कपिलदेव म्हणाले, अश्विनला वगळता तर विराटला का नाही?

कपिलदेव म्हणाले, अश्विनला वगळता तर विराटला का नाही?

Published on

नवी दिल्ली : वृत्तसंस्था : भारताचे माजी कर्णधार कपिलदेव यांनी विराट कोहलीला संघातून वगळण्याबाबत एक मोठे विधान केले आहे. त्यांनी कसोटीत जवळपास 450 विकेटस् घेणार्‍या रविचंद्रन अश्विनला कसोटी संघातून वगळले जाऊ शकते तर मग विराट कोहलीला टी-20 संघातून का वगळले जाऊ नये, असे विधान केले. कपिलदेव यांच्या मते भारताची प्लेईंग इलेव्हन ही आधीच्या पुण्याईवर नाही तर सध्याच्या फॉर्मवर निवडली गेली पाहिजे.

विराट कोहली सध्या मोठ्या बॅडपॅचमधून जात आहे. दुसरीकडे अनेक युवा फलंदाज टी-20 क्रिकेटमध्ये दमदार कामगिरी करत संघातील आपली दावेदारी प्रबळ करत आहेत. त्यामुळे विराट कोहलीवर टी-20 संघातून गच्छंतीची टांगती तलवार आहे. याबाबतच भारताला पहिला वर्ल्डकप जिंकून देणारे माजी कर्णधार कपिलदेव यांनी आपले मत रोखठोकपणे मांडले.

कपिलदेव म्हणाले की, 'हो आता अशी परिस्थिती निर्माण झाली आहे की तुम्हाला विराट कोहलीला सक्तीने टी-20 संघातून बाहेर बसवावे लागेल. जर जागतिक क्रमवारीतील दुसर्‍या क्रमांकाच्या अश्विनला कसोटी संघातून वगळले जाऊ शकते, मग कधी काळी जागतिक क्रमवारीत पहिल्या क्रमांकावर असणार्‍या फलंदाजालाही वगळण्यात आले पाहिजे. कपिलदेव यांनी हे वक्तव्य एका वृत्तवाहिनीवर केले.

विराटऐवजी एखाद्या युवा फलंदाजाला संधी देण्याबाबत कपिलदेव म्हणाले की, 'विराट कोहलीकडून ज्या प्रकारे फलंदाजी करण्याची अपेक्षा केली जाते त्याप्रमाणे तो फलंदाजी करत नाही. त्याचे नाव हे त्याच्या कामगिरीमुळे झाले होते. मात्र, आता तो त्याच्या लौकिकास साजेशी कामगिरी करत नाही. त्यामुळे तुम्ही चांगली कामगिरी करत असणार्‍या युवा खेळाडूला विराटमुळे बाहेर बसवू शकत नाही.'

'तुमच्याकडे पर्याय उपलब्ध असताना तुम्ही फॉर्ममध्ये असणार्‍या खेळाडूंना संघात खेळवले पाहिजे. तुम्ही पूर्व पुण्याईवर निवड करू शकत नाही. तुम्ही सध्याचा फॉर्मदेखील पाहिला पाहिजे. तुम्ही प्रस्थापित खेळाडू असला तरी तुम्ही सलग पाच सामन्यांत फेल गेला तरी तुम्हाला संधी मिळत राहील, असे होत नाही.'

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news