एसटीच्या स्वच्छता मोहिमेत मुख्यमंत्र्यांचाच जिल्हा नापास; ठाण्यात बसस्थानके अस्वच्छ

एसटीच्या स्वच्छता मोहिमेत मुख्यमंत्र्यांचाच जिल्हा नापास; ठाण्यात बसस्थानके अस्वच्छ

मुंबई : पुढारी वृत्तसेवा : राज्यात विदर्भातील सर्व जिल्ह्यांमध्ये एसटीचे स्वच्छता अभियान प्रगतीपथावर असून पश्चिम महाराष्ट्रातील सातारा आणि कोल्हापूर जिल्हे चांगली कामगिरी करुन स्पर्धेत अव्वल स्थानावर आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाणे जिल्ह्यातील 13 बसस्थानकापैकी 8 बसस्थानके सर्वेक्षणात 50 पेक्षा कमी गुण मिळवून नापास झाले आहेत.

संबंधित बातम्या 

खोपट बसस्थानकाला मुख्यमंत्र्यांनी खडे बोलून सुनावले होते, ते बसस्थानक 100 पैकी 59 गुण मिळवून मध्यम दर्जा मिळवून कसेबसे पास झाले आहे. मुंबईतील 6 बसस्थानकांनी प्रगती साधली असून, परळ बस स्थानकाने 65 गुण मिळवून मुंबईमध्ये अव्वल स्थान पटकावले आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 1 मे रोजी एसटी स्थानकांबाबतच्या मोहिमेची घोषणा केली. दर दोन महिन्यांनी स्थानकांचे सर्वेक्षण पूर्ण केल्यानंतर त्याचा अहवाल जाहीर करण्यात येणार आहे. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ, सुंदर बस स्थानक अभियानांतर्गत राज्यातील 563 एसटी स्थानकांतील तिसर्‍या टप्प्याचे सर्वेक्षण पूर्ण झाले आहे. ऑक्टोबर ते डिसेंबर 2023 महिन्याचा तिसरा सर्वेक्षण अहवाल पूर्ण झाला आहे. त्यामध्ये राज्यातील एसटीचे डेपो, बसस्थानकांना स्वच्छतेनुसार गुण देण्यात आले आहेत. तिसर्‍या टप्प्यांतर्गत राज्यातील 191 बस स्थानके ही 50 पेक्षा कमी गुण मिळवून असमाधानकारक स्वच्छतेमध्ये समाविष्ट झाली असून 317 बस स्थानके ही 50 ते 70 आणि 55 बसस्थानके 70 पेक्षा जास्त गुण मिळवून स्वच्छता राखण्यामध्ये यशस्वी झाली आहेत.

राज्यातील 31 विभागापैकी मराठवाड्यातील जालना, विदर्भातील भंडारा, चंद्रपूर, नागपूर, अमरावती व पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर, सांगली, सातारा या विभागात सर्वच्या सर्व बसस्थानके ही चांगले गुण प्राप्त करून स्वच्छतेच्या मार्गावर प्रगतीपथावर आहेत.
कोकण विभागातील 87 पैकी 42 बस स्थानके असमाधानकारक स्वच्छता गटात समाविष्ट असून मराठवाड्यातील 117 पैकी 51 बस स्थानके असमाधानकारक स्वच्छतेमध्ये गणली गेली आहेत.

अभियानांतर्गत बसस्थानक स्वच्छता व सुशोभीकरणला 35, प्रसाधनगृह स्वच्छतेला 15, बसच्या स्वच्छतेला 25 व प्रवासी सोयीसुविधांना 25 गुण असे 100 गुण निर्धारित केले आहेत. एकूण गुणांपैकी 50 पेक्षा जास्त गुण प्राप्त करणारी बस स्थानके ही चांगल्या दर्जाची अथवा स्वच्छता अभियानामध्ये प्रगतिशील बसस्थानक म्हणून ओळखली जातात. तर 50 पेक्षा कमी गुण मिळालेल्या बस स्थानकांची स्वच्छता ही असमाधानकारक असल्याचे शेरे समितीने ओढले आहेत.

पहिल्या टप्यात राज्यातील 291 बसस्थानकांचा स्वच्छतेचा दर्जा वाईट
दुसर्‍या टप्यात राज्यातील 212 बसस्थानकांमध्ये असमाधानकारक स्वच्छता
तिसर्‍या टप्यात राज्यातील 191 बसस्थानके अस्वच्छ

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news