कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : गोरज मुहूर्तावरील गोवत्स पूजनाने चैतन्यमय अशा दीपावलीच्या प्रकाशपर्वाची शुक्रवारी जल्लोषात नांदी झाली. संपूर्ण शहर आणि जिल्हा विद्युत रोषणाईने झगमगत असून घरापुढील पणत्या आणि दिव्यांची आरास लक्षवेधक ठरत आहे. घराघरांतून दीपावली फराळाची तयारी अंतिम टप्प्यात आहे, तर तयार फराळाच्या खरेदीसाठी गर्दी होत आहे.
अंबाबाई मंदिरसह शहरात विविध ठिकाणी वसुबारसनिमित्त धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. दीपावलीच्या खरेदीसाठी बाजारपेठेत प्रचंड लगबग आहे. कपडे खरेदीसाठी झुंबड होत आहे. दिवसभर बाजारपेठा गर्दीने फुलून गेल्या होत्या. रात्री उशिरापर्यंत बाजारपेठेत गर्दी होती. व्यापारपेठा सुरू होत्या.
सायंकाळी आणि रात्री अकराच्या सुमारास पावसाने हजेरी लावली, तरी नागरिकांच्या उत्साहावर त्याचा फारसा परिणाम जाणवला नाही. बाजारात विविध साहित्याच्या खरेदीची उलाढाल वाढली आहे. शनिवारी (दि. 22) धनत्रयोदशी असून पूजा साहित्याची खरेदी सुरू होती. सोमवार, दि. 24 रोजी नरकचतुर्दशी व लक्ष्मीपूजन आहे. लक्ष्मीपूजनाच्या तयारीसाठी फुले, फुलांच्या माळा, आंब्याची तोरणे, केळी आणि कर्दळी, नारळाच्या झावळ्या, ऊस यांसह अन्य साहित्यांनी बाजारपेठा सजल्या आहेत.