कंगना राणावत इन्स्टाग्राम पोस्टप्रकरणी पुन्हा हायकोर्टात

कंगना राणावत इन्स्टाग्राम पोस्टप्रकरणी पुन्हा हायकोर्टात
Published on
Updated on

मुंबई ; पुढारी वृत्तसेवा : सोशल मीडियावर शीख समुदायाची खलिस्तान्यांशी तुलना केल्याप्रकरणी नोंदविण्यात आलेला गुन्हा रद्द करावा, या मागणीसाठी अभिनेत्री कंगना राणावत ने पुन्हा एकदा उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. या याचिकेवर पुढील आठवड्यात सुनावणी होण्याची शक्यता आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीन कृषी कायदे मागे घेतल्यानंतर 21 नोव्हेंबर रोजी कंगनाने इन्स्टाग्रामवर शीख समुदायाबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केले होते. तिच्या या वक्तव्यामुळे शीख समाजातील लोकांमध्ये प्रचंड नाराजी व्यक्त झाली होती.

मुंबई आणि दिल्लीतील विविध गुरुद्वारांच्या समित्यांचे सदस्य असलेले अ‍ॅड. अमरजितसिंग कुलवंतसिंग संधू, मनजिंदर सिंग सिरसा आणि जसपाल सिंग सिद्धू यांनी दाखल केलेल्या तक्रारीच्या आधारे खार पोलीस ठाण्यात कंगनाच्या विरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. कंगनाने जाणूनबुजून आणि द्वेषयुक्त पद्धतीने तसेच धार्मिक भावना भडकावण्याच्या हेतूने हे वक्‍तव्य केल्याचा आरोप करण्यात आला आहे.

त्यानंतर भारतीय दंड संहितेच्या कलम 295 अ अंतर्गत मुंबई पोलिसांनी कंगना राणावत विरोधात गुन्हा दाखल केला. तो गुन्हा रद्द करण्याची मागणी करत कंगनाने अ‍ॅड. रिझवान सिद्धिकीमार्फत उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.कलम 295अ अंतर्गत किंवा अन्य कोणत्याही कलमांतर्गत आपल्या विरोधात खटला चालवता येणार नाही.

मी केलेली पोस्ट ही कृषी कायदे रद्द केल्यानंतर बंदी घालण्यात आलेल्या एका संघटनेच्या विरोधात होती. भारतीय राज्यघटनेच्या कलम 19(1)(अ) अन्वये ते भाषण स्वातंत्र्याच्या मूलभूत अधिकारात मोडते. त्यामुळे आपल्या विरोधात नोंदविण्यात आलेला गुन्हा चुकीचा असल्याचा दावा करत तो रद्द करावा, अशी मागणी कंगनाने केली आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news