उरी येथील लष्कराच्या मुख्यालयावर पुन्हा हल्ल्याचा पाकचा प्रयत्न उधळला

उरी येथील लष्कराच्या मुख्यालयावर पुन्हा हल्ल्याचा पाकचा प्रयत्न उधळला
Published on
Updated on

उरी येथील लष्कराच्या मुख्यालयावर पुन्हा एकदा हल्ला करण्याचा प्रयत्न उधळून लावण्यात भारतीय सुरक्षा दलांना यश आले. सहा दहशतवादी घुसखोरीच्या तयारीत असताना एकाचा खात्मा करण्यात आला. तर अली बाबर (19) या लष्कर-ए-तोयबाच्या दहशतवाद्यास जिवंत पकडण्यात आले. इतर चारजण सीमेपलीकडे असल्यामुळे ते पळून गेले. 2016 मध्ये उरीमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 17 भारतीय जवान शहीद झाले होते.

या कारवाईवेळी दहशतवाद्यांना मदत करणार्‍या दोघांनाही पकडण्यात आले आहे. गेल्या खेपेस उरी येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यावेळी हल्लेखोर ज्या सलमाबाद नाला मार्गाने आले होते तोच मार्ग या दहशतवाद्यांनीदेखील निवडला होता. या सहा दहशतवाद्यांसोबत पाकिस्तानच्या बाजूने असलेल्या सीमेलगत तीन मदतनीस आले होते.

शनिवारपासून दहशतवाद्यांविरोधात सुरू असलेल्या मोहिमेदरम्यान उरीमध्ये काही दहशतवादी लपल्याची माहिती मिळाली होती. हे दहशतवादी घुसखोरीच्या तयारीत असतानाच सुरक्षा दलांनी ही कारवाई केली. मात्र, मारल्या गेलेल्या दहशतवाद्याची ओळख अद्याप पटलेली नाही. पकडला गेलेला अली बाबर याने आपण लष्कर-ए-तोयबाचा सदस्य असल्याचे कबूल केले.

आपल्याला मुझफ्फराबाद येथील खैबर कॅम्प गादीवाला येथे 2019 मध्ये तीन आठवड्यांचे प्रशिक्षण मिळाल्याचे त्याने सांगितले. त्याच्याकडून एके-47 च्या 7 रायफल्स, 9 पिस्टल आणि रिव्हॉल्व्हर आणि 80 हून अधिक हँड ग्रेनेड्स तसेच पाकिस्तानी चलनही हस्तगत करण्यात आले.

यादरम्यान पोलीस आणि भारतीय लष्कराच्या जवानांच्या संयुक्त कारवाईत दहशतवाद्यांना मदत करणार्‍या दोघांना पुलवामामधून अटक केली आहे. तसेच श्रीनगरजवळील राजौरी कदल परिसरातील एका घरातील दहशतवाद्यांचा अड्डा उद्ध्वस्त केला. लष्कर-ए-तोयबाचा कमांडर रियाज सथरगुंड लपला असल्याची माहिती मिळाली होती. या घरमालकालाही अटक करण्यात आली आहे.

केवळ 50 हजारांसाठी बनला दहशतवादी

दहशतवादी संघटनेत सहभागी होण्यासाठी अली बाबर याने सातवीतून शाळा सोडली. केवळ 50 हजारांसाठी तो दहशतवादी कारवायांत सामील झाल्याची माहिती उघड झाली आहे. ही माहिती मेजर जनरल वीरेंद्र वत्स यांनी दिली. आईवरील उपचारासाठी त्याला 20 हजार रुपये देण्यात आले. आणखी 30 हजार रुपये नंतर देण्यात येतील, असे 'लष्कर'च्या कमांडरने सांगितले होते.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news