साओ पावलो : सापाच्या विषाने माणसाचा जीवही जात असतो. मात्र, याच विषापासून अनेक प्रकारची औषधेही बनवली जात असतात. सध्याच्या कोरोना महामारीच्या काळात 'कोव्हिड-19'वर वेगवेगळ्या प्रकारची रामबाण औषधे निर्माण करण्यासाठी जगभरातील संशोधक सातत्याने प्रयत्न करीत आहेत.
आता यासाठी सापाचे विषही उपयोगी पडेल असे संशोधकांना वाटते. ब्राझीलमध्ये सापाचे विष एका माकडासाठी जीवनरक्षक ठरल्याचे प्रयोगातून दिसून आले आहे.
ब्राझीलच्या संशोधकांना आढळले की एका विशिष्ट प्रजातीच्या सापाच्या विषाचा एक अणू माकडाच्या शरीरातील पेशींमध्ये कोरोना विषाणूला पुढे जाण्यापासून रोखतो. कोरोना विषाणूवरील उपचारासाठी प्रभावी औषध तयार करण्यासाठीचे एक संभाव्य पाऊल म्हणून या शोधाकडे पाहिले जात आहे. 'मॉलेक्युल्स' या विज्ञान नियतकालिकात याबाबतच्या संशोधनाची माहिती प्रसिद्ध करण्यात आली आहे. 'जाराराक्युस्सु पिट' नावाच्या सापाच्या विषाचा एक अणू कोरोनावर प्रभावी ठरतो असे आढळले.
जो कोरोना विषाणू 75 पट अधिक वेगाने फैलावत होता त्यालाही या विषाच्या अणूने रोखल्याने संशोधकांना मोठेच अप्रुप वाटत आहे. साओ पावलो विद्यापीठातील संशोधक राफेल गुड्डो यांनी सांगितले की सापाच्या विषातील हा घटक विषाणूच्या एका अतिशय महत्त्वाच्या प्रोटिनला रोखण्यासाठी सक्षम असल्याचे आम्हाला दिसले.
साओ पावलो येथे 'बुटांटन इन्स्टिट्यूटस् बायोलॉजिकल कलेक्शन'मधील हरपेटोलॉजिस्ट गुसेप्पे प्युओर्तो यांनी सांगितले की ब्राझीलमध्ये कोरोनापासून वाचण्यासाठी जाराराक्युस्सु पिट सापाची शिकार करण्याचा विचार जे लोक करीत आहेत त्यांना वाटते की आपण असे करून जगाला वाचवत आहोत.
मात्र, या सापाचे विष हे थेटपणे कोरोनावर परिणाम करू शकत नाही, हे लक्षात घेतले पाहिजे. त्यासाठी विषातील अणूंच्या वेगवेगळ्या प्रमाणाचा प्रभाव पाहणे गरजेचे आहे. अर्थातच यासाठी आणखी संशोधनाची गरज आहे. हा साप ब्राझीलमधील सर्वाधिक लांबीच्या सर्पांपैकी एक आहे. त्याची लांबी सहा फुटांपर्यंत असते.