कोकणच्या जांभळाला मिळणार जीआय मानांकन!

कोकणच्या जांभळाला मिळणार जीआय मानांकन!
Published on
Updated on

ठाणे/ नाशिक ; विश्‍वनाथ नवलू/ सतीश डोंगरे : कोकणातील वैशिष्ट्यपूर्ण फळ पिकांना जीआय मानांकन मिळण्यासाठी कोकण कृषी विद्यापीठाने पुढाकार घेतला आहे. त्यावर आता नवे संशोधनही सुरू झाले असून पालघर बहाडोलीचे जांभूळ आणि बदलापूरचे जांभूळ हे जीआय मानांकनासाठी प्रतवारीमध्ये सर्वोत्तम ठरले आहे. यापूर्वी अलिबागचा पांढरा कांदा, देवगड व रत्नागिरीचा हापूस, श्रीवर्धनची सुपारी ही फळपिके जीआय मानांकनासाठी प्रस्तावित झाली आहेत.

कोकण कृषी विद्यापीठाचे विस्तार संचालक डॉ. संजय भावे आणि फळपिकाच्या संशोधनात अग्रभागी असलेले सहयोगी प्राध्यापक डॉ. जितेंद्र कदम यांनी याविषयी माहिती देताना कोकणातील ठरावीक भागांमध्ये वैशिष्ट्यपूर्ण अशी फळपिके नैसर्गिकरीत्या पाहायला मिळत आहेत.

यामध्ये देवगड आणि रत्नागिरीचा हापूस याची चव, गोड, आकार, रंग सर्वच उत्तम आहेत. त्यामुळे मानांकनाच्या स्पर्धेत हा सर्वोत्तम ठरला आहे. त्यापाठोपाठ अलिबागच्या पांढर्‍या कांद्याची चव वैशिष्ट्यपूर्ण असून गोडवा अधिक आहे. तसेच औषधी गुणधर्मही आहे. आता तिसर्‍या मानांकनासाठी जाणारे फळ जांभूळ आहे.

पालघरमध्ये बहाडोलीचे जांभूळ

पालघर तालुक्यातील बहाडोलीचे जांभूळ हे आकाराने मोठे, चवीला उत्तम आणि औषधी गुणधर्म असलेले जांभूळ आहे. अशाच पद्धतीचे जांभूळ ठाणे जिल्ह्यातील बदलापूर भागातही आहे. या दोन्ही जांभळांची प्रतवारी तपासली जात आहे. यावर संशोधनही होत आहे. ही प्रक्रिया पार पडल्यानंतर जीआय मानांकनासाठी त्याचा प्रवास सुरू होईल, असेही या दोन्ही संशोधकांनी स्पष्ट केले.

त्याचबरोबर कोकणातील जी वैशिष्ट्यपूर्ण फळपिके आहेत, त्यांचा प्रसार वाढावा म्हणून त्यांची कलमेही कृषी विद्यापीठात तयार होत आहेत. ज्या ज्या भौगोलिक वातावरणात ही फळपिके अधिक बहरतात, तिथे त्यांची लागवड वाढावी आणि अधिक संशोधन व्हावे म्हणून कोकण कृषी विद्यापीठाने पावले टाकली आहेत. जीआय मानांकनामुळे या फळपिकांचे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील स्थानही भक्‍कम होऊ शकणार आहे.

कोकणच्या वैशिष्ट्यपूर्ण चवीच्या जांभळाची चर्चा सर्वदूर आहे. म्हणूनच या हंगामात या जांभळाच्या भौगोलिक मानांकनाची परीक्षा होणार आहे. जांभूळ परिसंवर्धन आणि समुदाय विकास या माध्यमातून विविध संस्था पुढे येऊन जांभळाच्या लागवडवाढीचे प्रयत्न करत आहेत.

बहाडोलीच्या जांभळांना मुंबई आणि लगतच्या बाजारपेठेत मोठी मागणी असते. डिसेंबर महिन्यात जांभळाच्या झाडाला मोहोर आल्यानंतर मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात जांभळे काढणीसाठी तयार होतात आणि जून महिन्याच्या दुसर्‍या आठवड्यापर्यंत दीड महिना जांभूळ फळांचा हंगाम सुरू राहतो.

