कर्नाटक अर्थसंकल्पावेळी विधानसभेत घुसला तोतया आमदार, 15 मिनिटे बसून!

कर्नाटक अर्थसंकल्पावेळी विधानसभेत घुसला तोतया आमदार, 15 मिनिटे बसून!

बंगळूर; पुढारी वृत्तसेवा :  मुख्यमंत्री सिद्धरामय्या अर्थसंकल्प मांडत असतानाच एक तोतया आमदार विधानसभेत घुसला! दुपारी 12 वाजता अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या शुक्रवारच्या कामकाजाला सुरवात झाली. मात्र त्यावेळी आमदारांची उपस्थितीत कमी होती. त्याचवेळी आमदारांसारखी वेशभूषा केलेली एक व्यक्ती विधानसभेत घुसली आणि थेट आमदारांच्या आसनावर जाऊन बसली. आपण चित्रदुर्ग जिल्ह्यातील मोळकाल्मूरुचे आमदार एन. वाय. गोपालकृष्ण आहोत, असे त्या व्यक्तीने सांगितले. सुमारे 15 मिनिटे तो विधानसभेत आमदारांच्या आसनावर बसून होता.

तथापि, आमदार गोपालकृष्ण यांचे वय 88 आहे. तर या तोतयाचे वय सुमारे 60. त्यामुळे गुरुमिटकलचे आमदार शरणगौडा यांना संशय आला. त्यांनी आपल्या आजुबाजूच्या आमदारांना त्या व्यक्तीला तुम्ही ओळखता का, असे विचारले. पण तेही त्या व्यक्तीला ओळखत नव्हते. त्यानंतर लगेच गौडा यांनी हा प्रकार सभापती यू. टी. खादर यांच्या लक्षात आणून दिला. खादर यांनी सुरक्षा कर्मचार्‍यांना पाचारण केले. ते पाहताच ती व्यक्ती सभागृहातून निसटली. पण विधानसौध पोलिसांनी त्याला सभागृहाबाहेर पकडले.

तथापि, इतकी सुरक्षा व्यवस्था असताना एक तोतयात आमदार सभागृहात पोचलाच कसा, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. प्रत्येक आमदाराला सभागृहात शिरताना सभागृहाबाहेर असलेल्या हजेरी पुस्तकात सही करावी लागते, तसेच मोबाईल, लॅपटॉपसारख्या इलेक्ट्रॉनिक वस्तूही बाहेरच सुरक्षा कर्मचार्‍यांकडे जमा कराव्या लागतात. असे असतानाही त्याला कुणीच कसे हटकले नाही, असाही प्रश्न उपस्थित होत असून, ही सुरक्षा व्यवस्थेतील त्रुटी मानली जात आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news