एलन मस्क यांच्या स्पेसएक्सने रचला इतिहास

एलन मस्क यांच्या स्पेसएक्सने रचला इतिहास
Published on
Updated on

वॉशिंग्टन ; वृत्तसंस्था : अमेरिकन उद्योजक एलन मस्क यांच्या एअरोस्पेस कंपनी स्पेसएक्सने बुधवारी रात्री इतिहास रचला. अंतराळ पर्यटनाच्या द़ृष्टीने यशस्वी पाऊल टाकत चार सर्वसामान्य लोकांना अंतराळात पाठवले. या माध्यमातून अंतराळ पर्यटनाचे नवे पर्व सुरू झाले आहे.

'नासा'च्या फ्लोरिडातील केनेडी स्पेस रिसर्च सेंटरवरून या चौघांना घेऊन 'फॉल्कन-9' रॉकेटने भारतीय वेळेनुसार, पहाटे 5.33 वाजता उड्डाण केले. 12 व्या मिनिटानंतर 'ड्रॅगन स्पेसक्राफ्ट' रॉकेटपासून विलग झाले. ते पृथ्वीच्या कक्षेत 575 किलोमीटरवर तीन दिवस फेर्‍या मारेल. 'इन्स्पिरेशन 4' असे या मोहिमेचे नाव आहे.

अंतराळ पर्यटनाचे कुतूहल, उत्सुकता आणि आवड असणार्‍यांच्या द़ृष्टीने ही घटना अत्यंत महत्त्वाची ठरली आहे. विविध देशांच्या सरकारांच्या अवकाश मोहिमांच्या माध्यमातून अंतराळात संशोधनासाठी अंतराळवीरांना पाठवण्यात येते. मात्र, आता या मोहिमेमुळे सामान्यांसाठीही अंतराळ पर्यटनाचे नवे युग सुरू होईल, असे मानले जात आहे.

या मोहिमेच्या माध्यमातून जवळपास साडेअकरा वर्षांनंतर माणूस पहिल्यांदाच इतक्या उंचीवर गेला आहे. 2009 मध्ये शास्त्रज्ञांनी 541 कि.मी. उंचीवर जाऊन 'हबल टेलिस्कोप'ची दुरुस्ती केली होती.

बुधवारी पाठवण्यात आलेल्या 'ड्रॅगन स्पेसक्राफ्ट'ची आसन क्षमता सात आहे. माणूस अंतराळात पाठवणारे हे पहिले खासगी स्पेसक्राफ्ट आहे. ते 'फॉल्कन-9' रॉकेटवरून लाँच करण्यात आले.

या मोहिमेसाठी किती खर्च आला, याबाबत अद्याप काहीही खुलासा करण्यात आलेला नाही. तथापि, इसाकमॅन यांनी त्यासाठी भरघोस रक्कम दिली आहे. मोहीम फत्ते झाल्यानंतर इसाकमॅन हे किती खर्च झाला ते जाहीर करतील, असे म्हटले जात आहे.

यावर्षी झालेले अंतराळ प्रवास

* 11 जुलै : रिचर्ड ब्रॅन्सन यांनी पाचजणांसह अंतराळ प्रवास केला.
* 20 जुलै : जेफ बेझोस यांनी तिघांना घेऊन केला अंतराळ प्रवास.
* 15 सप्टेंबर : स्पेसएक्सने चौघा सर्वसामान्यांसह भरले उड्डाण.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news