उन्हाळ्यातही शक्य गव्हाची लागवड; ‘आयसीएआर’ने विकसित केले नवे वाण

उन्हाळ्यातही शक्य गव्हाची लागवड; ‘आयसीएआर’ने विकसित केले नवे वाण
Published on
Updated on

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : ऊष्ण तापमानातही चांगली उगवण होईल, असे बियाणे भारतीय कृषी संशोधन परिषदेतील (आयसीएआर) संशोधकांनी शोधले आहे. 'एचडी ३३३५' नावाच्या या बियाण्याची चाचणी पूर्ण झाली असून, त्याची पेरणी मार्चअखेरपर्यंत करता येणार असल्यामुळे गहू लागवडीचे वेळापत्रक सोयीनुसार बदलता येणार आहे.

केंद्रीय कृषी मंत्रालयाने सोमवारी या बियाण्याच्या संशोधनाची घोषणा केली. या मंत्रालयाने वाढत्या तापमानात गव्हाच्या पिकावर काय
परिणाम होतो, यावर लक्ष ठेवण्यासाठी एक समिती नेमली होती. गव्हाच्या किमतीत २५.०५ टक्क्यांची वाढ झाल्यामुळे उत्पादन वाढविण्याचे आव्हान देशासमोर आहे. शिवाय, सरकारी गोदामांतही गव्हाचा साठा घटत चाललला आहे. त्यातूनच कोणत्याही वातावरणात गव्हाचे उत्पादन घेता यावे, यासाठी सुधारित वाण विकसित करण्याची गरज निर्माण झाली. गेल्या १ फेब्रुवारीला सरकारी गोदामांमध्ये १५४.४४ लाख टन गव्हाचा साठा होता. हा गेल्या सहा वर्षांतील नीचांक आहे. सध्या उपलब्ध असलेल्या बियाण्यापासून येणारे पीक एप्रिलमध्येच काढता येते. गतवर्षी मार्चमध्ये वाढलेल्या उत्पादनाला उष्णतेमुळे गव्हाच्या फटका बसला होता. यंदाही असेच घडण्याची भीती आहे, कारण या महिन्यातच तापमान सरासरीपेक्षा ३ ते ५ अंशांनी वाढले आहे. हिवाळ्याचे दिवस घटले आणि उन्हाळ्याचे वाढले की नेहमीच गव्हाच्या उत्पादनावर परिणाम होतो. हे लक्षात घेऊन आयसीएआरमधील वैज्ञानिकांनी संशोधन सुरू केले होते.

गहू हे १४० ते १४५ दिवसांचे, म्हणजे सुमारे साडेचार ते पाच महिन्यांत येणारे पीक आहे. पंजाब, हरियाणा आणि मध्य प्रदेशात त्याची पेरणी नोव्हेंबरच्या १५ तारखेपूर्वी मध्ये होते. तांदूळ, कापूस आणि सोयाबीनचे पीक तोपर्यंत काढणीला आलेले असते. उत्तर प्रदेश व बिहारमधे नोव्हेंबरच्या उत्तरार्धात गहू पेरला जातो. पेरणी २० ऑक्टोबरच्या सुमारास केली, तर मार्चच्या तिसऱ्या आठवड्यात गहू तयार होऊ शकेल आणि शेवटच्या आठवड्यात त्याची काढणी करता येईल. मात्र, यात गहू वेळेपूर्वीच फुलोऱ्यात येण्याची शक्यता आहे. त्यामुळे उत्पादन घटते. या समस्येवर उपाय शोधण्याचे आव्हान वैज्ञानिकांनी स्वीकारले.

भारतीय कृषी संशोधन संस्थेने (आयएआरआय) एचडी- ३३८५ या वाणाची रोप प्रजातींचे संरक्षण आणि शेतकऱ्यांचे अधिकार प्राधिकरणाकडे (पीपीव्हीएफआरए) नोंदणी केली आहे. डीसीएम श्रीराम लि. कंपनीला या वाणाचा परवाना देण्यात आला आहे. सार्वजनिक-खासगी भागीदारीतून हे वाण शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविले जाईल, असे आयएआरआयचे संचालक ए. के. सिंग यांनी सांगितले.

तीन वाणांचा शोध

लवकर फुलोऱ्यात येणारे आणि लवकर गहू तयार करणारे तीन वाण आयसीएआरमध्ये तयार करण्यात आले आहेत.
एचडीसीएसडब्ल्यू- १८ हे वाण २०१६ मध्ये विकसित करण्यात आले होते. त्याची उत्पादन क्षमता हेक्टरी ७ टन आहे. एचडी – २९६७ आणि एचडी – २९८६ या प्रचलित वाणांपेक्षा हे वाण ५० क्विंटल ते एक टन जास्त उत्पादन देते. याची रोपेही १०५ ते ११० सेंटिमीटरपर्यंत वाढतात. एचडी ३४१० हे दुसरे वाण आहे, जे २०२२ मध्ये बाजारात आणण्यात आले. त्याची क्षमता प्रतिहेक्टर ७.५ टन आहे. मात्र, एचडी – ३३८५ हे नुकतेच विकसित करण्यात आलेले वाण या सर्व वाणांपेक्षा सरस आहे. हे वाण गेल्या २२ ऑक्टोबर रोजी पेरण्यात आले. आता ते फुलोऱ्यात आले आहे.. इतर पारंपरिक वाणांपेक्षा याची वाढ जोमदार आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news