कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के : पत्रकारिता अध्यासनासाठी शासनाने निधी द्यावा

कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठात आयोजित पद्मश्री कै. डॉ. ग. गो. जाधव पत्रकारिता अध्यासन सल्‍लागार समितीच्या बैठकीत बोलताना दै. ‘पुढारी’चे मुख्य संपादक डॉ. प्रतापसिंह जाधव. यावेळी उपस्थित कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के, ‘पुढारी’चे समूह संपादक डॉ. योगेश जाधव, प्र-कुलगुरू डॉ. पी. एस. पाटील, कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर, समिती सदस्य डॉ. रमेश जाधव, समन्वयक डॉ. शिवाजी जाधव, उपअभियंता एम. के. पाटील.
कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठात आयोजित पद्मश्री कै. डॉ. ग. गो. जाधव पत्रकारिता अध्यासन सल्‍लागार समितीच्या बैठकीत बोलताना दै. ‘पुढारी’चे मुख्य संपादक डॉ. प्रतापसिंह जाधव. यावेळी उपस्थित कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के, ‘पुढारी’चे समूह संपादक डॉ. योगेश जाधव, प्र-कुलगुरू डॉ. पी. एस. पाटील, कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर, समिती सदस्य डॉ. रमेश जाधव, समन्वयक डॉ. शिवाजी जाधव, उपअभियंता एम. के. पाटील.
Published on
Updated on

कोल्हापूर ; पुढारी वृत्तसेवा : शिवाजी विद्यापीठात स्थापन झालेले पद्मश्री कै. डॉ. ग. गो. जाधव पत्रकारिता अध्यासन हे पत्रकारितेतील देशातील पहिलेच अध्यासन आहे. सध्या डिजिटल युग आहे. यामुळे या अध्यासनात बदलत्या नवतंत्रज्ञानावर आधारित आधुनिक अभ्यासक्रम सुरू केले जाणार आहेत. याकरिता राज्य शासनाने जाहीर केलेला निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के यांनी केली.

पद्मश्री कै. डॉ. ग. गो. जाधव पत्रकारिता अध्यासनाच्या सल्‍लागार समितीची मंगळवारी दै. 'पुढारी'चे मुख्य संपादक डॉ. प्रतापसिंह जाधव, समूह संपादक डॉ. योगेश जाधव यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के यांच्या अध्यक्षतेखाली शिवाजी विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषद सभागृहात बैठक झाली.

डॉ. प्रतापसिंह जाधव म्हणाले, पद्मश्री कै. डॉ. ग. गो. जाधव पत्रकारिता अध्यासनासाठी स्वतंत्र इमारत होत आहे. या अध्यासनाच्या वतीने विविध उपक्रम सातत्याने राबविले जाणार आहेत. त्याकरिता अध्यासनासाठी शाश्‍वत निधीची आवश्यकता आहे. अध्यासनाला दरवर्षी निधी उपलब्ध झाला तर अध्यासनाचे कामकाज सुरळीतपणे सुरू राहणार आहे.

देशभरच नव्हे तर जगभर या अध्यासनाची ओळख निर्माण झाली पाहिजे, असे सांगत डॉ. जाधव म्हणाले, याकरिता या अध्यासनाबाबत वेगळा द‍ृष्टिकोन आवश्यक आहे. त्यानुसार नवतंत्रज्ञानावर आधारित विविध उपक्रम सुरू होण्याची गरज आहे. त्यादृष्टीने अध्यासनाद्वारे राबविण्यात येणार्‍या उपक्रमांची रूपरेषा निश्‍चित करा. दर तीन महिन्यांनी याबाबत बैठक घेऊन कामकाजाला गती द्या, असेही त्यांनी सांगितले.

डॉ. योगेश जाधव म्हणाले, पत्रकारितेचे स्वरूप दिवसेंदिवस बदलत चालले आहे. सध्या डिजिटल युग आहे. यामुळे नवनवे तंत्रज्ञान येत आहे. अशा तंत्रज्ञानावर आधारित आणि आवश्यक अशा अभ्यासक्रमाची संधी अध्यासनाच्या माध्यमातून उपलब्ध करून दिली पाहिजे. प्रगत तंत्रज्ञान, जागतिक स्तरावरील पत्रकारितेतील नवे ट्रेंड, नवी साधने आदींची माहिती होणे आवश्यक आहे.

त्यादृष्टीने दर दोन महिन्यांनी नवनवीन विषयांवरील कार्यशाळा आयोजित केल्या पाहिजेत. बदलत्या तंत्रज्ञानानुसार प्रात्यक्षिकांवर आधारित आणि रोजगारांची शाश्‍वती असणार्‍या अभ्यासक्रमांना प्राधान्य द्या. त्यासाठी प्रगत अभ्यासक्रमांची यादी तयार करून त्यानुसार प्रमाणपत्र, पदविका, पदवी अशा स्वरूपात अभ्यासक्रम सुरू करा, अध्यासनाच्या वतीने स्टुडिओ उभा करावा, अशी सूचनाही डॉ. जाधव यांनी केली.

डॉ. शिर्के म्हणाले, सल्‍लागार समितीत आणखी तज्ज्ञांचा समावेश करा, त्यांच्यासमवेत बैठक घेऊन, नव तंत्रज्ञानावर आधारित प्रगत अभ्यासक्रमाची रूपरेषा निश्‍चित केली जाईल. त्यानुसार या अध्यासनात आधुनिक अभ्यासक्रम सुरू केले जातील, असेही त्यांनी सांगितले. अध्यासनासाठी आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध करून दिले जाईल. यासह अध्यासनाच्या इमारतीत वर्ग सुरू करण्याबाबत आवश्यक साधनसामग्री तातडीने उपलब्ध करून दिली जाईल, असेही त्यांनी सांगितले.

बैठकीत मास कम्युनिकेशन, जर्नालिझम विभाग आणि अध्यासन या संपूर्ण परिसराचे नियोजनबद्ध सुशोभिकरण करणे, पहिल्या टप्प्यातील बांधकाम पूर्ण झालेल्या अध्यासनाच्या इमारतीत आधुनिक अभ्यासक्रमाचे वर्ग सुरू करणे, अध्यासनाबाबत दर तीन महिन्यांतून एक बैठक घेणे, अध्यासनाचा माहितीपट तयार करणे आदी निर्णय घेण्यात आले. तत्पूर्वी डॉ. जाधव यांनी अध्यासनाच्या इमारतीच्या पहिल्या टप्प्यातील बांधकामाची पाहणी केली. आवश्यक सुविधांसह दुसर्‍या टप्प्यातील बांधकामाबाबत त्यांनी विविध सूचना केल्या.

अध्यासनाचे समन्वयक डॉ. शिवाजी जाधव यांनी स्वागत करून विषय पत्रिकेचे वाचन केले. कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर यांनी आभार मानले. यावेळी प्र-कुुलगुुरू डॉ. पी. एस. पाटील, समिती सदस्य डॉ. रमेश जाधव, डॉ. रत्नाकर पंडित, प्रभारी उपकुलसचिव रणजित यादव यांच्यासह आर्किटेक्चर जीवन बोडके, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता एम. के. पाटील उपस्थित होते.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news