उचगाव येथे मुख्य चौकातील एटीएम फोडणार्‍या टोळीला बेड्या

उचगाव येथे मुख्य चौकातील एटीएम फोडणार्‍या टोळीला बेड्या

कोल्हापूर ; पुढारी वृत्तसेवा :  उचगाव (ता. करवीर) येथील मध्यवर्ती चौकातील बँकेचे एटीएम मशिन फोडून त्यामधील साडेआठ लाखांची रोकड लुटण्याचा प्रयत्न करणार्‍या सराईत टोळीच्या म्होरक्यासह तिघांना गांधीनगर पोलिसांनी शुक्रवारी बेड्या ठोकल्या.

सचिन दत्तात्रय गवळी (वय 33, सुभाषनगर), राहुल राजेश माने (30, कनाननगर), चंद्रकांत शशिकांत तळकर (40, शिवाजी चौक) अशी त्यांची नावे आहेत. संशयितांकडून 3 गुन्हे उघड झाले असून सव्वा लाखाचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

सचिन गवळी हा रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार आहे. उचगाव शाहूपुरी, राजारामपुरी, गांधीनगर पोलिस ठाण्यात त्याच्यावर खून, दरोडा, जबरी चोरी, विनयभंगासह 15 गुन्हे दाखल आहेत. टोळीकडून कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यांसह कर्नाटकातील गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे, असे उपअधीक्षक आर. आर. पाटील, सहायक निरीक्षक दीपक भांडवलकर यांनी सांगितले.

महामार्गावर गॅरेज आवारात दुरुस्तीसाठी पार्किंग केलेल्या ट्रकच्या बॅटर्‍या चोरून मोपेडवरून पलायन करणार्‍या गवळीसह तिघांना पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले. चौकशीत बॅटर्‍या चोरीसह उचगाव येथील मध्यवर्ती चौकातील एटीएम मशिन फोडून रोकड लुटण्याचा प्रयत्न केल्याची कबुली संशयितांनी दिली.

याशिवाय राजारामपुरी येथील फूड मॅन्युफॅक्चरिंग कंपनीचे ऑफिस फोडून तेथील फ्रिज, मोपेड लंपास केल्याचे निष्पन्न झाले आहे. पोलिसांनी चोरीच्या गुन्ह्यातील ऐवज हस्तगत केला आहे. अतुल कदम, सुजय दावणे, राम माळी, सुनील माळगे आदींनी ही कारवाई केली.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news