कोल्हापूर : पुढारी वृत्तसेवा
थकीत बिलासाठी वीज वितरण कंपनीने वीजपुरवठा खंडित केल्याने ऑक्सिजन लावून घरात उपचार घेणार्या उचगाव (ता. करवीर) येथील उमेश आप्पा काळे (वय 25) या तरुणाचा गुरुवारी तडफडून मृत्यू झाला. या घटनेनंतर संतप्त झालेल्या नातेवाईक, ग्रामस्थांनी शासकीय रुग्णालयात भरपावसात आंदोलन केले.
वीज वितरण कंपनीच्या अधिकारी, कर्मचार्यांविरुद्ध गुन्हा दाखल झाल्याशिवाय मृतदेह ताब्यात घेणार नाही, अशी कुटुंबीयांनी भूमिका घेतल्याने पोलिस अधिकार्यांसह वीज वितरण कंपनीच्या अधिकार्यांची तारांबळ उडाली. गांधीनगर पोलिस ठाण्याचे सहायक निरीक्षक सत्यराज घुले यांनी नातेवाईकांनी समजूत काढल्यानंतर रात्री उशिरा मृतदेह त्यांच्या ताब्यात देण्यात आला. उमेष काळे फुफ्फुसाच्या आजाराने त्रस्त होते. त्यांच्यावर घरीच वैद्यकीय उपचार सुरू होते. प्रकृती क्षीण बनल्याने त्यांना ऑक्सिजन लावण्यात येत होता. थकीत वीज बिलापोटी वीज वितरण कंपनीने त्यांच्या घराचा विजेचा पुरवठा खंडित केला होता. ऑक्सिजनअभावी त्यांची प्रकृती गंभीर बनली. त्यांच्यावर शेजारी असलेल्या नातेवाईकांच्या घरात उपचार करण्यात आले. मात्र, उपचार सुरू असताना सायंकाळी त्यांचा मृत्यू झाला.