कोल्हापूर : 231 कोटींची वीज चोरी पकडली

कोल्हापूर : 231 कोटींची वीज चोरी पकडली

कोल्हापूर, डॅनियल काळे : महावितरण कंपनीने चालू आर्थिक वर्षात दहा महिन्यांत 231 कोटी 79 लाख रुपयांच्या 13 कोटी 71 लाख युनिटच्या वीज चोर्‍या पकडल्या आहेत. राज्यभरात वीज चोरांविरोधात धडक कारवाई करण्यात आली. चालू आर्थिक वर्षात एप्रिल 2022 पासून जानेवारी 2023 या दहा महिन्यांत वीजचोरीची एकूण 55,647 प्रकरणे उघडकीस आली आहेत.

महावितरणने 2021-22 या गेल्या आर्थिक वर्षात 194 कोटी रुपयांच्या 11 कोटी 73 लाख युनिटच्या वीज चोर्‍या पकडल्या होत्या. फेब—ुवारी व मार्च महिन्यांतील कामगिरीमुळे यंदा आर्थिक वर्षाच्या अखेरीस आकडा आणखी मोठा असण्याची अपेक्षा आहे.

कर्मचार्‍यांनी चालू आर्थिक वर्षात पकडलेल्या वीज चोर्‍यांमध्ये सर्वाधिक कोकण विभागात 24,664 वीजचोर्‍या पकडण्यात आल्या. महावितरणच्या कोकण विभागात कोकणासोबत उत्तर महाराष्ट्राचा समावेश होतो. या खालोखाल नागपूर विभागात 14,986 वीजचोर्‍या पकडण्यात आल्या. पुणे विभागात नऊ हजार तर औरंगाबाद विभागात 6,997 वीज चोरीची प्रकरणे उघडकीस आणली.

सर्वाधिक 64 दशलक्ष युनिटची वीजचोरी कोकण विभागात उघड झाली. त्याचे मूल्य 117 कोटी 97 लाख रुपये आहे. पुणे विभागाचा वीज चोरी प्रकरणांच्या संख्येत तिसरा क्रमांक असला तरी वीज वापराचा विचार करता पुणे विभाग दुसर्‍या क्रमांकावर आहे. येथे 33 दशलक्ष युनिटची वीज चोरी पकडण्यात आली व त्याचे मूल्य सुमारे 55 कोटी रुपये आहे. नागपूर विभागात 38 कोटी रुपयांची 22 दशलक्ष युनिटची वीज चोरी पकडण्यात आली. औरंगाबाद विभागात 20 कोटी 87 लाख रुपयांची 15 दशलक्ष युनिटची वीजचोरी पकडण्यात आली.

स्टोन क्रशर, प्लास्टिक उद्योग, हॉटेल आघाडीवर

महावितरणच्या कर्मचार्‍यांना वीज चोरीच्या बाबतीत स्टोन क्रशर, प्लास्टिक इंडस्ट्री, हॉटेल आघाडीवर असल्याचे या कारवाईत आढळल्याची माहिती देण्यात आली. कंपनीच्या सुरक्षा विभागाच्या भरारी पथकांनी 18 जानेवारी ते 13 फेब—ुवारी या कालावधीत विशेष अभियान चालविले. त्यावेळी वीज चोरीची 52 मोठी प्रकरणे उघडकीस आली. त्यापैकी नऊ प्रकरणे स्टोन क्रशरची, 14 प्लास्टिक आणि धातू उद्योगाची, सात हॉटेल्सची आणि पाच प्रकरणे दूध प्रक्रिया उद्योगाची आढळली.

वीज चोरीच्या विरोधात कठोर कारवाई सुरू केली आहे. वीज बिलांच्या वसुलीसाठी कंपनीचे कर्मचारी प्रयत्न करत आहेत. मीटरचे अस्पष्ट फोटो व त्यामुळे येणार्‍या बिलांची समस्या दूर करण्यासाठी महावितरणने प्रयत्न करून अस्पष्ट फोटोंचे प्रमाण दोन टक्क्यांच्या खाली आणले आहे.
– विजय सिंघल,
अध्यक्ष व व्यवस्थपकीय संचालक

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news