पळशी ; पुढारी वृत्तसेवा : भोसे, ता. कोरेगाव येथील उपसरपंच अजय अरुण माने यांच्यावर विकास सोसायटी निवडणुकीच्या रागातून गावातील तिघांनी कुर्हाडीने वार करत मारहाण केली. शुक्रवारी सकाळी 10 वाजता भोसे-आझादपूर रस्त्यावर घडली. याप्रकरणी कोरेगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
विक्रम मदन माने, सोमनाथ माने व विवेक उर्फ आदित्य माने अशी गुन्हा दाखल झालेल्या संशयितांची नावे आहेत. अजय माने यांनी गावचे सरपंचपद भूषविले असून सरपंच परिषदेच्या माध्यमातून ते कार्यरत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून त्यांनी भोसेतील प्रत्येक निवडणूक जिंकली आहे.
नुकत्याच झालेल्या विकास सोसायटी निवडणुकीत अजय माने यांच्या पॅनेलने विजय मिळवला होता. त्याच्या रागातून हा हल्ला झाला आहे. अजय माने हे चुलत बंधू किरण माने यांच्याबरोबर दुचाकीवरून आझादपूर रस्त्याने शेताकडे निघाले होते. यावेळी त्यांना मोहन माने यांच्या घरासमोर तिघांनी अडवून मारहाण करण्यास सुरूवात केली. यावेळी विक्रम माने याने कुर्हाडीने अजयच्या डोक्यावर वार केला. तर सोमनाथ माने,विवेक उर्फ आदित्य माने यांनी मारहाण केली. या हल्ल्यात जखमी झालेल्या अजय माने यांना तातडीने कोरेगावातील खासगी रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे.