कोल्हापूर; पुढारी वृत्तसेवा : डिसेंबर 2022 पर्यंत मुदत संपणार्या जिल्ह्यातील 475 ग्रामपंचायतींच्या निवडणुकीची ( gram panchayat election ) प्रशासनाची तयारी सुरू झाली आहे. या ग्रामपंचायतींच्या प्रभाग रचनेचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयात प्रभाग रचना निश्चित करण्याचे प्राथमिक काम सुरू होते.
राज्य निवडणूक आयोगाने डिसेंबर 2022 पर्यंत म्हणजे पुढच्या वर्षी मुदत संपणार्या सर्वच ग्रामपंचायत निवडणुकीसाठी ( gram panchayat election ) प्रभाग रचनेचा कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यानुसार जिल्ह्यातील 475 ग्रामपंचायतींच्या प्रभाग रचनेचे प्रारूप प्रस्ताव तयार करण्यात आले आहेत. या प्रस्तावांची दिवसभर जिल्हाधिकारी कार्यालयात छाननी सुरू होती.
तहसीलदार रंजना बिचकर, सरस्वती पाटील व मैम्मुनिसा संदे आणि नायब तहसीलदार संजय वळवी, संजय मधाळे यांच्या पथकांकडून या 475 ग्रामपंचायतींच्या ( gram panchayat election ) प्रभाग रचना तपासणीचे काम दिवसभर सुरू होते. शनिवारीही (दि.18) हे काम सुरू राहणार आहे.
गेल्या निवडणुकीवेळी असलेली प्रभाग रचना, त्यानुसार प्रभागाचे आरक्षण, सध्याची लोकसंख्या आदींचा विचार करून प्रभाग रचनेची तपासणी केली जात आहे. प्रभाग रचनेचे काम झाल्यानंतर आरक्षण काढले जाणार आहे. ही सर्व प्रक्रिया जानेवारीअखेर पूर्ण होणार आहे. यानंतर जिल्हाधिकारी प्रारूप प्रभाग रचना प्रसिद्ध करतील. त्यानंतर संबंधितांना प्रभाग रचनेवर हरकत घेता येणार आहे.
ओबीसी आरक्षणाबाबत आदेश नाहीत ( gram panchayat election )
ही प्रभाग रचना करताना ओबीसी आरक्षण गृहीत धरून करण्यात आली आहे. त्याबाबत अद्याप आदेश आलेले नाहीत. ओबीसी धरून आणि वगळून अशा दोन्ही पद्धतीने प्रभाग रचनेची माहिती तयार करण्यात आली आहे. न्यायालयाने ओबीसी आरक्षण रद्द केल्यानंतर राज्य निवडणूक आयोगानेही ओबीसी आरक्षण रद्द करून त्या जागा सर्वसाधारण प्रवर्गाला देण्याचे आदेश दिले आहेत. यामुळे या प्रभाग रचनेत काय निर्णय घेणार, याकडेही लक्ष लागले आहे.