नवी दिल्ली : भारतात सध्या कोट्यवधी लोक हृदयासंबंधीच्या आजाराने त्रस्त आहेत. हा आकडा वेगाने वाढत आहे. याशिवाय देशात कार्डियो वस्कुलर डिसीजने (सीव्हीडी) होणार्या मृतांची संख्याही वाढली आहे. गंभीर बाब म्हणजे हृदयविकारांमुळे 20 ते 40 वर्षे वयोगटातील लोकही आपला प्राण गमावू लागले आहेत. जेनेटिक्स, डायबिटीस, धूम्रपान, मद्यपान आणि खराब जीवनशैलीबरोबरच शरीरात कोलेस्ट्रालचे प्रमाण वाढणे हेसुद्धा हृदयविकाराचे कारण समजले जाते.
कोलेस्ट्रॉल हा एक शरीरात आढळणारा वसायुक्त पदार्थ असून तो 'सेल मेंब्रेन्स' निर्मितीचे काम करत असतो. कोलेस्ट्राल हा 'गूड' आणि 'बॅड' असा दोन प्रकारचा असतो. गुड कोलस्ट्रॉल हा आरोग्यासाठी चांगला असतो. तर बॅड कोलेस्ट्रॉल हा रक्तवाहिन्यांमधील अडथळ्याचे कारण बनतो. यामुळे स्ट्रोक, हृदयविकाराचा झटका येण्याचा धोका वाढतो. सुरुवातीला बॅड कोलेस्ट्रॉलची लक्षणे कधी कधी गंभीर वाटत नाहीत. मात्र, याकडे दुर्लक्ष केल्यास त्याचे परिणाम गंभीर होऊ शकतात.
आपल्या जीवनशैलीत आणि डाएटमध्ये काही बदल करून बॅड कोलेस्ट्रॉलमुळे होणारे धोके कमी करता येणे शक्य आहे. यासाठी एक महत्त्वपूर्ण पदार्थ म्हणजे ओटस् होय. यामध्ये फायबर, विटामिन आणि अनेक प्रकारची पोषक तत्त्वे असतात. देशातील फिटनेस आणि वेलनेस संस्थेच्या मते, ओटस्मुळे शरीरातील कोलेस्ट्रॉलचे प्रमाण करण्यास मदत मिळते.