कर्नाटकात धर्मांतरबंदी उठणारच; मंत्रिमंडळाचा निर्णय

कर्नाटकात धर्मांतरबंदी उठणारच; मंत्रिमंडळाचा निर्णय

बंगळूर; पुढारी वृत्तसेवा :  भाजप सरकारच्या काळात लागू करण्यात आलेला धर्मांतरबंदी कायदा रद्द करण्याचा निर्णय गुरुवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. त्याचबरोबर नवा एपीएमसी कायदाही रद्द करून, जुनाच एपीएमसी कायदा पुन्हा लागू करण्याचा निर्णयही मंत्रिमंडळाने घेतला आहे. त्याचबरोबर शालेय पाठ्यपुस्तकातून स्वातंत्र्यवीर सावरकर आणि रा. स्व. संघाचे पहिले संचालक हेडगेवार यांच्यावरील धडे वगळण्यात येणार आहेत. त्या ठिकाणी डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि सावित्रीबाई फुले यांच्यावरील कविता समाविष्ट केल्या जाणार आहेत.

भाजपने केलेल्या कायद्यानुसार धर्मांतरावर बंदी होती, तरीही धर्मांतर करायचे झाल्यास जिल्हाधिकार्‍यांची परवानगी आणि धर्मांतर करू इच्छिणार्‍यांची यादी जिल्हाधिकारी तसेच माहिती खात्याच्या कार्यालयात फलकांवर किमान एक महिना आधी लावणे अनिवार्य करण्यात आले होते. आता हा कायदाच रद्द करण्यात येणार आहे.

मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना कायदामंत्री एच. के. पाटील यांनी गुरुवारी झालेल्या निर्णयांची माहिती दिली. ते म्हणाले, 3 जुलैपासून सुरू होणार्‍या अर्थसंकल्पीय अधिवेशनात धर्मांतरविरोधी कायदा आणि एपीएमसी कायदा रद्द करण्याची प्रक्रिया पूर्ण केली जाईल. कर्नाटक धार्मिक स्वातंत्र्य अधिकार संरक्षण विधेयक-23 ला मंत्रिमंडळांने मंजुरी दिली आहे. 2020-21 मध्ये कायद्यामध्ये करण्यात आलेली सुधारणा रद्द करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. निवडणूक काळात काँग्रेसने धर्मांतरविरोधी कायदा रद्द करण्याचे आश्वासन मतदारांना दिले होते. आता भाजपसह अनेक उजव्या संघटनांनी धर्मांतरबंदी कायदा रद्द करण्यास आक्षेप घेतला आहे. त्यामुळे आगामी काळात राज्यात पुन्हा वादंग उठण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

आक्षेप काय?

लव्ह जिहादच्या माध्यमातून हिंदू युवतींना फूस लावून प्रेमाच्या जाळ्यात ओढले जाते. त्यानंतर त्यांच्याशी विवाह करण्यापूर्वी त्यांना मुस्लिम धर्म स्वीकारण्यास भाग पाडले जाते, अशी हिंदुत्त्ववादी संघटनाची तक्रार होती. त्याला आळा घालण्यासाठी धर्मांतरबंदी कायदा आणण्यात आला होता. त्यानुसार जिल्हाधिकार्‍यांच्या पूर्वपरवानगीशिवाय धर्मांतर करता येत नाही. धर्मांतर करण्यापूर्वी एक महिना आधी जिल्हाधिकार्‍यांची परवानगी घ्यावी लागते. अशा व्यक्तीचे नाव जिल्हाधिकाऱी कार्यालयाच्या माहिती फलकावर लावले जाते, जेणेकरून ही माहिती लोकांनाही कळावी. हा कायदा आता रद्द होणार आहे. त्यानुसार धर्मांतरासाठी सरकारी अधिकार्‍याची परवानगी लागणार नाही. कुणीही स्वतःला वाटेल तेव्हा आता धर्मांतर करु शकणार आहे.

सावरकर, हेडगेवारना वगळणार; सावित्रीबाई, आंबेडकरांना स्थान

स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर आणि रा. स्व. संघाचे पहिले प्रमुख केशव बळिराम हेडगेवार यांच्यावरील धडे पाठ्यपुस्तकातून वगळण्याचा निर्णय मंत्रिमंडळाने घेतला आहे. डॉ. आंबेडकर आणि सावित्रीबाई फुले यांच्यावरील धडे पाठ्यपुस्तकात समाविष्ट करण्यात येणार आहेत.

शालेय शिक्षण मंत्री मधु बंगारप्पा म्हणाले, सहावी ते दहावीपर्यंतच्या पाठ्यपुस्तकात गत भाजप सरकारने केलेले बदल आम्ही काढून टाकणार आहोत. त्यानुसार सावरकर, हेडगेवार, सुलीबेले चक्रवर्ती (रा. स्व. संघ नेता) यांच्यावरील धडे काढून टाकले जातील. तर डॉ. आंबेडकर आणि सावित्रीबाईंवरील कवितांना पाठ्यपुस्तकात स्थान दिले जाईल. जाहीरनाम्यातच आम्ही पाठ्यपुस्तकांत बदल करण्याची हमी दिली होती. मात्र वेळेपूर्वी ते बदल करणे शक्य झाले नाही. आता पाठ्यपुस्तकांचे वितरण झालेले आहे. मात्र त्या पुस्तकांतील कोणते धडे शिकवायचे आणि कोणते गाळायचे ही यादी लवकरच शिक्षकांपर्यंत पोचवली जाईल. तसेच पुरवणी अभ्यासक्रमात नवे धडे समाविष्ट केले जातील. त्यासाठी राजप्पा दळवाई, प्रा. चंद्रशेखर, राजेश आणि अश्वत्थ नारायण यांची समिती स्थापण्यात आली आहे, अशी माहितीही मंत्री बंगारप्पा यांनी दिली. या समितीने 45 बदल सूचविले होते. त्यानुसार पंडित नेहरू यांच्यावरील धड्यांचा समावेश करण्यात येणार आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news