कोजागिरी पौर्णिमा : जागृतीचा संदेश

कोजागिरी पौर्णिमा : जागृतीचा संदेश

मंगळवार, दि. 19 ऑक्टोबर रोजी कोजागिरी पौर्णिमा. त्यानिमित्ताने…

आपल्या भारतीय संस्कृतीत अनेक सण-वार आहेत. उत्सव आहेत. हे सारे सण-उत्सव निसर्गचक्राशी बांधलेले आहेत. प्राचीन कृषी संस्कृतीशीही त्यांचा अनुबंध आहे. या सण-उत्सवांना धार्मिक महत्त्वही आहे. या सण उत्सवातून मानवी जीवनासाठी काही संदेशही देण्यात आल्याचे दिसून येते. कोजागिरी पौर्णिमा असाच एक उत्सव. सदैव जागृत राहा, सावध राहा, धन-ज्ञानासाठी जागे राहा, असा संदेश देणारा हा उत्सव.

शरद ऋतूत येणारी आश्‍विन पौर्णिमा म्हणजे कोजागिरी पौर्णिमा-शारदीय पौर्णिमा. यावर्षी ती मंगळवार, दि. 19 ऑक्टोबर रोजी येत आहे. कोजागिरी पौर्णिमा ही देवी लक्ष्मीचा जन्मदिन. देव-दानवांच्या समुद्र मंथनातून देवी लक्ष्मी प्रकट झाली. कोजागिरी पौर्णिमेला देवी लक्ष्मी पृथ्वीवर संचार करते. हाती अमृतकलश घेऊन संचार करीत असता, देवी लक्ष्मी 'को जागर्ति' असा प्रश्‍न करीत असतेे, अशी श्रद्धा आहे. ज्ञानासाठी, इष्ट कार्यासाठी जे जागे असतात, म्हणजे एकाग्र चित्ताने कार्यमग्‍न असतात, आपल्या कार्याचा ध्यास घेतलेले असतात, अशा खर्‍या अर्थाने 'जागृत' असलेल्या व्यक्‍तींवर देवी प्रसन्‍न होते, अशी समजूत आहे.

इंद्र-लक्ष्मी पूजन

कोजागिरी पौर्णिमेला उपोषण, पूजन आणि जागरण करावे, असे पुराणात सांगितलेले आहे. दिवसभर उपोषण करावे. सूर्यास्तानंतर पहिल्या प्रहरी म्हणजे रात्रीचे नऊ-साडेनऊ वाजण्याआधी लक्ष्मी देवता आणि इंद्र देवता व बळीराजा यांचे पूजन करावे. आटीव दुधाचा नैवेद्य दाखवावा. मध्यरात्रीच्या सुमारास चंद्रप्रकाशात दूध ठेवावे. ते प्राशन करावे. सकाळी लक्ष्मी व बळीराजा यांचे पूजन करून उपवासाचे पारणे करावे, असा हा पूजाविधी!

स्वच्छतेला महत्त्व

ब्रह्म पुराणात दिलेल्या व्रतात स्वच्छतेला, साफसफाईला अधिक महत्त्व दिले आहे. घरदार, परस, अंगण स्वच्छ करावे, रस्तेही झाडावेत, असे म्हटले आहे. याच पौर्णिमेला भगवान श्रीकृष्णांनी वृंदावनात रासलीला रचली, असे वैष्णवपंथीय मानतात. त्यामुळे या पौर्णिमेला वैष्णवपंथीय रासलीला उत्सव साजरा करतात. उत्तर भारतात प्रामुख्याने अशी प्रथा आहे.

कोजागिरी व्रतासंबंधीची कथा अशी ः एका राजाने आपले सारे वैभव आणि राज्य गमावले. तो कंगाल झाला. तेव्हा त्याच्या राणीने कोजागिरी पौर्णिमेचे व्रत केले. लक्ष्मी तिला प्रसन्‍न झाली. तिचे सारे वैभव पुन्हा मिळाले. आपल्या कार्यावर निष्ठा ठेवावी, असा संदेशही ही कथा देते. याच पौर्णिमेला मोत्यांची निर्मिती होते, अशीही समजूत आहे.

नवान्‍न पौर्णिमा

कोकणासह काही भागात नवीन धान्याचे पूजन करण्याची प्रथा आहे. भात, नाचणी, वरी आदी धान्यांची भक्‍तिभावाने पूजा होते, ती या पौर्णिमेला. सडासंमार्जन करून, रांगोळ्या रेखाटून लक्ष्मीचे स्वागत केले जाते. प्राचीन कृषी संस्कृतीचाच जागर या प्रथेतून होत असतो. कोजागिरी पौर्णिमेचे चंद्रकिरण औषधी असतात, अशी समजूत आहे. दमा-अस्थमा यासाठी जी औषधे असतात, ती या चंद्रकिरणात ठेवली जातात. त्यामुळे ही औषधे प्रभावशाली होतात, अशी समजूत आहे.

चैतन्याची पौर्णिमा

शरद ऋतूतील वातावरण आल्हाददायक असते. पावसाळा संपलेला असतो. थंडीची चाहूल लागलेली असते. निरभ्र आकाशात चंद्र पूर्ण तेजाने तळपत असतो. अशावेळी कुटुंबीय, आप्त, मित्रमंडळींसह कोजागिरी साजरी होते आणि त्याला चैतन्याचे कोंदण लाभते. बदाम, पिस्ता, केशरासह आटीव दुधाचा स्वाद घेताना या सोहळ्यात उत्साहाची लहर पसरते.

असा हा चैतन्यमय, मंगलमय उत्साही सोहळा! सदैव जागरुकतेचा संदेश देणारी कोजागिरी पौर्णिमा! भारतीय संस्कृतीचे अनुपमेय असे लेणे! मनोमनी जपून ठेवावे, असे हे चांदणे आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news