पत्नीचा अधिकार
पत्नीचा अधिकार

कोरोना : निर्बंधमुुक्‍तीकडे जाताना…

गेली दोन वर्षे जगण्याच्या सर्व क्षेत्रांना बाधित करून मानवी जीवनापुढे भीषण संकट उभे करणार्‍या कोरोनाची तिसरी लाट ओसरू लागल्याची बातमी सुखावणारी असली तरी लगेच सगळे निर्बंध झुगारून देण्याची घाई करायला नको. बंधने झुगारून मोकाट होण्याच्या वृत्तीचे मोठे तडाखे गेल्या दोन वर्षांत आपण अनुभवले आहेत आणि त्यातून तावून सुलाखून निघालो आहोत. माणूस अनुभवाने शहाणा होतो, असे म्हटले जाते; परंतु बदलत्या युगात माणसाला शहाणपणा देण्यासाठी हा अनुभव उपयोगी ठरत नाही. त्याचमुळे थोडी कुठे तीव्रता कमी झाली की, लोक लगेच मोकाट सुटतात आणि नव्या लाटेला निमंत्रण देतात. त्याचमुळे कोरोना तिसरी लाट ओसरली असली तरी तूर्तास मास्कपासून मुक्‍ती नसल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांना स्पष्ट करावे लागले आहे.

अर्थात, कोरोनाची परिस्थिती गंभीर होती, त्या काळातही मास्कबाबत इतकी बेपर्वाई होती, तर आता लाट ओसरल्यानंतर त्याबाबत किती काळजी घेतली जाईल याबाबत शंकाच आहे. मुंबईसारख्या शहरात गर्दीच्या ठिकाणी महापालिकेने निर्माण केलेल्या यंत्रणेमुळे किमान काहीएक धाक आहे. बाकी सगळीकडे मास्क वापरण्याच्याबाबतीत आनंदी आनंदच बघायला मिळतो. एखाद्या संकटाला निरोप दिल्यानंतर ते खरोखर निघून गेले आहे का आणि आपल्यापासून लांब गेले आहे का, याची शहानिशा करून घ्यावी लागते.

ते उंबरठ्याबाहेर पाऊल टाकण्याआधीच ढिलाई दाखवली तर कदाचित ते मागे फिरू शकते आणि त्याची तीव्रता आधीपेक्षा अधिक असू शकते, याचे भान ठेवायला हवे. तिसरी लाट ओसरली असली तरी मास्कची गरज त्यासाठीच व्यक्‍त केली जाते. कारण, एक छोटासा कापडाचा तुकडा अत्यंत गंभीर संकटाच्या काळात आपला संरक्षक बनल्याचे आपल्याला पाहायला मिळाले. ज्याने त्याने आपल्या ऐपतीनुसार हलके-भारी मास्क वापरले, गरिबातल्या गरीब माणसालाही त्याची सहज निर्मिती करता येत होती.

त्यामुळे मास्कसाठी कुठलीही सबब चालणारी नव्हती. तरीसुद्धा लोक त्याबाबत बेपर्वा होते. त्याचा फटका अशा बेपर्वा वृत्तीच्या लोकांना तर बसलाच; परंतु त्यांच्यामुळे इतरही अनेकांना संकटाच्या खाईत ढकलून दिले. कोरोना अद्याप पूर्णपणे नाहीसा झालेला नाही, किंबहुना तो कायमचा निरोप घेण्याची शक्यता नाही. मात्र, तूर्तास तरी खबरदारी घेण्याची आवश्यकता आहे. कारण, अपघाताने असो किंवा बेपर्वाईमुळे, कोणत्याही कारणाने कोरोनाची लागण झाली तर ते परवडणारे नाही. त्यामुळे इतरांसाठी नसेल; पण स्वतःसाठी तरी प्रत्येकाने काळजी घेण्याची आवश्यकता आहे.

कोणत्याही लाटेचे अनुमान उपलब्ध आकडेवारीच्या आधारे केले जाते आणि तिसरी लाट ओसरल्याची पुष्टीही आकडेवारीच्या आधारेच केली जात आहे. देशपातळीवरील परिस्थिती पाहता दैनंदिन रुग्णसंख्या 10 हजारांच्या खाली आली असून, गेल्या 24 तासांत कोरोनाचे 8,013 नवे रुग्ण आणि 119 जणांचा मृत्यू झाला आहे.

दिवसभरात कोरोनावर मात करून बरे झालेल्या रुग्णांची संख्या 16 हजार 765 आहे. महाराष्ट्रापुरते बोलायचे तर तिसर्‍या लाटेत 48 हजारांपर्यंत असलेली दररोजची रुग्णसंख्या एक हजारांच्या आत म्हणजे 800 पर्यंत आली आहे, तर सक्रिय रुग्णांची संख्या नऊ हजारांवर आली आहे. या आकड्यांवर नजर टाकल्यानंतर कोरोनाचा विळखा सैल होत चालल्याचे दिसून येते. आपल्या अवतीभवतीच्या वातावरणातही ते जाणवत असते; परंतु ते जाणवणे भीती वाढवणारे असते.

कारण, काही महिन्यांपूर्वी प्रचंड शिस्तीत वागणारे, खरेदीसाठी दुकानांसमोरही रांगेत उभे राहणारे लोक मागचे सगळे विसरून बेशिस्तपणे वागू लागले आहेत. व्यक्‍तिगत पातळीवरच्या या बेदरकारपणाला संस्थात्मक पातळीवरील उदासीनताही पूरक ठरताना दिसत आहे. ठिकठिकाणी आढळणारे सॅनिटायझरचे स्टँड हद्दपार झाले आहेत, स्टँड असतील तेथील बाटलीमधील सॅनिटायझर गायब झाले आहे आणि सॅनिटायझर असेल तेथे त्याच्या वापरासाठीचा सुरक्षारक्षकांचा आग्रह बंद झाला आहे.

मानवी जीवन उद्ध्वस्त करणार्‍या या महामारीनंतरची ही सार्वत्रिक उदासीनता काळजी वाढविणारी आहे. म्हणूनच सरकारला आणि आरोग्य यंत्रणेला मास्कबाबत आग्रही राहावे लागते. या साथीने किती गंभीर धडे दिले आहेत, त्याची कल्पना त्यातून जे गेले आहेत, त्यांनाच येऊ शकते. ज्यांना लागण झाली त्यांना त्याच्या वेदनांची कल्पना आली आहे. अनेकांनी आपले आप्‍त, जिवलग, नातलग, मित्र असे अनेक लोक गमावले. एकीकडे दुःखाचे डोंगर कोसळत असताना दुसरीकडे जगण्यासाठीचा संघर्षही करावा लागत होता आणि अनेकांसाठी तो खूपच भीषण होता.

विशेषतः असंघटित कामगार आणि हातावर पोट असलेल्या लोकांपुढे तर दोनवेळच्या जेवणाची भ्रांत होती. सरकारने शिधा देण्याची व्यवस्था केली असली तरी तो पुरेसा नव्हता आणि मानवी गरजा तेवढ्यापुरत्या मर्यादित राहिलेल्या नाहीत. अनेक अंगांनी माणसाला असहाय्य आणि लाचार बनविणार्‍या भीषण लाटेनंतरसुद्धा माणसांना पुरेसे शहाणपण आले नसल्याचेच एकूण सार्वजनिक ठिकाणच्या वर्तनव्यवहारावरून दिसून येते. त्याचमुळे पुन्हा पुन्हा खबरदारी घेण्याचे आवाहन केले जात आहे. कोरोना तिसरी लाट ओसरल्यामुळे निर्बंध शिथिलतेकडे वाटचाल सुरू झाली आहे.

टप्प्याटप्प्याने निर्बंध कमी होत आहेत आणि परिस्थिती अशीच सुधारत राहिली तर नजीकच्या काळात आपण पूर्ण निर्बंधमुक्‍त होऊ. दोन वर्षांचा कोरोना काळातला अंधःकार दूर सारून आपण प्रकाशाच्या दिशेने वाटचाल करीत आहोत. ती सावधपणेच व्हायला हवी. त्यासाठी बेफिकीरपणाला लगाम घालायला हवा. नव्या उमेदीने भविष्याकडे वाटचाल करीत असताना ही उमेद कायम ठेवत आपल्यासोबतच्या दुबळ्या घटकांना ताकद देण्याचाही प्रयत्न केला पाहिजे. तरच कोरोनाने दिलेल्या धड्यापासून आपण योग्य तो बोध घेतला असे म्हणावे लागेल.

logo
Pudhari News
pudhari.news