायंकाळी श्री लक्ष्मी-कुबेर पूजन होणार आहे. याची जय्यत तयारी घरोघरी करण्यात आली आहे.

दिवाळी सणातील महत्त्वाच्या नरकचतुर्दशी आणि लक्ष्मी-कुबेर पूजनाचा योग गतवर्षीप्रमाणेच यंदाही एकत्र आला आहे. नरकचतुर्दशीच्या दिवशी पहाटे उठून सूर्योदयापूर्वी अभ्यंगस्नान करण्याची प्रथा आहे. तेल, उटणे अंगाला लावून आपल्यातील नरकरूपी पाप वासनांचा नायनाट व अहंकाराचे उच्चाटन करायचे. तेव्हाच आत्म्यावरील अहंचा पडदा दूर होऊन आत्मज्योत प्रकाशित होईल, अशी या मागची भावना आहे.

अभ्यंगस्नान झाल्यावर देवाचे दर्शन आणि आई-वडिलांचे आशीर्वाद घेतल्यानंतर सर्वत्र समृद्धी व्हावी याकरिता पणत्या लावल्या जातात. यानंतर देवाला फराळ व गोडधोडाचा नैवेद्य दाखवतात. सायंकाळी घरोघरी आणि व्यापारी पेढ्यांवर लक्ष्मीपूजनाचा सोहळा होतो. पाटावर रांगोळी काढून तांदूळ ठेवतात. त्यावर वाटी किंवा तबक ठेवून त्यात सोन्याचे दागिने, चांदीचा रुपया, दागिने ठेवून त्यांची पूजा केली जाते. या दिवशी स्वच्छता करण्यासाठी लागणारी नवी केरसुणी विकत घेतात. लक्ष्मी रूपाने तिच्यावर पाणी घालून हळद-कुंकू वाहून घरात वापरण्यास सुरुवात केली जाते. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी अलक्ष्मीचा नाश व्हावा, ही यामागची संकल्पना आहे.

विविध वस्तूंची खरेदी

दरम्यान, दिवाळीचा मुख्य दिवस व लक्ष्मी-कुबेर पूजनासाठी आवश्यक साहित्यांच्या खरेदीसाठी रविवारी लोकांनी सर्वच बाजारपेठांत मोठी गर्दी केली होती. बालचमूंसाठी नवनवीन कपडे, फटाके, आकाशदिवे, पणत्या, तयार फराळ, विविध भेटवस्तू, लक्ष्मी-कुबेर फोटो व मूर्ती, कलश, झेंडूची फुले, लाह्या-बत्तासे, धने, पेढे, चोपडी-हिशेबासाठीच्या वह्या, सप्तरंगी रांगोळ्या यासह विविध प्रकारच्या वस्तूंची खरेदी करण्यात आली.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news