कार्तिकी वारी चा दोन दिवसांत सकारात्मक निर्णय : शंभरकर

कार्तिकी वारी चा दोन दिवसांत सकारात्मक निर्णय : शंभरकर
Published on
Updated on

सोलापूर ; पुढारी वृत्तसेवा : पंढरपूरच्या कार्तिकी वारी संदर्भात मंदिर समितीने मला प्रस्ताव दिलेला आहे. यासंदर्भात जिल्हा पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांच्याकडूनही अभिप्राय आला आहे. त्यामुळे दोन दिवसांत कार्तिकी वारीसंदर्भात सकारात्मक निर्णय घेऊ, असे जिल्हाधिकारी मिलिद शंभरकर यांनी मंगळवारी स्पष्ट केले.

गेल्या दोन वर्षांपासून कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर धार्मिक स्थळांना कुलपे लागली होती. जिल्ह्यातील अनेक यात्रा-जत्रांवर निर्बंध घालण्यात आले होते. यामध्ये पंढरपूरच्या वारीचाही समावेश होता. कोरोनाची साथ कमी झाल्यामुळे घटस्थापनेपासून सर्वच धार्मिक स्थळे खुली झाली आहेत.

गेल्या आठवभरापासून येणार्‍या कार्तिकी वारी संदर्भात जिल्ह्यात चर्चा सुरू आहे. आता कोरोनाची साथ कमी आहे. तसेच लसीकरणाचा टक्काही जिल्ह्यात वाढला आहे. त्यामुळे येणार्‍या कार्तिक वारीसाठी काही नियम व अटींच्या अधीन राहुन जिल्हा प्रशासनाने परवानगी द्यावी, असा सविस्तर प्रस्ताव मंदिर समितीच्या वतीने शंभरकर यांना देण्यात आला होता.

दरम्यान, कार्तिक यात्रा पूर्व नियोजनाबाबत आज नियोजन भवन येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. बैठकीस जिल्हा पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते, अप्पर जिल्हाधिकारी संजीव जाधव, अतिरिक्त पोलिस अधीक्षक हिंमत जाधव, प्रांताधिकारी तथा मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी गजानन गुरव, उपविभागीय पोलिस अधिकारी विक्रम कदम, तहसीलदार सुशील बेल्हेकर, स्वप्नील रावडे, अभिजीत पाटील, पंढरपूर न.पा चे मुख्याधिकारी अरविंद माळी, कार्यकारी अभियंता दत्तात्रय गावडे यांच्यासह संबंधित विभागाचे विभाग प्रमुख उपस्थित होते.

यावेळी शंभकर यांनी कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव लक्षात घेता वारीच्या परंपरा अबाधित राखून तसेच नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने आवश्यक निर्णय घेण्यात येईल. यामध्ये नगरपालिका प्रशासनाने स्वच्छ पिण्याचे पाणी पुरवठा, तात्पुरती शौचालये, प्रदक्षिणा मार्गावरील रस्ते दुरुस्ती, डेंग्यू, मलेरीया या साथीच्या रोगाच्या अनुषंगाने फवारणी, पार्किंग व्यवस्था, 65 एकर व नदी पात्रातील वाळवंट स्वच्छता व सुविधेबाबतचा आढावा घेऊन आवश्यक त्या सूचना केल्या.

मंदिर समितीच्या प्रस्तावासंदर्भात शंभकर यांनी जिल्हा पोलिस अधीक्षकांचा अभिप्राय मागितला होता. वारीचे स्वरुप, होणारी गर्दी, बाजारपेठा व व्यापार्‍यांचे म्हणणे याचा विचार करून सातपुते यांनीही आपला अभिप्राय सोमवारी जिल्हाधिकार्‍यांना दिला. त्यामुळे येत्या दोन दिवसांत पंढरपूर वारी संदर्भात लेखी आदेश निर्गमित करू, असे शंभकर यांनी स्पष्ट केले. यामध्ये शंभरकर काय नियम व अटी घालणार याकडे समस्त वारकरी सांप्रदायाचे लक्ष लागून राहिले आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news