कोल्हापूर : चुकीच्या संवर्धनामुळे अंबाबाई मूर्तीचे स्वरूप बदलले

कोल्हापूर : चुकीच्या संवर्धनामुळे अंबाबाई मूर्तीचे स्वरूप बदलले

कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : पुरातत्त्व विभागाने चुकीच्या पद्धतीने केलेल्या संवर्धनामुळे करवीर निवासिनी श्री अंबाबाई देवीच्या मूर्तीचे स्वरूप बदलले आहे. मूर्तीच्या बोटांची झीज झाली असून चेहर्‍यावरील भाव बदलले आहेत. अलंकार, कलाकुसर अस्पष्ट झाल्याचा गंभीर आरोप मूर्ती अभ्यासक अ‍ॅड. प्रसन्न मालेकर यांनी केला आहे. यामुळे देवीची मूर्ती बदलण्यात यावी, या मागणीचे निवेदन नोव्हेंबर 2022 ला देण्यात आले असून याबाबत कोणतीही कार्यवाही न झाल्याचे अ‍ॅड. मालेकर यांनी सांगितले आहे.

जगदंबेच्या स्वरूपाचे अखंड भारतातील एकमेव शक्तिपीठ म्हणजे कोल्हापूर आहे. इथले अंबाबाई मंदिर हे साधारणपणे 1700 वर्षे जुने असून गाभार्‍यात विराजमान मूर्ती किमान एक हजार वर्षे जुनी आहे. देवीच्या मूर्तीची आजची अवस्था अतिशय जीर्ण असून यापूर्वी एक वेळा वज्रलेप तर एक वेळा रासायनिक संवर्धन करण्यात आले आहे. तरीदेखील या मूर्तीच्या अवस्थेत काहीही सुधारणा न होता या उलट ती दिवसेंदिवस खालावतच चालली आहे.

साधारणपणे 1920 साली मूर्तीचा डावा हात भग्न झाला तो धातूच्या पट्ट्या जोडून अडकवण्यात आला होता. सन 1955 साली पुरी पीठ शंकराचार्य योगेश्वरानंद तीर्थ यांच्या पुढाकाराने वज्रलेप करण्यात आला, पण तोही वज्रलेप लवकरच निघून पडला. या नंतर मूर्तीची वाढती झीज रोखण्यासाठी सन 1997 साली जिल्हाधिकारी कोल्हापूर यांच्या आदेशानुसार व सर्व जबाबदार घटकांच्या संमतीने मूळ मूर्तीवरील स्नान अभिषेक थांबवण्यात आले ते आजतागायत बंदच आहेत. 2000 साली पुन्हा वज्रलेप करण्यासाठी शासकीय समिती स्थापन करण्यात आली. वेगवेगळ्या कारणांनी या समितीला विरोध होऊन दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर कोल्हापूर यांच्याकडे दावा दाखल झाला. सन 2015 साली सर्व वादी-प्रतिवादी यांच्यामध्ये तडजोड होऊन पुरातत्त्व खात्याच्या सूचनेनुसार काम करावे, असे ठरले.

22 जुलै 2015 रोजी आर्कियालॉजिकल सर्व्हे ऑफ इंडिया च्या अधिकार्‍यांमार्फत मूर्तीचे रासायनिक संवर्धन करण्यात आले. या प्रक्रियेत बर्‍याच त्रुटी राहिल्या आहेत. मूर्तीला पितळी बार लावून आधार दिला आहे. पाणपात्रावरचा हात खंडित आहे. अलीकडे सप्टेंबर 2022 ला पुरातत्त्व विभागाने अचानक संवर्धनाचे काम केले. वारंवार संवर्धनाचे काम करूनही कोणतेही काम मूर्तीवर टिकलेले नाही. मूर्तिशास्त्रानुसार देवीची मूर्ती खंडित असल्याने ती पूजनीय नाही. यामुळे ती बदलणे अत्यावश्यक झाल्याचे अ‍ॅड. मालेकर यांनी सांगितले आहे.

पूरातत्त्व विभागाचे अधिकारी आज पहाटे पाहणी करणार

दरम्यान, पुरातत्त्व विभागाचे अधिकारी तातडीने कोल्हापूरकडे येण्यास निघाले आहेत. मंगळवारी पहाटे पाच ते सहा या कालावधीत ते मूर्तीची पाहणी करणार आहेत. यानंतर ते मूर्तीबाबतचा अहवाल देतील, अशी शक्यता आहे.

अंबाबाई मूर्तीसाठी तज्ज्ञांची समिती नेमा

दरम्यान, अंबाबाई मूर्तीसाठी तज्ज्ञांची समिती नेमा, अशी मागणी प्रजासत्ताक सामाजिक सेवा संस्थेचे दिलीप देसाई यांनी केली आहे. या मागणीचे पत्र मुख्यमंत्री, विधी व न्याय विभागाचे सचिव, पुरातत्त्व विभाग आणि पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती अध्यक्षांना पाठविण्यात आले आहे. पुरातत्त्व विभागाचे डॉ. आर. सिंग यांनी 29 मे 2016 रोजी दिलेल्या अहवालानुसार अंबाबाई मूर्तीची झीज झाली आहे. यामुळे पुरातत्त्व विभाग यांचे तज्ज्ञ, मूर्ती अभ्यासक, शासकीय तज्ज्ञ आणि धर्मशास्त्राचे अभ्यासक यांची तत्काळ समिती स्थापन करावी आणि त्यांचा सल्ला घेऊन योग्य तो निर्णय घ्यावा, असे पत्रात म्हटले आहे. डॉ. सिंग यांनी दिलेल्या अहवालाची अंमलबजावणी करावी, असेही या पत्रात देसाई यांनी म्हटले आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news