कोल्हापूर : जुगारी अड्ड्यांवर कोट्यवधीची उलाढाल!

कोल्हापूर : जुगारी अड्ड्यांवर कोट्यवधीची उलाढाल!

कोल्हापूर ; दिलीप भिसे : लॉकडाऊन काळात काळ्या धंद्यातील विस्कटलेली घडी 'अनलॉक'मध्ये पूर्वपदावर आली आहे. काळ्या धंद्यातील उलाढालीवर अवलंबून असलेल्या साखळीला पुन्हा सुगीचे दिवस आले आहेत. दिवाळीच्या धामधुमीत चार दिवसांत शहर व जिल्ह्यातील साडेचारशेवर तीनपानी जुगारी अड्ड्यांवर सुमारे 750 कोटींची उलाढाल झाल्याचे समजते. ओपन बारही रात्रंदिवस फुलले आहेत.

दिवाळी म्हणजे काळे धंदेवाल्यांसाठी कमाईची पर्वणी ठरते. वर्षभर 'चोरी चोरी… छुपके छुपके' चालणारे तीन पानी जुगारी अड्डे या काळात राजरोस सुरू राहतात. 'चिरीमिरी'ला सोकावलेल्या 'कलेक्शन'वाल्यांकडून जुगारी अड्ड्यांसाठी मूक संमती दिली जाते. यंदाच्या दिवाळीत शहर, उपनगरांसह ग्रामीण भागात तीन पानी जुगारी अड्ड्यांचे पेवच फुटले होते. बाजारपेठांतही तीन पानी, अंदर बाहर आणि रमीचे डाव रंगले होते.

सीमा भागातील अड्ड्यांवर गर्दी

दिवाळीच्या धामधुमीत सीमाभागातील बहुतांशी जुगारी अड्ड्यांवर रात्रंदिवस वर्दळ दिसून येत होती. कर्नाटकातील गर्भश्रीमंत मंडळींचा तळ पडलेला असतो. रंगेल मेजवानीसह म्हणेल त्या सुविधांची पूर्तता हे जुगारी अड्ड्यांच्या मालकांचे खास वैशिष्ट्य! पेगच नव्हे… फुल्ल तुंब्याचीही मोफत सुविधा… शहरापेक्षा सीमाभागातील जुगारी अड्ड्यांवर लाखाचे डाव रंगतात. आजरा, चंदगड परिसरात रविवारी पहाटेपर्यंत डाव रंगले होते.

जुजबी कारवाईमुळे गुन्हेगार मोकाट

दिवाळीपूर्वी शहर, जिल्ह्यात शंभर-सव्वाशेवर अड्ड्यांवर पोलिसांनी धडाधड छापे टाकले. कारवाईच्या बातम्याही झळकल्या. पण आठ-दहा दिवसांपासून जिल्ह्यातील बहुतांशी अड्ड्यांवरील माहौल पोलिस ठाण्यांतर्गत 'डीबी' पथकाच्या नजरेला आला नाही का? या काळात एखादी ठळक कारवाई झालेली दिसून येत नाही. केवळ जुजबी कारवाईमुळे काळे धंदेवाल्यांवर धाक राहिलेला नसल्याचे दिसून येते.
ओपन बार… तस्करांसाठी लाख मोलाची दिवाळी !

काळे धंदेवाल्यासह दारू तस्करांनाही यंदाची दिवाळी लाखमोलाची ठरली आहे. 'ओपन बार'साठी ओळखली जाणारी निर्जन ठिकाणे सायंकाळनंतर तळीरामांनी फुललेली असतात. दारू तस्करांनी 'जागेवर पोहोच' करण्याची सर्व्हिस सुरू केल्याने मध्यरात्रीपर्यंत ओपन बार बिनधास्त सुरू आहेत. पाणी बॉटल्सपासून स्नॅकचीही व्यवस्था करण्यात आली आहे. त्यामुळे हॉटेल्स, बारपेक्षा ओपन बारची चलती सुरू झाली आहे. दुपारनंतर नदीकाठांना जत्रेचे स्वरूप येत आहे.

…येथील अड्ड्यांवर होते लाखोंची उलाढाल

रंकाळा टॉवर, फुलेवाडी, शिवाजी पुल, हॉकी स्टेडीयम, शेंडापार्क, जवाहरनगर, राजेंद्रनगर, शेंडापार्क, मोरेवाडी, चित्रनगरी परिसर, कळंबा, शिंगणापूर, उजळाईवाडीसह इचलकरंजी, शहापूर, कबनूर, तारदाळ, यड्राव, शिरोळ, जयसिंगपूर, कुरूंदवाड, वडगाव परिसरात दोनशेवर तसेच आजरा, चंदगड, राधानगरी, भुदरगड, शाहूवाडी परिसरात अडीचशेवर अड्ड्यांवर लाखोंची उलाढाल होते.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news