केंद्रीय कर्मचार्‍यांना दिवाळी भेट; महागाई भत्त्यात तीन टक्के वाढ

केंद्रीय कर्मचार्‍यांना दिवाळी भेट; महागाई भत्त्यात तीन टक्के वाढ

नवी दिल्ली ; पुढारी वृत्तसेवा : केंद्र सरकारने कर्मचार्‍यांच्या महागाई भत्त्यात तीन टक्क्यांनी वाढ करीत दिवाळी भेट दिली आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या गुरुवारी झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडली.

केंद्र सरकारच्या सेवेतील कर्मचारी तसेच निवृत्तिधारकांचा महागाई भत्ता आता 31 टक्क्यांवर गेला असल्याची माहिती केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी मंत्रिमंडळ बैठकीनंतर पत्रकार परिषदेत दिली.

महागाई भत्त्यात वाढीच्या निर्णयाचा लाभ एक कोटींहून अधिक कर्मचारी व निवृत्तिधारकांना मिळणार आहे. 1 जुलै 2021 पासून वाढीव महागाई भत्ता लागू राहील. यासाठी सरकारने 9,488 कोटी रुपयांची तरतूद केली असल्याची माहितीही ठाकूर यांनी दिली.

केंद्र सरकारने गेल्या जुलै महिन्यात महागाई भत्त्यात 11 टक्क्यांची भरघोस वाढ करून ती 28 टक्के इतकी केली होती. कामगार मंत्रालयाने अखिल भारतीय ग्राहक किंमत निर्देशांकाचे तीन महिन्यांचे आकडे जारी केले होते. हा निर्देशांक वाढल्यामुळे केंद्र सरकार महागाई भत्त्यामध्ये वाढ करू शकते, असा अहवाल सरकारला सादर करण्यात आला होता.

त्यानुसार महागाई भत्त्यात तीन टक्क्यांनी वाढ करण्यात आली आहे. महागाई भत्त्यामध्ये वाढ झाल्यामुळे प्रवासी भत्ता, शहर भत्ता, प्रॉव्हिडंट फंड आणि ग्रॅच्युईटी यामध्येही वाढ होणार आहे. ज्या कर्मचार्‍याचे मूळ वेतन 18 हजार रुपये इतके आहे, त्याला यापुढील काळात 5580 रुपये महागाई भत्ता मिळणार आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news