काश्मीरमधून हिंदूंचे पलायन, शिखांचा संहार काँग्रेसमुळेच : पंतप्रधान नरेंद्र मोदी

काश्मीरमधून हिंदूंचे पलायन, शिखांचा संहार काँग्रेसमुळेच : पंतप्रधान नरेंद्र मोदी

नवी दिल्ली ; पुढारी वृत्तसेवा : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी लोकसभेत काँग्रेससह विरोधकांवर घणाघात केले, यानंतर मंगळवारी राज्यसभेतही राष्ट्रपतींच्या भाषणावरील धन्यवाद प्रस्तावाच्या चर्चेला उत्तर देताना त्यांची आक्रमकता कायम राहिली. काँग्रेस नसती तर 1984 मध्ये शिखांचा नरसंहारही घडला नसता आणि काश्मीरमधून पंडितांसह हिंदूंचे पलायनही झाले नसते.

काँग्रेस नसती तर आणीबाणीचा कलंकही देशाच्या लोकशाहीला लागला नसता. जातीयवाद आणि प्रादेशिकवादाची दरी इतकी खोल गेली नसती. इथपर्यंतच ते थांबले नाहीत. काँग्रेसला आव्हान देताना ते म्हणाले, तुमच्या (काँग्रेसच्या) मते जर भारत एक राष्ट्रच नाही, तर मग तुम्ही स्वत:च्या पक्षाचे नाव 'इंडियन नॅशनल काँग्रेस' का म्हणून ठेवले आहे?

काँग्रेससाठी जर भारत एक राष्ट्रच नाही, तर सर्वात आधी काँग्रेसने आपले नाव बदलायला हवे. दुसरीकडे काँग्रेसवर मोदींच्या लागोपाठ प्रहारांमुळे नाराज झालेल्या काँग्रेस खासदारांनी सभागृहाबाहेर पडणे पसंद केले.

मोदी म्हणाले, महात्मा गांधी यांच्या इच्छेबरहुकूम काँग्रेसने संपुष्टात यायला हवे होते, पक्ष म्हणून विसर्जित व्हायला हवे होते; पण तसे घडले नाही. काँग्रेस नसती तर देशाची लोकशाही घराणेशाहीमुक्‍त राहिली असती. काँग्रेस नसती तर भारत परकीय अंधानुकरणाऐवजी स्वदेशी संकल्पांच्या वाटेवरून पुढे चालत राहिला असता. दशकानुदशके चाललेला भ्रष्टाचार नसता. काँग्रेस नसती तर मुलींना भट्टीत (तंदूर प्रकरण) जाळण्याचे प्रकार घडले नसते.

मूलभूत सुविधांसाठी देशातील सामान्य माणसाला इतकी वर्षे वाट बघावी लागली नसती. काँग्रेसने अभिव्यक्‍ती स्वातंत्र्याची किती गळचेपी केली ते किशोर कुमार (गायक), मजरूह सुल्तानपुरी (गीतकार, शायर), लता मंगेशकर यांचे बंधू हृदयनाथ मंगेशकर यांना विचारा. आकाशवाणीवर स्वातंत्र्यवीर सावरकरांची गाणी वाजविली म्हणून हृदयनाथ मंगेशकर यांना काँग्रेसने नोकरीवरून कमी केले होते.

मजरूह सुल्तानपुरी यांनी पंडित नेहरूंवर टीका केली म्हणून त्यांना (मजरूह यांना) एक वर्ष कारागृहात डांबून ठेवण्यात आले होते. प्रा. धर्मपाल यांना कारागृहात डांबले होते. इंदिरा गांधींसमोर झुकले नाहीत आणि आणीबाणीला पाठिंबा दिला नाही म्हणून गायक किशोरकुमार यांना त्रास देण्यात आला. एका कुटुंबाविरुद्ध कुणी आवाज उठवला, की काय घडत होते, ते सगळ्यांना माहिती आहे, असे मोदी यांनी सांगितले.

राहुल गांधींवर टीका; शरद पवारांचे कौतुक

राहुल गांधी यांचे नाव न घेता मोदी यांनी त्यांच्यावर टीका केली. राहुल गांधी यांना आत्मपरीक्षणाचा सल्लाही त्यांनी दिला. राहुल गांधी यांना सल्ला देताना ते म्हणाले, की तुम्ही शरद पवारांकडून काही शिकायला हवे. मोदींनी सभागृहात पवारांची स्तुतीही केली आणि त्यांचे आभारही मानले. सरकारतर्फे बोलावलेल्या बैठकीचा उल्लेख केला. या बैठकीत शरद पवार (राष्ट्रवादी) आणि ममता बॅनर्जींच्या तृणमूल नेत्यांनी सहभाग नोंदविला होता आणि काँग्रेस नेत्यांनी या बैठकीवर बहिष्कार घातला होता.

गोवामुक्‍तीच्या विलंबामागेही नेहरू

गोवामुक्‍तीला झालेल्या विलंबामागेही पंडित नेहरूंची धोरणे कारणीभूत होती. सरदार पटेल यांनी संस्थानांच्या विलीनीकरणासाठी राबविलेली धोरणे गोव्याला लागू झाली असती, तर गोवा 15 वर्षांपूर्वीच मुक्‍त झाला असता; पण नेहरूंना त्यांच्या आंतरराष्ट्रीय प्रतिमेची चिंता होती. गोवा वा देशाला यात प्राधान्य नव्हते, असा आरोपही मोदी यांनी केला.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news