एचआयव्ही- एड्स : काट्याचा नायटा होण्याआधी घ्या उपचार

एचआयव्ही- एड्स : काट्याचा नायटा होण्याआधी घ्या उपचार
Published on
Updated on

एड्सचा प्रसार रोखण्यासाठी अजूनही आपल्याला प्रबोधन करावे लागते. एड्सचा प्रसार चार प्रमुख मार्गांनी होतो. पैकी सर्वात महत्त्वाचा प्रकार म्हणजे असुरक्षित लैंगिकसंबंध. दूषित रक्तसंक्रमण, दूषित सुयांचा वापर आणि एचआयव्ही बाधित गर्भवती मातेकडून अर्भकामध्ये होणारा प्रसार हे इतर तीन प्रकार होत.

1 डिसेंबर हा जागतिक एड्सविरोधी दिन म्हणून पाळला जातो. तो कालच झाला. गेली जवळपास दोन वर्षे कोरोना विषाणूने जगाला सळो की पळो करून सोडले आहे, त्यामुळे आपल्याभोवती कोरोनाशिवाय अनेक जीवाणू – विषाणू आहेत, हे आपण जणू विसरूनच गेलो आहोत. यातील अनेक जंतूंनी गेली कित्येक वर्षे आपली पाठ सोडलेली नाही. त्यापैकी एक विषाणू म्हणजे, एचआयव्ही – एड्सचा विषाणू.

तुम्हाला आश्चर्य वाटेल; पण जगभरात आज एचआयव्ही – एड्सच्या परिणामांमुळे दरवर्षी सात लाखांपर्यंत मृत्यू होतात. एवढ्या मोठ्या प्रमाणात मृत्यू होण्याचे कारण म्हणजे, अनेकांना आपल्या आजाराचे निदान माहिती नसते. तर आजही विविध कारणांसाठी अनेक जण एचआयव्ही – एड्सवर उपचार घेत नाहीत. आपल्याला काहीही त्रास होत नाही, या सबबीखाली काहीजण सुरुवातीच्या टप्प्यात उपचार घेत नाहीत आणि जेव्हा उपचार सुरू करतात, तेव्हा काट्याचा नायटा झालेला असतो.

एड्सचा पहिला रुग्ण अमेरिकेत 1981 मध्ये सापडला. म्हणजे आज चार दशके झाली; पण एड्सचे आपल्यातून समूळ उच्चाटन झालेले नाही. सुरुवातीच्या काळात एड्सवर ठोस उपचारच नव्हते; पण नंतर हळूहळू यावर औषधांचा शोध लागला आणि आज अनेक चांगली औषधे उपलब्ध झाली आहेत.

या उपचारांबाबतही सुरुवातीला वेगळे नियम होते; पण 2015 पासून जागतिक आरोग्य संघटनेच्या धोरणानुसार, एचआयव्हीची बाधा असलेल्या प्रत्येक रुग्णाला औषधोपचार देण्याचे धोरण आहे. रक्तातील CD4, CD8 पेशींचे प्रमाण तसेच व्हायरल लोड कितीही असला तरी उपचार सुरू करावेत, असा आज नियम आहे; पण अनेक रुग्णांच्या बाबतीत हे घडताना दिसत नाही. परिणामी एड्समुळे होणार्‍या मृत्यूंची संख्या वाढते.

भीती, लज्जा आणि दुर्लक्ष यामुळे ऐंशी-नव्वदच्या दशकात जगभरात एचआयव्ही-एड्सची जणू लाटच आली. भारतात एचआयव्ही-एड्सचा पहिला रुग्ण 1986 मध्ये सापडला आणि 1988 मध्ये एचआयव्हीची जागतिक साथ घोषित झाली. 1997 च्या संसर्गदराच्या तुलनेत सन 2020 मध्ये संसर्गदर जवळपास निम्म्यावर आला आहे. 1997 मध्ये दरवर्षी जवळपास 30 लाख व्यक्तींना नव्याने संसर्ग होत होता. तो आकडा 2020 मध्ये 15 लाखांपर्यंत येऊन पोहोचला आहे.

मुलांमधील एचआयव्ही संसर्ग दर देखील 3 लाख 20 हजारांपासून दीड लाखापर्यंत पोहोचला आहे. UNAIDS च्या माहितीनुसार 2020 मध्ये जगभरात जवळपास पावणे चार कोटी एड्सबाधित आहेत. भारतात (2019 नुसार) ही संख्या साडेतेवीस लाख, तर महाराष्ट्रात चार लाख इतकी आहे. जगभरात एचआयव्ही-एड्समुळे मृत्युमुखी पडणार्‍यांची संख्या पावणेसात लाख इतकी आहे, तर भारतात दरवर्षी 69 हजार व्यक्ती मृत्युमुखी पडतात. दररोज ही संख्या 190 च्या घरात जाते.

