कोल्हापूर; पुढारी वृत्तसेवा : कोल्हापूर जिल्हा बँक निवडणूक : जिल्हा बँकेच्या निवडणुकीत आ. विनय कोरे आणि आ. प्रकाश आवाडे यांनी सत्ताधारी आघाडीसोबत राहण्याचा निर्णय घेतला आहे. आ. पी. एन. पाटील यांच्या निवासस्थानी शुक्रवारी सायंकाळी झालेल्या बैठकीत कोरे आणि आवाडे यांनी स्पष्ट केले. जागा वाटपाबाबत प्रमुख नेत्यांच्या बैठकीत निर्णय होणार आहे. दरम्यान, आघाडीत आणखी कोणाचा सहभाग करायचा, याबाबत आ. पी. एन. पाटील आणि आ. कोरे लवकरच पुन्हा बैठक घेऊन चर्चा करणार आहेत.
कोल्हापूर जिल्हा बँक निवडणूक बिनविरोध करण्याचा प्रयत्न सुरू आहे. काही जागांवर मैत्रीपूर्ण लढतीची शक्यता असली, तरी बहुतांश जागा बिनविरोध होतील, असा नेत्यांचा कयास आहे. मागील निवडणुकीत काँग्रेसमध्ये असणारे आ. प्रकाश आवाडे सध्या भाजपसोबत आहेत.आ. प्रकाश आवाडे यांनी प्रक्रिया आणि बँका-पतसंस्था गटातून उमेदवारी दाखल केली आहे. आ. विनय कोरे यांनी प्रक्रिया गटातील दुसरे संचालक बाबासाहेब पाटील-असुर्लेकर यांना विरोध केला आहे. आ. कोरे यांनी स्वत:सह तीन जागांची मागणी केली आहे.
या पार्श्वभूमीवर आ. पी. एन. पाटील, आ. कोरे आणि आ. आवाडे या तिघांची सुमारे दीड तास बैठक झाली. बँकेची निवडणूक बिनविरोध करण्याबाबत आ. कोरे आणि आ. आवाडे यांनी एकदिलाने प्रयत्न करण्याची ग्वाही दिली. निवड सर्वसमावेशक व्हावी, यासाठी अजून काहींना सहभागी करून घेण्याची सूचना आ. कोरे यांनी केली.
त्यासाठी आ. पी. एन. पाटील आणि आ. कोरे यांच्यात सोमवारी किंवा मंगळवारी अर्जांच्या छाननीनंतर पुन्हा एकदा बैठक होणार आहे. यानंतर जिल्ह्यातील सर्व प्रमुख नेत्यांची बैठक होईल.
बैठकीत सकारात्मक चर्चा होऊन अधिकाधिक जागा बिनविरोध करण्यावर एकमत झाले. कोरे आणि आवाडे सत्ताधारी आघाडीसोबतच राहतील. जागा वाटप आणि उमेदवारीबाबत सर्व नेतेमंडळींची एकत्रित बैठक होऊन निर्णय घेतला जाईल.
– आमदार पी. एन. पाटील.