ऋषितुल्य दादांची प्रेरणा हेच आमचे बळ : डॉ. संजय डी. पाटील

ऋषितुल्य दादांची प्रेरणा हेच आमचे बळ : डॉ. संजय डी. पाटील
Published on
Updated on

कोल्हापूर, सतीश सरीकर : आमच्यासाठी ऋषितुल्य असणार्‍या डॉ. डी. वाय. पाटील दादा यांची प्रेरणा, त्यांचे आजही होणारे मार्गदर्शन आणि त्यांनी सचोटीने शैक्षणिक, सामाजिक कार्य करण्याचा दाखवलेला मार्ग हेच मोठे बळ डी. वाय. पाटील परिवाराच्या मागे उभे असल्याची प्रांजळ भावना डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाचे कुलपती डॉ. संजय डी. पाटील यांनी शुक्रवारी व्यक्त केली.

डॉ. डी. वाय. पाटील यांचा शनिवारी (22 ऑक्टोबर) 87 वा वाढदिवस आहे. त्यानिमित्त डॉ. संजय डी. पाटील यांनी पत्रकारांशी गप्पा मारल्या. डी. वाय. पाटील यांच्या जीवनातील समाजासमोर न आलेले अनेक पैलू उघड केले. प्रचंड धाडसी व्यक्तिमत्त्व असलेले डॉ. डी. वाय. पाटील हे प्रसंगानुरूप अध्यात्माकडे वळले. आमच्यासाठी डी. वाय. दादा हे ऋषितुल्य व्यक्तिमत्त्व आहेत, असेही त्यांनी सांगितले.

डी.वाय. पाटील शिक्षण संस्थेचा पाया डॉ. डी. वाय. पाटील यांनी रचला. 180 विद्यार्थ्यांवर सुरू झालेल्या डी. वाय. पाटील शिक्षण संस्थेत सद्यस्थितीत 30 हजारांवर विद्यार्थी शिक्षणातून करिअर घडवत आहेत. देशभरात 162 कॉलेज असून 76 हजार विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. 12 हजारांवर शिक्षक, शिक्षकेतर स्टाफ आहे. संस्था चालवा किंवा बिझनेस करा, त्यासाठी 20 टक्यांच्यावर कर्ज काढू नका. तसेच कर्ज एवढेच काढा की काही अडचण आल्यास आपल्याला लगेच भागवता आले पाहिजे, ही त्यांची शिकवण आमच्या आयुष्यात मोलाची ठरत आली आहे, असेही डॉ. संजय पाटील यांनी सांगितले.

आमदार राहिलेल्या डॉ. डी. वाय. पाटील यांनी एकदम राजकारणातून शिक्षण क्षेत्रात प्रवेश करून उल्लेखनीय कामगिरी केली. देशभर डी. वाय. पाटील शिक्षण संस्थेच्या माध्यमातून जाळे उभारले. शिक्षण क्षेत्रात डी. वाय. पाटील संस्थेचा नावलौकीक निर्माण केला. त्यामागे त्यांची आर्थिक शिस्त, प्रचंड कष्ट, सकारात्मक इच्छाशक्ती कारणीभूत आहे. आजअखेर त्यांनी अनेकांना सवलतीत इंजिनिअरिंग, मेडिकल कॉलेजचे शिक्षण दिले. डी. वाय. पाटील यांनी शिक्षण क्षेत्रात पाऊल टाकले, त्यावेळी संस्थेचा 4 कोटी टर्नओव्हर होता. आता तेवढी रक्कम दरवर्षी विद्यार्थ्यांना फीमध्ये सवलत म्हणून दिली जाते.

डी. वाय. पाटील यांनी कर्ज काढून 1984 साली पहिल्यांदा कोल्हापुरात खासगी इंजिनिअरिंग कॉलेज, मेडिकल कॉलेज उभारले. त्यानंतर त्यांनी कधी मागे वळून पाहिले नाही. मोठा मुलगा म्हणून सातत्याने त्यांच्यासोबत होतो. 1989 ला माझ्यावर जबाबदारी सोपवली. त्यानंतर त्यांनी मला कधीही काय करतोस? म्हणून विचारले नाही, असेही ते म्हणाले.

…तर आयुष्यभर यश मिळवशील

डी. वाय. दादा हे एकदा जपानला गेले होते. त्यावेळी त्यांनी तेथून मला पत्र पाठवले होते. जीवनात नम्रता कायम ठेव. तरच आयुष्यात यश मिळवशील. त्यांचा हा सल्ला माझ्यासाठी यशाचा कानमंत्र ठरला आहे. डी. वाय. दादा यांच्या स्वभावाप्रमाणेच मीसुद्धा आयुष्यात माणसं जोडत गेलो आणि यश मिळत गेले. डी. वाय. दादा यांनी आयुष्यात नावाला खूप जपले. त्यामुळे डी. वाय. पाटील शिक्षण संस्थेच्या माध्यमातून त्यांचे नाव जपण्यासाठी आम्ही कुटुंबीय खूप काळजी घेतो, असेही संजय डी. पाटील म्हणाले.

कुटुंबत्सल दादा…

डी. वाय. दादा यांची सातवेळा अँजिओग्राफी झाली आहे. इतरही अनेक शस्त्रक्रिया झाल्या आहेत. परंतु, त्यांची इच्छाशक्ती जबरदस्त आहे. सकारात्मक विचारसरणीबरोबरच ते जीवनात प्रचंड शिस्त पाळतात. जीवनात कशाचीही तमा न बाळगणारे धाडसी व्यक्तिमत्त्व आणि तेवढेच संवेदनशीलसुद्धा आहेत. कुटुंबीयांसाठी ते आयडॉल आहेत. कुटुंबवत्सल डी. वाय. दादा हे कुठेही असले तरी रोज एकदा माझ्यासह कुटुंबीयांतील सर्वांशी फोनवरून संवाद साधतातच. कोल्हापुरात आल्यावर परतवंडांसोबत लहान मुलासारखे होऊन खेळतात. डी. वाय. दादासुद्धा मी स्वतःला भाग्यवान समजतो. पुनर्जन्म मिळाल्यास पुन्हा याच कुटुंबात जन्म व्हावा, असे समाधानाने सांगतात, असेही त्यांनी सांगितले.

…तर डी. वाय. पाटील मुख्यमंत्री झाले असते!

डॉ. डी. वाय. पाटील यांच्या ऐन उमेदीच्या काळात नृसिंहवाडीतील महादबा पाटील महाराजांनी त्यांना राजकारण सोडून शिक्षण क्षेत्रात कार्य करण्याचा सल्ला दिला. डी. वाय. दादांनीही तो तंतोतंत पाळला. हाच निर्णय त्यांच्या आयुष्याला कलाटणी देणारा ठरला. अन्यथा माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांचे चिरंजीव संजय गांधी यांच्याशी त्यांचे अत्यंत सलोख्याचे संबंध होते. त्यांनीच डी. वाय. यांना 'आपको सी.एम. बनना है!' असा शब्द दिला होता, अशी आठवणही संजय पाटील यांनी सांगितली. संजय गांधी हयात असते तर नक्कीच डी. वाय. पाटील यांच्या रूपाने कोल्हापूरचा मुख्यमंत्री झाला असता, असेही ते म्हणाले.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news