कोल्हापूर : अल्पवयीन मुलांच्या हातात गांजाची चिलीम!

कोल्हापूर : अल्पवयीन मुलांच्या हातात गांजाची चिलीम!

इचलकरंजी ; बाबासो राजमाने : इचलकरंजी शहरात गांजाची राजरोस विक्री होत असल्याचे चित्र आहे. त्यामुळेच कोणत्याही ठिकाणी सहजपणे अल्पवयीन मुलांसह युवकांना गांजा उपलब्ध होत आहे. गांजाच्या आहारी गेलेल्या युवकांनी आता गांजा तस्करी सुरू केली आहे. शहरात याचे मोठे रॅकेट कार्यरत आहे. गांजा तस्करीला आळा घालण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे.

गांजाच्या व्यसनामुळे अनेक कुटुंबे रस्त्यावर आली आहेत. शहरातील गुन्हेगारीमध्येही वाढ होत चालली आहे. परराज्यांतून गांजा थेट शहरापर्यंत बिनधास्तपणे येत आहे. शहर व परिसरात ग्रामीण भागातील काही ठिकाणे 'गांजा हब' बनली आहेत. शहरातील एका शाळेत गर्दुले बसल्याचे आयुक्तांच्या पाहणीत नुकतेच उघडकीस आले होते.

गांजासह अन्य अमली पदार्थांचे सेवन करून खून, खुनाचे प्रयत्न, हाणामार्‍या, एकमेकांवर जीवघेणा हल्ला करण्यापर्यंतचे प्रकारही यापूर्वी घडले आहेत. पोलिासांकडून गांजा ओढणार्‍यांवर कारवाई होते. अनेकवेळा गांजाही जप्त केला जातो. मात्र, या कारवाईपासून गांजा आणि अमली पदार्थांचे रॅकेट चालवणारे मुख्य सूत्रधार मोकाटच आहेत. तस्करीची साखळी तोडण्यासह मुख्य सूत्रधारांना गजाआड करण्याचे आव्हान पोलिस यंत्रणेसमोर आहे.
मिसरूड न फुटलेले

गांजा तस्करीत

टोळीतील अनेक मुख्य संशयितांनी आता नवे हस्तक नेमून त्यामार्फत गांजा विक्री सुरू केली आहे. सध्याच्या ऑनलाईनच्या जमान्यात आता व्यसन करणार्‍यांनाही जागेवरच गांजा हाती पडत आहे. इचलकरंजीत पोलिसांचे मनुष्यबळ अपुरे आहे. अनेक व्यस्त कामांमुळे पोलिसांची मोहीम थंडच आहे. याचाच फायदा तस्करांच्या टोळ्यांनी घेतला आहे. मिसरूडही न फुटलेले युवक आता गांजा विक्री करण्यात सहभागी झाल्याचे चित्र दिसून येत असल्यामुळे सामाजिक स्वास्थ्य बिघडत आहे.

पंजाबमधूनही नशिल्या गोळ्या

गांजाची भुकटी करून पुड्यांमार्फत दिली जाते. गांजापाठोपाठ कुत्ता नामक गोळी त्याचबरोबर पंजाबमधून येणार्‍या नशिल्या गोळ्या, फर्निचर उद्योगात वापरण्यात येणारे केमिकल यांचा व्यसनासाठी वापर वाढला आहे. तसेच नशेसाठी कफ सिरप व अन्य औषधांचाही वापर होत आहे. औषधांचीही खुलेआम विक्री व्यसनाधीनतेच्या वाढीस कारणीभूत ठरत आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news