कोल्हापूर जिल्ह्यातील नाकेबंदी भेदून कोट्यवधींची दारू तस्करी

कोल्हापूर जिल्ह्यातील नाकेबंदी भेदून कोट्यवधींची दारू तस्करी
Published on
Updated on

कोल्हापूर ; दिलीप भिसे : आरोग्याला घातक ठरणार्‍या भेसळ आणि गोवा बनावटीच्या दारूचा जिल्ह्याला रतीबच लागला आहे. महामार्गांसह जिल्ह्याच्या चारही प्रमुख सीमांवर रात्रंदिवस कडेकोट सुरक्षा यंत्रणा कार्यान्वित असतानाही तस्करीतून आठवड्याला सरासरी चार ते पाच कोटींची उलाढाल होत आहे. आर्थिक मोहाला सोकावलेल्या कच्च्या दुव्यांमुळे तस्करी टोळ्यांनी सुरक्षा यंत्रणा अक्षरश: खिळखिळी करून सोडली आहे.

ऑगस्ट 2021 ते 15 जुलै 2022 या काळात 81 छाप्यांत 102 तस्करांना बेड्या ठोकून 2 कोटी 64 लाखांची दारू हाताला लागली खरी… पण आंतरराष्ट्रीय रॅकेटच्या मास्टर माईंडपर्यंत यंत्रणा पोहोचू शकली नाही हे विशेष !

पश्चिम महाराष्ट्रासह मराठवाडा, विदर्भ आणि गोवा, राजस्थान, गुजरात, आंध—ातील आंतरराष्ट्रीय तस्करी टोळ्यांचा पुणे-बंगळूर महामार्गावर सुळसुळाट झाला आहे. याशिवाय जिल्ह्याला जोडणार्‍या चोरट्या मार्गांचा वापर करून बेधडक तस्करीची उलाढाल वाढविली आहे. अर्थात प्रशासनांतर्गत कच्चे दुवे आणि स्थानिक गुन्हेगारी टोळ्यांना हाताशी धरून तस्करांनी सीमा भागातील सुरक्षा यंत्रणेला आव्हान दिले आहे.

40 टक्क्यांवर तस्करीचे प्रमाण

जून-जुलै महिन्यात राज्य उत्पादन शुल्क पथकाने महामार्गावर तस्करी करणार्‍या चार टोळ्यांना बेड्या ठोकून सुमारे 50 लाखांची विदेशी दारू हस्तगत केली आहे. प्रत्यक्षातील कारवाईपेक्षा महामार्गांसह सीमाभागातून 35 ते 40 टक्के गोवा बनावट दारूची तस्करी होत असल्याची वरिष्ठ सूत्रांची माहिती आहे.

सुरक्षा यंत्रणा भेदून तस्करी!

जिल्ह्यातील दारूची तस्करी रोखण्यासाठी राज्य उत्पादन शुल्कसह स्थानिक सुरक्षा यंत्रणांमार्फत कागल, तिलारी, आंबोली, दाजीपूर, गगनबावडा, आंबा घाटांसह 15 ठिकाणी रात्रंदिवस सुरक्षा यंत्रणांची पथके डोळ्यात तेल घालून पहार्‍यावर असतानाही दिवसेंदिवस तस्करीच्या गुन्ह्यांचा आलेख वाढतच राहिला आहे. जिल्हा प्रशासनांतर्गत ही बाब चिंतेची आहे.

दारूसह गुटखा, गांजा तस्करांचा धुमाकूळ

गोवा बनावटीच्या विदेशी दारूसह गुटखा आणि गांजा तस्करांनी जिल्ह्यात धुमाकूळ घातला आहे. 4 जुलैला पुणे-बंगळूर महामार्गावर 18 लाख 23 हजारांचा दारूसाठा एलसीबी पथकाने हस्तगत करून तिघांना बेड्या ठोकल्या. त्याच इचलकरंजीत 12 लाख 50 हजारांचा गुटखा जप्त करण्यात आला. 13 जूनला साडेचार लाखाचा गांजा जप्त करूद उस्मानाबाद येथील तस्कराला अटक करण्यात आली. याच दिवशी महामार्गावरील उचगाव (करवीर) येथे 4 लाखांचा दारूसाठा हस्तगत करण्यात आला.

संशयित पोलिस कारवाईपासून दूरच!

दोन महिन्यांपूर्वी राज्य उत्पादन शुल्कच्या भरारी पथकाने उचगाव (करवीर) येथे छापा टाकून देशी-विदेशी दारू निर्मिती अड्ड्याचा पर्दाफाश केला होता. या प्रकरणात एक पोलिस कॉन्स्टेबल संशयाच्या जाळ्यात होता. दोन महिने होऊनही संशयित पोलिस कारवाईपासून दूरच राहिल्याने उचगाव, उजळाईवाडी परिसरात तो चर्चेचा विषय ठरला आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news