लंडन : मनात जिद्द असेल तर माणूस कोणत्याही विपरित परिस्थितीवर मात करून चमकदार कामगिरी करू शकतो. असाच एक माणूस आहे जो आता इंग्लंडच्या केम्ब्रिज युनिव्हर्सिटीतील सर्वात तरुण कृष्णवर्णीय प्राध्यापक बनला आहे. या माणसाला वयाच्या अकराव्या वर्षांपर्यंत बोलताही येत नव्हते तसेच वयाच्या अठराव्या वर्षांपर्यंत त्याचे भाषेचे ज्ञान शून्य होते. मात्र, त्याने धैर्य सोडले नाही आणि चिकाटीने शिक्षण घेतले. आता तो वयाच्या 37 व्या वर्षी केम्ब्रिजचा प्रोफेसर बनला आहे.
या माणसाचे नाव आहे जेसन आर्दे. ते आता केम्ब्रिज युनिव्हर्सिटीत समाजशास्त्र विषयाचे प्रोफेसर बनले आहेत. मात्र, इथंपर्यंतचा त्यांचा प्रवास सोपा नव्हता. त्यासाठी त्यांना अतिशय मेहनत घ्यावी लागली. वयाच्या अकराव्या वर्षापर्यंत त्यांना सर्वसामान्य मुलांप्रमाणे बोलताही येत नव्हते. अठराव्या वर्षी बोलणे सुरू केले; पण शिक्षण सुरू झाले नव्हते.
अठराव्या वर्षापर्यंत अशिक्षित, अडाणीच राहिल्यानंतर त्यांनी नव्या उत्साहाने शिक्षण सुरू केले आणि त्यामुळे आज ते केम्ब्रिजसारख्या ऐतिहासिक व प्रतिष्ठित विद्यापीठात प्रोफेसर बनले आहेत. पुढील महिन्यात ते अध्यापनास सुरुवात करणार आहेत. त्यांनी लिव्हरपूल जॉन मूरेस विद्यापीठातून पदव्युत्तर पदवी आणि पीएच.डी. मिळवली आहे. युनिव्हर्सिटी ऑफ ग्लासगो स्कूल ऑफ एज्युकेशनमध्ये नोकरी मिळाल्यानंतर आता ते केम्ब्रिजमध्ये सर्वात कमी वयाचे अश्वेत प्रोफेसर बनले आहेत.