किसनवीर कारखान्यासाठी 69.31 टक्के मतदान

किसनवीर कारखान्यासाठी 69.31 टक्के मतदान
Published on
Updated on

वाई ; पुढारी वृत्तसेवा : सहा तालुक्यांचे कार्यक्षेत्र असलेल्या किसनवीर सहकारी साखर कारखान्यासाठी आ. मकरंद पाटील व मदनदादा भोसले या दोन गटांत मोठी राळ उडाली. मंगळवारी कारखान्यासाठी 154 मतदान केंद्रांवर प्रत्यक्ष मतदान झाले असून, 69.31 टक्के सभासदांनी मतदानाचा हक्क बजावला. सर्वत्र शांततेत मतदान झाले. किसनवीरची गत निवडणूक एकतर्फी झाली होती. मात्र, यंदा निवडणूक लागल्याने यंदा मकरंदआबा बाजी मारणार की मदनदादा पुन्हा सत्ता राखणार, याकडे लक्ष लागून राहिले आहे.

दशकभराच्या कालावधीनंतर आ. मकरंद पाटील गटाने किसनवीर कारखान्याच्या निवडणुकीत उडी घेतली. त्यामुळे यंदा किसनवीरसाठी मोठी चुरस निर्माण झालेली दिसून प्रथमच कारखान्यासाठी तब्बल 346 जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले. त्यानंतर माघार घेतल्यानंतर 46 जण रिंगणात राहिले. 21 जागांसाठी झालेली ही रणधुमाळी आता अंतिम टप्प्यात आली आहे.

मंगळवारी सकाळी आठ वाजता प्रत्यक्ष मतदानास सुरुवात झाली. आ. मकरंद पाटील, जिल्हा बँकेचे अध्यक्ष नितीन पाटील यांनी बोपेगाव येथे, तर किसनवीर कारखान्याचे चेअरमन मदनदादा भोसले व त्यांच्या कुटुंबीयांनी भुईंज येथील मतदान केंद्रावर मतदानाचा हक्क बजावला.

मतदानाला अतिशय संथगतीने सुरुवात झाली, त्यामुळे दोन्ही पॅनेलचे कार्यकर्ते मतदारांना बाहेर पडण्याचे आवाहन करत होते. मात्र, उन्हाच्या तडाख्यामुळे मतदार बाहेरच पडत नसल्याचे चित्र होते. अखेर दुपारी चारनंतर मतदानाला वेग आला. सकाळी 8 ते 10 या वेळेत 12 टक्के मतदान झाले होते.

दुपारनंतर मतदानासाठी सभासद बाहेर पडू लागले. दुपारी 12 पर्यंत 52 हजार पैकी 16 हजार 696 सभासदांनी मतदान केले होते. दुपारी 2 वाजेपर्यंत 25 हजार 107 मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. तर दुपारी 4 पर्यंत 32 हजार 432 सभासदांनी मतदान केले. सायंकाळी 5 पर्यंत 35 हजार 771 व्यक्ति सभासद तर 331 संस्था सभासदांनी मतदान केले. मतदान झाल्यानंतर वाई एमआयडीसीतील शासकीय गोडावूनमध्ये सर्व मतपेट्या नेण्यात आल्या. या ठिकाणी चोख पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

किसनवीरसाठी सर्व सहा तालुक्यात शांततेत मतदान झाले. कोठेही अनुचित प्रकार घडला नाही. या मतदान प्रक्रियेवर लक्ष ठेवण्यासाठी 17 झोनल अधिकार्‍यांची नेमणूक करण्यात आली होती. तर प्रत्येक केंद्रावर पोलिस असल्याने नियमानुसारच सर्व मतदान झाले. या दरम्यान आ. मकरंद पाटील, नितीनकाका पाटील, मदनदादा भोसले व आ. महेश शिंदे यांनी मतदान केंद्राला भेटी देवून आढावा घेतला.
मतदान झाल्यानंतर आ. मकरंद पाटील आणि मदनदादा भोसले यांनी दोघांनी आपण जिंकणार असल्याचा दावा केला आहे. गुरूवारी मतमोजणी होणार असून त्यानंतरच चित्र स्पष्ट होणार आहे.

उद्या दुपारी 1 वाजता पहिला निकाल

गुरुवारी (दि. 5) सकाळी 8 वाजता मतमोजणीस सुरुवात केली जाणार आहे. मतमोजणीसाठी तब्बल 77 टेबल ठेवण्यात आले आहेत. फक्त दोन राऊंडमध्येच मतमोजणी पूर्ण केली जाणार आहे. मतमोजणीसाठी प्रत्येक टेबलवर 4 कर्मचारी असणार आहेत. यावेळी प्रत्येक टेबलवर दोन्ही गटांतील एक-एक प्रतिनिधी उपस्थित राहणार आहे. प्रत्येक मतपेटीत 3 ते 4 हजार मतपत्रिका असल्याने पहिला निकाल येण्यासाठी साधारणत: दुपारी 1 वाजणार आहे, तर पूर्ण मतमोजणी होण्यास रात्री 9 वाजणार असल्याची माहिती जिल्हा उपनिबंधक मनोहर माळी यांनी दिली.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news