कडुनिंबाच्या सालीपासून बनणार कोरोनावरील औषध

कडुनिंबाच्या सालीपासून बनणार कोरोनावरील औषध

वॉशिंग्टन ः भारतात प्राचीन काळापासूनच कडुनिंबाचा एक औषधी वनस्पती म्हणून विविध कारणांसाठी वापर केला जात असतो. कडुनिंबाची पाने रोेगजंतूंना दूर ठेवण्यासाठी उपयुक्त असतातच आणि कडुनिंबाच्या काड्यांचा तर आजही खेड्यापाड्यांत दात स्वच्छ करण्यासाठी वापर केला जातो. आता अमेरिका आणि भारतातील संशोधकांनी कडुनिंबाच्या झाडाची सालही उपयोगात आणली आहे. या सालीचा वापर कोरोनावरील औषध बनविण्यासाठी केला जाणार आहे. युनिव्हर्सिटी ऑफ कोलोरॅडो एनशुट्ज मेडिकल कॅम्पस आणि इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स एज्युकेशन अँड रिसर्च कोलकाताच्या वैज्ञानिकांनी त्याची पुष्टी केली आहे.

याबाबतच्या संशोधनाची माहिती 'व्हायरॉलॉजी' या नियतकालिकात प्रसिद्ध करण्यात आली आहे. त्यामध्ये म्हटले आहे की, कडुनिंबाच्या सालीमध्ये असे अँटीव्हायरल (विषाणुरोधक) गुण असतात, जे कोरोना विषाणूच्या मूळ रूपाला तसेच नव्या व्हेरिएंट्सनाही लक्ष्य बनवू शकतात. विशेष म्हणजे कडुनिंबाच्या सालीचा यापूर्वीही मलेरिया, पोटातील अल्सर, त्वचाविकार यांवरील उपचारासाठी वापर केला गेला आहे. वैज्ञानिकांनी कोरोनाच्या बाबतीत कडुनिंबाच्या सालीचा कसा परिणाम होतो, याबाबतचे संशोधन केले.

भारतात याबाबत प्राण्यांवर प्रयोग करण्यात आले. कॉम्प्युटर मॉडेलिंगच्या माध्यमातून हे दिसून आले की, कडुनिंबाच्या सालीचा रस विषाणूच्या स्पाईक प्रोटीनला चिकटून राहण्यास सक्षम आहे. त्यामुळे कोरोना विषाणू मानवी शरीराच्या पेशींना संक्रमित करू शकत नाही. या रसाचा चांगला परिणाम कोरोना संक्रमित मानवी फुफ्फुसांवरही पाहायला मिळाला. कडुनिंबामुळे हा विषाणू आपली संख्या वाढवू शकत नाही आणि संक्रमण कमी होते. संशोधिका मारिया नेगल यांनी सांगितले की, कडुनिंबावर आधारित कोरोनावरील प्रभावी औषध बनविण्यासाठी हे संशोधन करण्यात आले.

कोरोनाचे नवे व्हेरिएंट आल्यावर दरवेळी नवे उपचार विकसित करण्याची गरज यामुळे राहणार नाही. घसा खराब झाला की, जसे पेनिसिलिनची गोळी खाल्ली जाते, तसेच कोरोना झाल्यावर कडुनिंबापासून बनवलेले हे औषधच वापरता येईल. यामुळे गंभीर संक्रमण आणि हॉस्पिटलमध्ये दाखल होण्याचा धोका कमी होईल आणि कोरोना हा एक सामान्य आजार बनून जाईल.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news