आज सर्वत्र कोव्हिडची चर्चा आहे. ओमायक्रॉन नावाचा नवा व्हेरियंट म्हणजे नवा अवतार दक्षिण आफ्रिकेत सापडला आहे. आफ्रिकेतील हा नवा व्हेरियंंट एड्सबाधित व्यक्तींवर अधिक घातक परिणाम करत असल्याचे दिसून आले आहे. कोव्हिडमुळे आरोग्य व्यवस्थेवर जे जे दुष्परिणाम झाले, त्यातील एक म्हणजे एचआयव्ही-एड्सबाधित रुग्णांना वेळेवर औषधे मिळाली नाहीत. अनेक रुग्ण कोव्हिडच्या भीतीने औषधे घ्यायला गेलेच नाहीत. एड्सबाधित रुग्णांवर कोव्हिडचे परिणाम अधिक गंभीर झाल्याचे काही अभ्यासगटांत दिसून आले आहे.

जगभरातील एचआयव्ही-एड्सबाधितांची संख्या कमी करायची असेल तर या रुग्णांनी नियमित औषधोपचार घेऊन शरीरातील विषाणूंची संख्या कमी करण्याची गरज आहे. रक्तातील विषाणूंची संख्या म्हणजे व्हायरल लोड कमी झाला तर त्या व्यक्तीकडून एचआयव्हीचा प्रसार होण्याच्या शक्यता खूप कमी होतात. त्यामुळे उपचार महत्त्वाचा ठरतो. भारताचा विचार करता, गरोदर महिलांची एचआयव्ही चाचणी करणे अधिक काटेकोर करायला हवे. कारण, एचआयव्हीबाधित गर्भवती मातेकडून अर्भकामध्ये एचआयव्ही प्रसाराची शक्यता असते.

एड्सचा प्रसार रोखण्यासाठी अजूनही आपल्याला प्रबोधन करावे लागते. एड्सचा प्रसार चार प्रमुख मार्गांनी होतो. पैकी सर्वात महत्त्वाचा प्रकार म्हणजे असुरक्षित लैंगिक संबंध. प्रत्येकाने आपले लैंगिक वर्तन जबाबदार आणि सुरक्षित ठेवले तर एड्सचा धोका टळतो. तरुणवर्गामध्ये ही काळजी अधिक महत्त्वाची ठरते. पूर्वीच्या तुलनेत आज-काल सामाजिक बंधने सैल झाल्याने लैंगिक वर्तनावरही त्याचा परिणाम झाला आहे; पण एका क्षणाची चूक ही आयुष्यभर त्रासदायक ठरू शकते. त्यामुळे वेळीच सावध होणे महत्त्वाचे. दूषित रक्तसंक्रमण, दूषित सुयांचा वापर आणि एचआयव्हीबाधित गर्भवती मातेकडून अर्भकामध्ये होणारा प्रसार हे इतर तीन प्रकार होत.

आज एचआयव्ही-एड्सवर खूप परिणामकारक औषधे उपलब्ध आहेत. एचआयव्ही-एड्स हा पूर्वीसारखा असाध्य रोग राहिला नसून, दीर्घकाळ औषधोपचार घेतल्यानंतर, किमान वीस वर्षांहून अधिक काळ चांगले आरोग्य राहण्याची शक्यता असलेला आजार मानला जातो; पण तरीही एचआयव्ही संसर्ग टाळणे हे अधिक शहाणपणाचे ठरते.

आज एड्सबाधितांकडे दूषित नजरेने पाहिले जात नाही, ही चांगली बाब आहे; पण जगातील काही देशांमध्ये अजूनही हे घडत नाही. त्यामुळे जागतिक आरोग्य संघटनेने यावर्षीचे एड्स दिनाचे घोषवाक्य 'End inequalities. End AIDS' म्हणजे 'असमानता संपवा, एड्स संपवा' असे जाहीर केले आहे. आपला देश हा निरोगी देश बनविण्यासाठी आपल्यापैकी प्रत्येकाची ही जबाबदारी आहे, एवढे यानिमित्ताने लक्षात ठेवावे.

डॉ. अनिल मडके

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news