चांगल्या दर्जाच्या जांभळाला बाजारात सरासरी 300 ते 400 रुपये किलोप्रमाणे भाव मिळतो. जांभळाच्या झाडामुळे शेतकर्‍यांना वार्षिक 25 ते 30 हजारांचे उत्पन्‍न मिळते. गेल्या वर्षी मान्सून लांबल्याने जांभळाच्या झाडांना महिनाभराच्या उशिराने मोहोर आला होता. यावर्षीही तीच स्थिती आहे.

शंभरहून अधिक वर्षे 200 एकरवर जांभळाचे संवर्धन

ठाणे आणि पालघरच्या आदिवासी पाड्यांमध्ये जांभूळ संवर्धनासाठी पिढ्यान्पिढ्या प्रयत्न होत आहेत. शंभरहून अधिक वर्षे जांभूळ पिकांचे संवर्धन या भागात होत आहे. मुंबई-पुण्यात बदलापूरचे जांभूळ प्रसिद्ध आहे. या भागात 200 हेक्टरवर जांभूळ आहे. तर पालघरच्या बहाडोलीत 500 एकरमध्ये जांभूळ आहे.

सिंधुदुर्गात जवळपास 5 हजार हेक्टरमध्ये जांभूळ आहे; तर रत्नागिरी जिल्ह्यात 2 हजार हेक्टरमध्ये जांभूळ आहे. जांभळाच्या पिकांमधून जवळपास 15 कोटीपर्यंत उलाढाल दर हंगामात होते. आदिवासी कुटुंबासाठी जांभूळ हे वर्षानुवर्षे त्यांच्या जगण्याचे साधन आहे. म्हणूनच त्याला महत्त्वही अधिक आहे.

नाशिकमधील आदिवासी पाड्यांतील महिला जांभळे वेचून ती बाजारात विकतात. यातून जांभळाची रेसवेरा वाईन निर्माण केली जात आहे. जांभळातील औषधी गुणधर्म पाहता ही तयार झालेली रेसवेरा वाईनही गुणवर्धकही आहे. हा प्रयोग यशस्वी झाल्याने जांभळाची इकॉनॉमी उंचावत आहे.

मोठा आकार, उत्तम चव… हीच ठाणे, पालघरच्या जांभळाची खरी ओळख

1. ठाणे जिल्ह्यात अंबरनाथ, बदलापूर आणि पालघर जिल्ह्यांत बहाडोली भागात जांभळाचे मळे पाहायला मिळतात. सर्वाधिक इमारती होत असलेल्या या भागात उत्तम प्रतीचे जांभूळही होतेे. मुंबईत या जांभळाला मोठी बाजारपेठ आहे.

2. बदलापूरच्या बोराडपाडा, येरंजा, जांभूळ, वसंत, पादीरपाडा या भागात जांभळाची मोठी शेती आहे. बदलापूरचे जांभूळ आख्यान आता भौगोलिक मानांकनाच्या स्पर्धेत येऊन पोहोचले आहे. याचे कारण जांभळाचा असलेला मोठा आकार, उत्तम चव, रंग आणि औषधी गुणधर्म हे याच भागात पाहायला मिळते. जमिनीच्या गुणवैशिष्ट्यानुसार त्या त्या फळाला वेगळी चव आणि गुणधर्म प्राप्त होतात, असे कृषी विद्यापीठाचे विस्तार संचालक डॉ. संजय भावे यांनी सांगितले आहे.

3. बदलापूरच्या जांभळाच्या भौगोलिक मानांकनासाठी तज्ज्ञ प्रा. गणेश हिगमिरे यांनीही पुढाकार घेतला आहे. या भागात 25 ते 30 लाखांची उलाढाल होते. या पाठोपाठ पालघर जिल्ह्यातील बहाडोली हेसुद्धा जांभूळ पिकाचे मुख्य केंद्र आहे. या दोन गावांमधील भौगोलिक अंतर हे 50 किलोमीटरच्या दरम्यान आहे. मात्र दोन्ही गावांतील जांभळाची प्रतवारी मात्र सारखीच आहे.

4. बहाडोली जांभळाचे गाव म्हणूनही हा भाग ओळखला जातो. जवळपास 10 हजार जांभळाची झाडे या भागात पाहायला मिळतात. जांभूळ हे मूळ जंगली पीक असल्याने या झाडाला वाढवण्यासाठी फार मेहनत घ्यावी लागत नाही.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news