कोल्हापूर : पुढारी वृत्तसेवा
'झुलवा पाळणा पाळणा बालशिवाजीचा, इंद्र जसा हा चंद्र शोभतो पुत्र जिजाऊचा… जो जो रे बाळा जो जो रे…' अशा पाळणागीतांसह शिवशाहिरांचे पोवाडे, रणहालगीचा ठेका, पारंपरिक वेशभूषेतील बालचमूंचा उत्साह आणि शिवछत्रपतींचा अखंड जयघोष अशा उत्साही वातावरणात सोमवारी पारंपरिक शिवजयंती (तिथीनुसार) सर्वत्र उत्साहात साजरी करण्यात आली.
रविवारी रात्रीपासूनच विविध गडकोट-किल्ल्यांवरून शिवज्योतींचे आगमन सुरू होते. भगव्या पताका, भगवे ध्वज, स्फूर्तिदायी पोवाड्यांमुळे वातावरणनिर्मिती झाली होती. दरम्यान, सोमवारी सकाळी 10 वाजून 10 मिनिटांनी शहरातील विविध पेठा, उपनगरे आणि ग्रामीण भागातील तालीम संस्था, तरुण मंडळांच्या वतीने शिवजन्मकाळ सोहळा साजरा करण्यात आला.
छत्रपती शिवाजी चौकातील श्री शहाजी तरुण मंडळाच्या वतीने विविध राजकीय पक्ष-संस्था-संघटनांच्या वतीने प्रतिवर्षीप्रमाणे पारंपरिक शिवजयंती सोहळा साजरा करण्यात आला. भगवा ध्वज फडकवून सोहळ्याची सुरुवात झाली. यानंतर शिवछत्रपतींच्या पुतळ्यास मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून पाळणापूजन झाले. यावेळी दै. 'पुढारी'चे चेअरमन डॉ. योगेश जाधव, माजी आमदार मालोजीराजे, राज्य नियोजन मंडळाचे कार्याध्यक्ष राजेश क्षीरसागर, आर. के. पोवार, माजी नगरसेवक ईश्वर परमार, आदिल फरास यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
संयोजन अध्यक्ष उदय शिंदे, उपाध्यक्ष सागर शिंदे, राजेंद्र केसरकर, सचिन शिंदे, हेमंत मेहंदळे, संजय केसरकर, तुषार शिंदे, उमेश गायकवाड, सादिल बागवान, सम—ाट शिंदे, साहिल शिंदे, राजेश गायकवाड, प्रसाद बुलबुले, विक्रांत भुर्के, केदार भुर्के, ऋषी भुर्के, जयदीप पवार, कपिल केसरकर, अभिमन्यू चौगले, सुधाकर पोलादे, सतेज पोलादे, रमीज रुकडीकर, रत्नदीप चोपडे, पार्थ राऊत, रोहन सुतार, शाहरुख बागवान, वसीम फरास, राजू दोडमणी, मनोज पवार, स्वरूप गायकवाड, सार्थक गायकवाड, श्रेयस आंबेकर, आर्यन पवार, राजू बुलबुले, साहिल सांगावकर, सुबोध उरुणकर आदींनी केले.
संयुक्त मंगळवार पेठ राजर्षी शाहू तरुण मंडळाच्या वतीने मिरजकर तिकटी चौकात सौ. मधुरिमाराजे यांच्या हस्ते जन्मकाळ सोहळा झाला. यावेळी मंगळवार पेठेतील सर्व तालीम संस्थांचे पदाधिकारी, महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. संयुक्त जुना बुधवार पेठेत सौ. मधुरिमाराजे व भगिनी मंचच्या अध्यक्ष वैशाली क्षीरसागर यांच्या हस्ते जन्मकाळ सोहळा झाला. यावेळी माजी महापौर सरिता मोरे, सौ. सुनीता भांदिगरे, अमृता सावंत, पवित्रा देसाई, जयश्री मिठारी, रिमा मिस्त्री, संध्या पाटील, शिल्पा भांदिगरे, नंदा मिठारी, काव्या पाटील आदींसह मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते. संयुक्त रविवार पेठ, संयुक्त शुक्रवार पेठ, संयुक्त उपनगर, संयुक्त उत्तरेश्वर पेठ, संयुक्त जवाहरनगरसह ठिकठिकाणी शिवजन्मकाळ सोहळा साजरा झाला. नर्सरी बागेतील शिवछत्रपतींच्या मंदिरातही ज्योत नेण्यासाठी गर्दी झाली होती.