पुढारी ऑनलाईन : एलन मस्क यांच्या स्टारलिंकनंतर भारतातील एअरटेल ही कंपनीसुद्धा उपग्रहाच्या माध्यामातून इंटरनेट सेवा पुरवणार आहे. एअरटेलचे पाठबळ असलेली वनवेब या कंपनीने ३६ उपग्रह नुकतेच प्रक्षेपित केले आहेत. लो ऑर्बिट अर्थ सॅटेलाईट प्रकारातील एकूण ६४८ उपग्रह वनवेब प्रक्षेपित करणार असून या माध्यमातून जगभर इंटरनेटची सेवा दिली जाणार आहे.
वनवेबही ब्रिटिश कंपनी असून त्याला एअरटेल चे पाठबळ मिळालेले आहे. २०२२ च्या अखेरपर्यंत जगभरात इंटरनेट सेवा पुरवण्याचा कंपनीचा मानस आहे. उपग्रहामुळे इंटरनेट पुरवता येणार असल्याने ते अतिदुर्गम भागातही पोहोचेल. शिवाय इंटरनेटचा वेग आणि अखंडित सेवा हेही वैशिष्ट्यं असणार आहे. सरकारी कार्यालये, कॉर्पोरेट कंपन्या, जहाज कंपन्या, विमान कंपन्या अशा कंपन्यासाठी ही सेवा फारच फायद्याची ठरणार आहे.
वनवेबच्या सीईओ पदाची धुरा सुनील मित्तल यांच्याकडेच आहे. ते म्हणाले, "हे ३६ उपग्रह अवकाशात प्रक्षेपित केल्यानंतर, नियोजित ६४८ उपग्रहांतील ६० टक्के उपग्रह प्रक्षेपित असतील. कंपनीच्या स्थापनेला आता १ वर्ष पूर्ण होत आहे. हे विचारात घेता आम्ही फार मोठा पल्ला गाठलेला आहे. जागतिक पातळीवर डिजिटल क्रांती घडवण्यासाठी सुरक्षित, विश्वासार्ह आणि वेगवान इंटरनेट सेवा पुरवण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत."
वनवेबही कंपनी दिवाळीखोरीच्या मार्गावर होती. भारती एंटरप्राईज आणि ब्रिटिश सरकारच्या माध्यमातून कंपनीला आर्थिक पाठबळ देण्यात आले युटेलसॅट आणि जपानची सॉफ्ट बँक यांचीही या कंपनीत गुंतवणूक आहे.