नवी दिल्ली : कढी किंवा अन्यही अनेक पदार्थांमध्ये स्वाद वाढवण्यासाठी कसुरी मेथीचा वापर केला जात असतो. मेथीची पाने वाळवून अशी कसुरी मेथी बनवतात आणि तिच्यामुळे खाद्यपदार्थांचा स्वादही वाढतो. मात्र, ही कसुरी मेथीही आरोग्यासाठी लाभदायक असते. विशेषतः रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित ठेवण्यासाठी ती उपयुक्त ठरते असे तज्ज्ञांनी म्हटले आहे.
कसुरी मेथीमुळे 'इन्शुलिन रेझिस्टन्स' कमी होतो. त्यामुळे 'टाईप-2' मधुमेहाच्या रुग्णांना लाभ होतो. कसुरी मेथीचे सेवन महिलांसाठीही गुणकारी असते. 40 ते 50 वर्षे वयोगटातील महिला रजोनिवृत्तीच्या टप्प्यातून जात असतात. त्यामुळे अनियमित मासिक पाळी, थकवा व अन्य काही समस्या निर्माण होतात. कसुरी मेथीच्या सेवनाने अशा लक्षणांनाही नियंत्रित करण्यास मदत मिळते. कसुरी मेथीमध्ये लोह, कॅल्शियम आणि अनेक जीवनसत्त्वे असतात.
त्यामुळे हाडेही मजबूत राहतात तसेच रक्तातील हिमोग्लोबिनचा स्तरही चांगला राहतो. केस आणि त्वचेसाठीही कसुरी मेथी गुणकारी आहे. पचनसंस्थेसाठीही तिचा उपयोग होतो. तसेच स्तनपान करणार्या मातांसाठीही ही मेथी गुणकारी ठरते.