किसन वीर कारखान्याच्या चेअरमनपदी आबा की काका?

किसन वीर कारखान्याच्या चेअरमनपदी आबा की काका?
Published on
Updated on

सातारा : पुढारी वृत्तसेवा : भुईंज, ता. वाई येथील किसन वीर सहकारी साखर कारखान्याच्या चेअरमन, व्हा. चेअरमन निवडी मंगळवार, दि. 17 रोजी सकाळी 11 वाजता होेणार आहेत. या पार्श्‍वभूमीवर सोमवारी सायंकाळी जिल्हा बँकेत नेतेमंडळींची चर्चा झाली. चेअरमनपदासाठी मकरंदआबा योग्य राहतील की नितीनकाका यावर बराच वेळ खल सुरू होता. याबाबतचा फैसला मंगळवारी सकाळीच होणार आहे. याबाबतचे सर्वाधिकार विधानपरिषदेचे सभापती ना. रामराजे ना. निंबाळकर यांना देण्यात आले आहेत.

किसन वीर कारखान्यासाठी आ. मकरंद पाटील आणि मदनदादा भोसले या पारंपरिक स्पर्धकांमध्येच लढत झाली. यामध्ये आ. मकरंद पाटील, नितीनकाका पाटील यांच्या शेतकरी बचाव पॅनेलने मदनदादांच्या शेतकरी विकास पॅनेलचा 21-0 असा सफाया केला. या निवडणुकीत बचाव पॅनेलच्या प्रत्येक उमेदवाराने साडेनऊ हजारांचे मताधिक्क्य घेतले होतेे. त्यामुळे तब्बल 19 वर्षांनंतर आ. मकरंद पाटील यांनी किसन वीर कारखान्यावर सत्ता मिळवली आहे.

निवडणुकीनंतर किसन वीर कारखान्याला ऊर्जितावस्था आणण्यासाठी आ. मकरंद पाटील, नितीनकाका पाटील यांचे प्रयत्न सुरू झाले आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या भेटीपासून ते भागभांडवल उभारण्याची तयारी पाटील बंधूंकडून सुरू आहे. 5 मे रोजी कारखान्याचा निकाल जाहीर झाल्यानंतर वाई व परिसरात चेअरमन कोण होणार? यावर चर्चा सुरू होत्या.

अखेर मंगळवारी चेअरमन व व्हा. चेअरमन पदांच्या निवडी होणार असल्याने संचालकांसह कार्यकर्त्यांची उत्सुकता शिगेला पोहचली आहे. कवठे येथे झालेल्या कार्यक्रमातही आ. मकरंद पाटील यांनी चेअरमन व व्हा. चेअरमन निवडीबाबत संचालक, पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी चर्चा केली. त्यानंतर सोमवारी सायंकाळी जिल्हा बँकेतही बैठक झाली.

या बैठकीला विधान परिषदेचे सभापती ना. रामराजे ना. निंबाळकर, आ. मकरंद पाटील, आ. शिवेंद्रराजे भोसले, माजी आमदार प्रभाकर घार्गे, जिल्हा बँकेचे चेअरमन नितीनकाका पाटील, किसनवीर कारखान्याचे नूतन संचालक शशिकांत पिसाळ, दिलीप पिसाळ, सरला वीर, प्रमोद शिंदे यांच्यासह संचालक उपस्थित होते.

किसनवीर कारखान्यावर कर्जाचा डोलारा असून कारखाना सुरू करणे मोठे आव्हान आहे. यासाठी मकरंदआबा किंवा नितीनकाका यांनीच चेअरमनपद घेवून कारखान्याची धुरा अंगावर घ्यावी, असे तज्ञ व माजी संचालकांनी सुचवले होते. यावरच या बैठकीत चर्चा झाली. कायदेशीरदृष्ट्या नितीनकाका यांना बँकेसह कारखान्याचेही चेअरमनपद भूषवता येते.

यापूर्वी नितीनकाका कारखान्याचे संचालकही राहिलेले आहेत. सहकारातील अभ्यास व मागील अनुभवाच्या जोरावर ते कारखान्याचा उत्तम कारभार सांभाळतील, असा सूर नेतेमंडळींनी काढला. त्याचवेळी भागभांडवल जमा करायचे असल्याने आ. मकरंद पाटील यांनी चेअरमनपद स्वीकारावे. शिवाय मंत्रालयातील बैठकांमध्ये किसनवीर कारखान्याचे चेअरमन म्हणून आ. मकरंद पाटील असतील तर त्याला जास्त महत्व येईल, असाही सूर निघाला.

त्यातच नितीनकाका पाटील यांनीही मकरंदआबा चेअरमन व्हावेत, अशी इच्छा व्यक्‍त केली आहे. त्यामुळे रात्री उशिरापर्यंत चाललेल्या बैठकीत आबा की काका? याबाबतचा निर्णय झाला नाही. सकाळी याबाबतचा फैसला होणार आहे. याबाबतचे सर्वाधिकार विधानपरिषदेचे सभापती ना. रामराजे ना. निंबाळकर यांना देण्यात आले आहेत. तर वाई तालुका वगळून अन्य तालुक्यांना व्हा. चेअरमनपद दिले जाणार आहे. पहिल्यांदा कुठल्या तालुक्याला संधी मिळणार याची उत्सुकता आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news