कोल्हापूर : दरवाढ होत नसल्याने ऑईल कंपन्यांकडून अपुरा इंधन पुरवठा

कोल्हापूर : दरवाढ होत नसल्याने ऑईल कंपन्यांकडून अपुरा इंधन पुरवठा

कोल्हापूर ; सचिन टिपकुर्ले : कच्च्या तेलाच्या वाढत्या दरामुळे ऑईल कंपन्यांना सध्याच्या दराने इंधन विक्री करणे परवडत नाही. त्यामुळे पुरवठा कमी करून तोटा कमी करण्याच्या कंपन्यांच्या धोरणात्मक निर्णयामुळे अनेक पेट्रोल पंपांवर इंधनाचा अपुरा पुरवठा केला जात आहे. महाराष्ट्रात अद्याप ही स्थिती नसली तरी मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, हरियाणा व पंजाब, गुजरातमध्ये इंधनाचा तुटवडा जाणवत आहे. केंद्र सरकारने हस्तक्षेप करण्याची मागणी पेट्रोल पंप असोसिएशनने केली आहे.

2014 पूर्वी दर पंधरा दिवसांनी इंधनाच्या दरात बदल होत होते. आता इंधनाचे दर ठरविण्याचे अधिकार ऑईल कंपन्यांना दिल्यामुळे कंपन्यांनी वाढवलेल्या दराचा फटका ग्राहकांना बसत आहे. रशिया व युक्रेन युद्धाने त्यामध्ये भर घातली आहे.

केंद्र सरकारने अबकारी करात काही प्रमाणात कपात करून दिलासा देण्याचा प्रयत्न केला. अचानक घेतलेल्या या निर्णयाचा फटका पंप चालकांना बसला. त्यांनी ऑईल कंपन्यांकडून जादा दराने इंधन खरेदी करून कमी दराने विक्री केली. या दरम्यान केंद्र सरकारने इंधन दरवाढ न करण्याबाबत ऑईल कंपन्यांना अप्रत्यक्ष सूचना दिल्या आहेत. त्यामुळे पेट्रोलियम कंपन्यांचा तोटा वाढत आहे. त्यांनी इंधनाचे दर वाढवण्याची परवानगी केंद्र सरकारकडे मागितली आहे. त्यातच गेल्या चार आठवड्यांपासून इंधनाच्या दरात काहीही बदल झालेला नाही. ऑईल कंपन्या सरकारच्या या धोरणावर नाराज आहेत.

आंतरराष्ट्रीय पातळीवर कच्च्या तेलाच्या किमतीत सतत वाढ होत आहे. रोजचा तोटा सहन करण्यासाठी ऑईल कंपन्यांनी पुरवठा कमी करण्यावर भर दिला आहे. अहमदाबादमध्ये गेल्या दोन-तीन दिवसांपासून 50 टक्केच पुरवठा होत आहे. राजस्थानमध्ये पेट्रोल, डिझेल टंचाई सुरू झाली आहे. हायवे तसेच शहरात अजून टंचाई निर्माण झालेली नाही. पण ग्रामीण भागात काही ठिकाणी पेट्रोल संपले असल्याचे फलक दिसत आहेत.

विदर्भात काही पंप चालकांच्या तक्रारी

विदर्भात काही पंप चालकांनी याबाबत ऑईल कंपन्यांकडे तक्रारी केल्या आहेत. दोन दिवसांपूर्वी देशातील प्रत्येक राज्याच्या पेट्रोल असोसिएशनच्या अध्यक्षांची झूम मिटिंग झाली. यामध्ये इंधन टंचाईची झळ अजून महाराष्ट्राला बसली नाही. पण केंद्र सरकारने यात तत्काळ हस्तक्षेप करून इंधन पुरवठा सुरळीत करण्यासाठी पेट्रोलियम कंपन्यांना सूचना देण्याची मागणी करण्यात येणार असल्याचे महाराष्ट्र पेट्रोल, डिझेल असोसिएशनचे अध्यक्ष उदय लोध यांनी सांगितले.

पेट्रोलियम कंपन्यांचे नुकसान

कच्च्या तेलाच्या दरवाढीने पेट्रोलियम कंपन्यांना डिझेलमागे 21 आणि पेट्रोलमागे 14 रुपयांचे नुकसान होत आहे. यामुळे त्यांनी पुरवठा कमी केला आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news