एसटी ची ७५ टक्के वाहतूक बंद

एसटी ची ७५ टक्के वाहतूक बंद
Published on
Updated on

कोल्हापूर ; पुढारी वृत्तसेवा : एसटी कर्मचार्‍यांनी पुकारलेल्या काम बंद आंदोलनामुळे सोमवारी जिल्ह्यातील एसटीची 75 टक्के प्रवासी वाहतूक बंद राहिली. नऊ आगारांतील सर्व कर्मचारी या आंदोलनात सहभागी झाले होते; तर गारगोटी, गडहिंग्लज आणि कागल या तीन आगारांतील कर्मचार्‍यांनी वाहतूक सुरू ठेवली होती.

बंदमुळे दिवसातील 1450 फेर्‍या रद्द झाल्या व एसटीचे सुमारे 40 लाखांचे उत्पन्न बुडाले. बंदमुळे दिवाळीनंतर परतीच्या मार्गावर असलेल्या प्रवाशांचे प्रचंड हाल झाले. दरम्यान, एसटी बंदची संधी साधत खासगी बसेस, वडापच्या टॅक्सी व रिक्षा यांनी दामदुप्पट, तिप्पट दराची आकारणी करत प्रवाशांची लूट केली.

एसटी कर्मचारी संघटना कृती समितीच्या वतीने विविध मागण्यांसाठी 27 ऑक्टोबर रोजी राज्यव्यापी उपोषण आंदोलन करण्यात आले. त्याला सर्व कामगारांनी 28 रोजी पाठिंबा दिला होता. त्यामुळे त्या दिवशी एसटीची प्रवासी वाहतूक ठप्प झाली होती. पण यादिवशी शासनाबरोबर झालेल्या चर्चेतून हा संप मागे घेण्यात आला होता.

पण कृती समितीच्या मागणीत एसटीचे शासनामध्ये विलीनीकरणाच्या मुद्द्यावर चर्चा झाली नाही. यामुळे कनिष्ठ वेतनश्रेणी एसटी कर्मचारी संघटनेसह काही कर्मचारी संघटनांनी पुन्हा काम बंद आंदोलन सुरू केले. या आंदोलनामुळे जिल्ह्यात 29 ऑक्टोबर ते 2 नोव्हेंबर या कालावधीत सहा आगारांतील प्रवासी वाहतूक बंद होती; तर राज्यातील 59 आगारांतील प्रवासी वाहतूक अद्यापही बंदच आहे.

दिवाळीसाठी कुटुंबीयांसह गावी आलेल्या नागरिकांना परतताना एसटी बंदचा मोठा फटका बसला. खासगी प्रवासी वाहतूक करणार्‍या वाहनचालकांकडून प्रवासासाठी दुप्पट, तिप्पट दराची आकारणी केली जात होती.

सध्या पुण्याला एसटीच्या बसेसचा 330 ते 495 असा तिकीट दर आहे. पण खासगी बस चालकांकडून 800 ते 1500 रुपये असा दर आकारला जात होता. इचलकरंजीला सध्या 45 रुपये एसटीचा दर आहे. येथे खासगी ट्रॅक्स चालकांच्याकडून थेट 100 रुपयांची आकारणी केली होती.

विमानापेक्षा खासगी बसेसचे जादा दर

सांगलीला एसटीच्या तिकिटाचा दर 70 रुपये आहे. येथे 150 ते 200 रुपये प्रवाशांकडून घेतले जात होते. मुंबईला जाण्यासाठी 2000 ते 2500 याप्रमाणे दर आकारणी केली जात होती. अशा प्रकारे अन्य जिल्ह्यात जाण्यासाठी आलेल्या प्रवाशांकडून खासगी बसेस चालकांच्याकडून अक्षरश: लूट केली जात होती. यामुळे नागरिकांच्या चेहर्‍यावर चिंतेचे सावट उमटलेले दिसत होते.

मध्यवर्ती बसस्थानकाच्या आवारात कर्मचार्‍यांचा ठिय्या

मध्यवर्ती बसस्थानक परिसरात सकाळी सात वाजल्यापासून एसटी कर्मचारी एकत्र आले. कामावर न जाता गेटसमोर ठिय्या मांडला. यावेळी 'एसटी कामगार एकजुटीचा विजय असो', 'एसटी कर्मचार्‍यांच्या मागण्या मान्य करा' यांसह अन्य घोषणा देण्यात येत होत्या. या आंदोलनात एसटीच्या सर्व संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते सहभागी झाले होते.

वडापवाल्यांचा बुलाव डाव

एसटीची प्रवासी वाहतूक बंद असल्यामुळे काही ट्रॅक्स चालक एस.टी.च्या गेटसमोर गाडी लावून प्रवासी भरून घेऊन जात होते; तर खासगी बसेसना मध्यवर्ती बसस्थानकाच्या आवारात उभे करण्याची परवानगी नसतानाही तेथे बसेस लागून बुलाव डाव या पद्धतीने प्रवाशांना घेतले जातात हे एसटीच्या अधिकार्‍यांना पाहावे लागत होते.

40 लाखांचे नुकसान

एसटीच्या कोल्हापूर विभागात सर्व आगारांत मिळून 650 बसेस आहेत. त्यातील 50 बसेस आगारात दुरुस्तीसाठी असतात; तर 600 बसेस या मार्गावर असतात. 12 आगारांतून दररोज सुमारे 2200 फेर्‍या होतात. यातून 60 ते 65 लाख उत्पन्न मिळते. पण सोमवारी 9 आकारांतील सर्व फेर्‍या पूर्णपणे बंद होत्या. त्यामुळे एसटीचे 40 लाखांचे नुकसान झाले आहे.

संपातील कर्मचारी कर्तव्यावर, पाठिंबा देणारे रस्त्यावर

विलीनीकरणाच्या मागणीवरून गेल्या आठवड्यात कोल्हापूर जिल्ह्यातील ज्या सहा आगारांतील एसटी कर्मचारी काम बंद आंदोलनात सहभागी झाले होते, त्यातील तीन आगारांतील कर्मचारी सोमवारी कर्तव्यावर होते; तर या कर्मचार्‍यांना पाठिंबा देण्यासाठी ज्यांनी काम बंद आंदोलन केले, ते कर्मचारी मात्र रस्त्यावर होते, असे चित्र होते.

जयसिंगपुरात प्रवाशांना फटका

जयसिंगपूर येथील बसस्थानकात दररोज 1600 बसेसची ये-जा असते. सोमवारी अनेक प्रवाशांना खासगी वाहनाने प्रवास करावा लागला. तर काहींनी एसटी बंद असल्याने घरात राहणे पसंत केले. कुरुंदवाड आगाराच्या, त्याचबरोबर इचलकरंजी, कोल्हापूर, सांगली, मिरज आगाराच्या अनेक बसेस जयसिंगपूर बसस्थानकातून धावतात. सर्व आगारांत कर्मचार्‍यांनी संप केल्याने प्रवाशांना मोठा फटका बसला. सांगली, मिरज, कुरुंदवाड, कोल्हापूर व इचलकरंजीकडे जाणार्‍या प्रवाशांनी खासगी वाहनाने प्रवास केला.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news