एलटीटीई पुन्हा सक्रिय करण्याचा पाकचा कट

एलटीटीई पुन्हा सक्रिय करण्याचा पाकचा कट

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : पाकिस्तानची गुप्तहेर संघटना आयएसआय तमिळनाडूमध्ये तमिळ लिबरेशन ऑफ टायगर्स (एलटीटीई) या दहशतवादी संघटनेला पुन्हा सक्रिय करण्याच्या प्रयत्नात असल्याची खळबळजनक माहिती समोर आली आहे. पाकिस्तानातून नियंत्रित केला जाणारा एक गट भारत आणि श्रीलंकेत एलटीटीईला मोठ्या प्रमाणात ड्रग्ज आणि शस्त्रांचा पुरवठा करत आहे.

हा प्रकार निदर्शनास आल्यानंतर राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) काही दिवसांपूर्वी छापे टाकून 9 जणांना ड्रग्ज व शस्त्रांसह अटक केली होती. गुणशेखरन आणि पुष्पराज हे दोघे श्रीलंकेतील एका ड्रग्ज माफियाला नियंत्रित करतात. हे दोघेही हाजी सलीम या पाकिस्तानी ड्रग्ज व शस्त्र पुरवठादाराच्या संपर्कात असल्याची माहिती एनआयएने दिली.

गुणशेखरन आणि पुष्पराज यांसह मोहम्मद असमीन, अलहा पेरुमागा, फोंसिया कोट्टागामिनी ऊर्फ सुनील गामिनी ऊर्फ नीलकंदन, स्टॅन्ले केनेडी फर्नांडो, लादिया चंद्रसेना, धानुका रोशन, वेल्ला सुरंका ऊर्फ गमागे सुरंगा प्रदीप ऊर्फ सुरंग ऊर्फ थिलिपन ऊर्फ दिलीपन अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. तामिळनाडूत एलटीटीईला सक्रिय करण्याच्या पाकिस्तानच्या कारस्थानावर एनआयए खूप आधीपासून नजर ठेवून आहे.

एनजीओच्या संपर्कात होते

फेब्रुवारीत एलटीटीईला तामिळ राष्ट्रवादाशी जोडून जिवंत करण्याचा प्रयत्न करण्यात आला. पण हा कटही एनआयएने उधळून लावत अनेकांना अटक केली. तपासात हे युरोपस्थित काही ऑपरेटिव्हच्या संपर्कात असल्याचे समोर आले. एलटीटीईला आर्थिक रसद पुरविण्याचा त्यांचा प्रयत्न होता. त्यांच्यामार्फतच तमिळ राष्ट्रवादाचा आधार घेत तामिळनाडूच्या ग्रामीण भागातील लोकांना भुलविण्याचा आयएसआय प्रयत्न होता. हे सर्वजण काही एनजीओच्या संपर्कात होते.

चेन्नई विमानतळावर मेरी फ्रान्सिस्का नामक एका श्रीलंकन नागरिकाला अटक केल्यानंतर याचा खुलासा झाला. आरोपींनी मुंबईतील एका बँकेच्या शाखेतून पैसे काढले होते. हे पैसे एलटीटीईवर खर्च होणार असल्याचेही वृत्तात नमूद आहे.

भारतात घातपाताचा कट

'द आयलंड ऑनलाईन'ने दिलेल्या वृत्तानुसार, हे मॉड्युल भारत आणि श्रीलंकेत कार्यरत असून एलटीटीईला सक्रिय करण्यासाठी आवश्यक निधी गोळा करण्यासाठी ड्रग्ज आणि शस्त्रांची तस्करी करते. भारतात, विशेषतः दक्षिण भागात दहशतवादी कारवाया घडविणे हे काही नवीन नाही. 2014 मध्ये एनआयएने एका मॉड्युलचा भांडाफोड केला होता. कोलंबोतील पाकिस्तानी उच्चायुक्तालयाकडून हे मॉड्युल नियंत्रित केले जात होते. यामार्फत भारतात विविध ठिकाणी घातपात घडवण्याचा पाकचा कट होता.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news