मानवी शरीरात परजीवीच्या रुपात वेगवेगळ्या प्रकारचे जंत किंवा कृमी राहत असतात. वाढीच्या वेगवेगळ्या चक्रासाठी ते मानवी शरीराचा पोषणासाठी वापर करतात. त्याचा आरोग्यावर अपायकारक परिणाम होतो. पोटात जंत झाल्यानंतर वेगवेगळ्या प्रकारची लक्षणे दिसू लागतात. लहान मुलांनाच हा त्रास होतो असे बरेच जण समजात. परंतु मोठ्या माणसांमध्येदेखील हा त्रास बर्याच प्रमाणात दिसून येतो.
अत्यंत चिवट आणि बरे होण्यासाठी खूप जास्त कालावधी घेणारा पोटात जंत हा त्रास आहे. प्रामुख्याने अस्वच्छतेमुळे हा त्रास दिसून येतो. कृमींच्या जीवनचक्रातील वेगवेगळ्या अवस्थांना ठराविक कालावधीनंतर रोखणे हाच यावरील उपचारपद्धतीचा प्रमुख गाभा आहे.
हा त्रास होण्याचे आणखी एक कारण म्हणजे आहाराचे पचन योग्य प्रकारे न होणे. पचन योग्य न झाल्यामुळे पचनसंस्थेत मोठ्या प्रमाणात उष्णता निर्माण होते. या उष्णतेमुळे अन्न पचण्यास आणखी त्रास होतो आणि पोट साफ होत नाही. अशा वेळी शरीरात राहिलेले टाकाऊ अन्न हे आंबण्याच्या अवस्थेत जाते आणि त्यामुळे वेगवेगळ्या प्रकारच्या कृमी निर्माण होण्याची परिस्थिती निर्माण होते.
अनेकदा व्यक्ती पोट बिघडले असताना किंवा अपचन झालेले असतानादेखील जेवतात. काही जण आंबट, गोड यासारखे पदार्थ किंवा पेय खूप जास्त प्रमाणात सेवन करतात. बेसन, उडीद यासारखे पीठ किंवा गुळापासून तयार केलेले गोड पदार्थ जास्त प्रमाणात सेवन करणे, व्यायाम न करणेे, दिवसा झोपणेे, दूध-फळे, दूध आणि खारट पदार्थ असे गुणधर्माने विरुद्ध असणारे पदार्थ एकत्र करून खाणे, शिळे, नासलेले पदार्थ खाणे, भाज्या स्वच्छ न धुता खाणे यासारख्या वेगवेगळ्या कारणाने कृमी होण्याची शक्यता वाढते.
शरीरात कफ वाढल्यास देखील कृमी तयार होतात. हे कृमी वेगवेगळ्या प्रकारचे असतात. खाल्लेले अन्न जेथे साठते तेथे हे तयार होतात.
यामुळे तोंडाला पाणी सुटते, उलटी येते, तोंडाला चव राहत नाही. अन्नाचे पचन नीट होत नाही. ताप येतो, काही वेळा बेशुद्ध अवस्थादेखील येते. उत्साह वाटत नाही. सतत जांभया किंवा शिंका येतात. पोटात गॅस होतो. अंग आखडल्यासारखे वाटू लागते. वजन कमी होते. ही सर्व लक्षणे कफ वाढल्यामुळे तयार होणार्या कृमींमुळे दिसू लागतात. या कृमींची संख्या वाढली तर व्यक्तीच्या श्वासाला आणि ढेकराला देखील दुर्गंधी येते.
वेगवेगळ्या उपचारपद्धतीनुसार जंतांवर वेगवेगळे उपचार केले जातात. जंतनाशक औषधांमुळे जुलाब होऊन जंत बाहेर टाकले जातात. पण हा उपचार परिपूर्ण नसतो. कारण यामुळे तेवढ्यापुरते जंत शरीराबाहेर टाकले जातात. जंतांपासून कायमची सुटका होण्यासाठी जंतांच्या बिजनिर्मितीपासून ते पुन्हा मोठे जंत तयार होईपर्यंतच्या वेगवेगळ्या अवस्थांमधील चक्र मोडावे लागते.
कारण असलेले जंत पडून गेले तरीही त्याचे बीज आतड्यात असते आणि पोटात पुन्हा त्यांच्या वाढीसाठी पोषक वातावरण तयार झाले तर त्यांच्यापासून पुन्हा जंत तयार होतात. यासाठी तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार ठराविक काळानंतर ठराविक औषधांचा पूर्ण कोर्स करावा लागतो. त्यामुळे जंतांचे चक्र मध्ये तोडले जाते आणि जंत पुन्हा निर्माण होण्याची क्रिया थांबवली जाते. त्यामुळे जंताचे औषध एकदाच घेऊन उपयोग नसतो तर ते काही काळासाठी नियमितपणे घ्यावे लागते.
लहान मुलांना जंत झाल्यास कुड्याची साल ताकात उगाळून तयार झालेल्या पेस्टमध्ये एक चिमूटभर डीकेमालीची पूड, थोडेसे हिंग घालून हे मिश्रण आठ दिवस द्यावे. यामुळे जंत जातात.
ज्यांना वारंवार जंत होतात अशा व्यक्तींनी जेवणानंतर दोन ते तीन लवंगा चावून खाव्यात. जंतांवर प्रतिबंधात्मक उपाय म्हणजे शरीराची स्वच्छता ठेवणे, हात-पाय नखे व्यवस्थित साबणाने धुणे तसेच उवा-लिखा यासारख्या शरीराबाहेरच्या कृमींवर प्रतिबंधात्मक उपाय म्हणून केसांची स्वच्छता राखणे महत्त्वाचे आहे. वेळच्या वेळी नखे कापणे, स्वच्छ, शुद्ध अन्न सेवन करणे, आठवड्यातून दोनदा केस धुणे यांसारख्या साध्या उपायांनीदेखील जंतांची वाढ रोखता येऊ शकते.
अतीप्रमाणात मिठाई खाणे, मांसाहार करणे, कफ वाढवणारी फळे, सिताफळ, केळी, कोबी, फ्लॉवर खाणे टाळावे. जास्त प्रमाणात मिठाई खाऊ नये. महत्त्वाचे म्हणजे कितीही मोह झाला तरी उघड्यावरचे अन्न खाऊ नये. न उकळलेले खराब पाणी, शीतपेये यामुळेदेखील जंतू वाढतात. म्हणून याबाबत योग्य ती स्वच्छता राखणे फायद्याचे ठरते. सुरुवातीलाच सांगितल्याप्रमाणे जंतांचा त्रास अतिशय चिवट असतो. परंतु सातत्य ठेवले तर या त्रासापासून सहज सुटका होऊ शकते.