‘कोकण केअर’चा ठेका रद्द करा; गुन्हा दाखल करा

‘कोकण केअर’चा ठेका रद्द करा; गुन्हा दाखल करा

सांगली : पुढारी वृत्तसेवा : बेडग रस्त्यावरील जैव वैद्यकीय कचरा भस्मीकरण (बायो मेडिकल वेस्ट) प्रकल्प कोकण केअर एंटरप्रायझेसला चालविण्यास दिलेला ठेका रद्द करावा. कुलूप तोडून कचरा भस्मीकरण केंद्र ताब्यात घेतल्याप्रकरणी 'कोकण केअर'वर फौजदारी गुन्हा दाखल करावा, अशी चर्चा स्थायी समिती सभेत झाली आहे.

महापालिकेत शुक्रवारी स्थायी समिती सभा झाली. अध्यक्षस्थानी निरंजन आवटी होते. सदस्य संतोष पाटील, फिरोज पठाण, जगन्नाथ ठोकळे, संजय यमगर, गजानन आलदर, करण जामदार, मनगू सरगर, अनिता व्हनखंडे, कल्पना कोळेकर, सविता मदने, पद्मश्री पाटील, गायत्री कल्लोळी, संगीता हारगे, नर्गिस सय्यद उपस्थित होते. नगरसचिव चंद्रकांत आडके यांनी विषयपत्राचे वाचन केले.

जैव वैद्यकीय कचरा भस्मीकरण प्रकल्पाचा ठेका यापूर्वी कोकण केअरला दिलेला होता. मात्र त्यांनी हे काम मध्येच थांबवले. हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. ही बाब वैद्यकीय आरोग्याधिकारी यांनी आयुक्तांच्या निदर्शनास आणून दिली होती का, असा प्रश्‍न सदस्यांनी उपस्थित केला.

कोकण केअरला हा प्रकल्प चालविण्यास देण्याचा ऑक्टोबर 2021 मध्ये केलेला ठराव बेकायदेशीर आहे. महासभेत चर्चा न होता केलेला ठराव रद्द करावा. हा प्रकल्प चालविण्यास देण्यासाठी खुली निविदा काढावी, अशी चर्चा झाली. दरम्यान, यासंदर्भातील निर्णयाचा अधिकार महासभेला आहे. त्यामुळे महासभेत हा विषय आणावा, असे निर्देश स्थायी समिती सभेने दिले. भस्मीकरण प्रकल्पाचा ताबा आयएमए मिरज यांच्याकडे असताना कुलूप तोडून ताबा घेतल्याप्रकरणी 'कोकण केअर'वर फौजदारी गुन्हा दाखल करावा अथवा हे कुलूप महापालिकेने तोडून ताबा दिला याचा लेखी खुलासा वैद्यकीय आरोग्याधिकारी यांनी करावा, असे निर्देश दिल्याची माहिती सभापती आवटी यांनी दिली.

मिरज येथील कत्तलखाना चालविण्याचा ठेका मुंबई येथील कंपनीकडे आहे. मात्र कंपनीचे नाव कायम ठेवून कंपनीचे मालक बदलले आहेत. या बदलाबाबत महासभेला कळवलेले नाही. कत्तलखान्यात कत्तल करण्याकडे दुर्लक्ष आहे. त्यामुळे कत्तलखान्याबाहेर अन्यत्र ठिकठिकाणी जनावरांच्या कत्तली होत आहेत. त्यातून आरोग्याचा व सामाजिक प्रश्‍न उद्भवण्याची शक्यता आहे. याप्रकरणी अहवाल मागवा. कंपनीचा ठेका रद्द करून काळ्यात यादीत समाविष्ट करा, असे निर्देश स्थायी समितीने अधिकार्‍यांना दिले. प्रभाग क्रमांक 10 मधील आप्पासाहेब पाटील नगर येथील अंतर्गत रस्ते खराब झाले आहेत. तातडीने पॅचवर्क करावे, अशी मागणी ठोकळे यांनी केली.

ठेकेदारांना ब्लॅक लिस्ट करणे लांबणीवर

मुरुमीकरण व काँक्रिटीकरण कामाच्या दोन ठेकेदारांना अपात्र करून त्यांना काळ्यात यादीत टाकण्याचा विषय प्रशासनाने स्थायी समिती सभेपुढे आणला होता. दरम्यान, ब्लॅक लिस्ट करणे गरजेचे असल्याबद्दल सविस्तर अहवाल पुढील सभेपुढे आणा, असे निर्देश अधिकार्‍यांना दिले. काम प्रलंबित ठेवणार्‍या अन्य बड्या ठेकेदारांवर कारवाई केली जात नाही, केवळ लहान ठेकेदारांवरच कारवाई का, असा सूर काही सदस्यांचा होता.

भूखंड स्वच्छ; एफआयआर मागे येथील सुभाषनगरमधील खासगी भूखंड संबंधितांनी स्वच्छ केल्याने एफआयआर मागे घेण्यास मान्यता दिली.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news