कोल्हापूर : दामदुपटीला भुलले गुंतवणूकदार फसले!

कोल्हापूर : दामदुपटीला भुलले गुंतवणूकदार फसले!

कोल्हापूर, दिलीप भिसे : दामदुप्पट परताव्यांच्या आमिषाने फसवणुकीच्या एकापाठोपाठ एक घटना चव्हाट्यावर येत आहेत. शाहूपुरी परिसरात सात वर्षांपासून बेधडक सुरू असलेली दरमहा दहा ते पंधरा टक्के दामदुपटीची योजना दीड लाखांवर गुंतवणूकदारांच्या मुळांवर उठली आहे. आर्थिक चक्रात अडकलेल्या कंपनीने ऑगस्ट 2022 पासून आजअखेर परतावाच नव्हे तर मुद्दलही देण्याचे बंद केल्याने गुंतवणूकदार चिंताक्रांत बनले आहेत. गुंतवलेली रक्कम पदरात पाडून घेण्यासाठी कार्यालयाचे उंबरे झिजवू लागले आहेत.

कोल्हापूरसह सांगली, सातारा, सोलापूर, मुंबई, पुणे तसेच कर्नाटक, गोवा, मध्य प्रदेशातही व्याप्ती असलेल्या कंपनीकडे पश्चिम महाराष्ट्रातून सर्वात मोठी गुंतवणूक झाल्याचे चित्र आहे. दीड लाखावर गुंतवणूकदारांसह दहा हजारांपेक्षा अधिक एजंटाची साखळी कार्यरत असलेल्या कंपनीची सुमारे साडेचार हजार कोटीपेक्षा अधिक उलाढाल असल्याचे समजते. कंपनीचा सर्वेसर्वा तथा मॅनेजिंग डायरेक्टरने काही काळापासून कोल्हापूरकडे पाठ फिरवली आहे.

चौथी नापास गोल्डनमॅनची लाखोंची मलई !

पुणे-बंगळूर महामार्गावरील आठ-दहा हजार लोकवस्तीच्या गावातील 35 वर्षीय करोडपती एजंटांच्या मिळकतीची कथा… आठ वर्षांपूर्वी फौंड्री कामगार म्हणून दहा-बारा हजारावर राबत होता. कर्ज वसुलीसाठी बँकांचा त्याच्याकडे तगादा सुरू होता. घराच्या लिलावाची प्रक्रिया सुरू झाली होती. घर वाचविण्यासाठी प्रयत्न सुरू होते. त्यात जून 2016 मध्ये नोटबंदी झाली. जुन्या नोटा खपविण्यासाठी सार्‍यांचीच धडपड… अल्पकाळात दामदुप्पट कमाई देणार्‍या शाहूपुरी येथील कंपनीचा त्याला सुगावा लागला. मॅनेजिंग डायरेक्टरच्या भेटीनंतर तो कामाला लागला. शेकडो जणांच्या नोटा त्याने थेट कंपनीत गुंतविल्या. अल्पकाळात त्याचे टार्गेट पूर्ण झाले. तो करोडपती बनला. स्वत:ची साखळी करून त्याने फ्रेंचायझी घेतली. जुलै 2022 अखेरपर्यंत त्याची दरमहा 22 लाखांची कमाई होती. अंगावर अर्धा किलो सोने, दिमतीला आलिशान मोटार… गोल्डन मॅन म्हणून ओळखला जाऊ लागला आहे.

काठमांडूतील हॉटेलात कोट्यवधींचा चुराडा

कंपनीचा सर्वेसर्वा तथा मॅनेजिंग डायरेक्टरचा वाढदिवस म्हणजे एजंटांसाठी पर्वणी असते. लॉकडाऊननंतर निर्बंध शिथिल झाल्याने गतवर्षी जुलै 2022 मध्ये काठमांडू (नेपाळ) येथील पंचतारांकित हॉटेलमध्ये वाढदिवसाचा शाही सोहळा पार पडला. कोल्हापूर, सांगली, सातारा, पुणे, मुंबईसह कर्नाटक, गोवा, दिल्ली, मध्य प्रदेश, गुजरात येथील एक हजारावर प्रमुख एजंटांना निमंत्रित करण्यात आले होते. तीन दिवस रंगलेल्या शाही सोहळ्यांवर कोट्यवधीचा चुराडा करण्यात आल्याची चर्चा आहे.

सौभाग्यवतींच्या नावे गुंतवणूक!

शासकीय कचेर्‍यात मोठ्या पगाराच्या नोकर्‍या करणार्‍या अधिकारी, कर्मचार्‍यांनाही अल्पकाळात मिळणार्‍या दामदुपटीचा मोह नडला. महिन्यापूर्वी शाहूपुरी पोलिस ठाण्यातील एका कर्मचार्‍याने कंपनीतील देवघेवीच्या वादातून एजंटाला मारहाण करून संबंधितांकडून धनादेश घेतले. विशेष म्हणजे हा सारा प्रकार पोलिस ठाण्यात घडला. संबंधिताने पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे यांच्याकडे लेखी तक्रारही केली आहे. सरकारी कचेर्‍यातल्या बाबूंनी दक्षता घेत सौभाग्यवतींच्या नावे उलाढाली केल्याचे समजते.
(उत्तरार्ध)

फोर व्हीलर, टू व्हीलर गिफ्ट!

कंपनीची तिजोरी झटपट भरण्यासाठी एजंटांसह गुंतवणूकदारांना विविध आकर्षक व भेटवस्तूद्वारे भुरळ घालण्यात येत असते. 15 लाखांच्या गुंतवणुकीवर चारचाकी, 10 लाखाला दुचाकी तर 5 लाखांसाठी मोपेड गिफ्ट दिली आहे. अडीच हजारावर चारचाकी, साडेतीन हजारावर दुचाकी तसेच साडेचार हजारावर मोपेडचे साखळीला वाटप केल्याने अल्पावधीत कंपनीने साडेपाच हजार कोटींचा टप्पा ओलांडला आहे. शिवाय कोट्यवधीची उलाढाल देणार्‍या साखळीला कुटुंबीयांसह बँकॉक, श्रीलंका, मलेशिया, दुबईसह अन्य देशाची परदेशवारी घडवली आहे.

नोटाबंदीनंतर झपाट्यात अडीचशे कोटींची उलाढाल!

अल्पकाळात दामदुप्पट, एव्हाना तिप्पट कमाईच्या आमिषाचे गाजर दाखविणार्‍या कंपन्यांच्या कमाईचा धंदा नोव्हेंबर 2016 मध्ये वाढीला लागला. या काळात नोटाबंदी झाल्यानंतर हजार आणि पाचशेंच्या जुना नोटा खपविण्यासाठी सार्‍यांचीच धावपळ उडाली. एजंटांसह साखळीने नेमके त्याचाच फायदा उठविला. गुंतवणूकदारांना दामदुपटीचे गाजर दाखवून त्यांनाही गुंतवणूक करण्यास भाग पाडले. या काळात कंपनीच्या शाहूपुरी येथील मुख्यालयासह तालुक्याच्या ठिकाणी असलेल्या सर्वच कार्यालयांत रांगा लागल्याचे चित्र होते. अवघ्या काही दिवसात अडीचशे कोटीपेक्षा जादा रक्कम कंपनीच्या तिजोरीत जमा झाल्याचे सांगण्यात येते.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news